Login

हे बंध रेशमाचे पर्व दुसरे भाग २

कौटुंबिक कथा
हे बंध रेशमाचे पर्व दुसरे भाग २

©® सौ.हेमा पाटील.

मागील भागात आपण पहिल्या पर्वाचा गोषवारा घेतला, तसेच पारूबाईची बडबड पाहिली. सुनेच्या नावाने ठोकणाऱ्या नामाच्या आईचे बोलणे ऐकून तिचे समाधान झाले. आता पुढे...

पारूबाई दार लावून नव्या घराच्या बांधकामाकडे गेली. पाया काढून झाला होता. आता ते खड्डे भरून पायाभरणी सुरू होणार होती. ते पाहून तिने आपल्या तिन्ही लेकींना सांगावा धाडला.
"व्हय गं पोरींनो, तुमी गारवा घिऊन कदी येनार हायसा? आता पायाभरणी सुरू हुईल. त्येच्या आदुगर आंबील घुगऱ्या आन् दहीभात इस्कटाय नगं का? हे काम पोरींचं असतं." तिघींनीही दोन दिवसात येतो असा माघारी सांगावा धाडला. ते ऐकून पारूबाई खुश झाली.

नव्या घराचं सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. उगं गारवा नाही म्हणून घरात शांतता नाही असं व्हायला नको असा विचार पारूबाईच्या डोक्यात आला आणि तिने स्वतःच्या भावजयीला बी गारवा घेऊन यायला सांगितले. आता बहिणीला जर कळवलं नाही तर तिला राग येईल म्हणून लागल्या ओढीने तिला बी कळवलं. आता राहिली ननंद! तिला बोलावलं नाही तर नवरा एक बोलून राहायचा नाही. त्यामुळे तिला बी सांगावा धाडला.
आता सुनंच्या माह्यारी पण कळवायला पाहिजे नाहीतर तिला राग येईल; पण तिकडं महेशला कळवायला सांगू असा विचार तिने केला.

संध्याकाळी सगळ्यांसमोर तिने सांगितले,

"गारवा घेऊन पोरी यायच्या हायत्या. या माझी भन अन भावजय बी येनार हाय .ननांद पन येनार हाय." हे ऐकून उमा काहीच बोलली नाही. पारूबाई पुढे महेशला म्हणाली,

"उमाच्या माह्यारला पन सांगावा धाड." आईला नकार देण्याची महेशरावांची काय टाप? त्यांनी होकारार्थी मान हलवली आणि उद्या आमच्या शाळेतल्या शिपायाजवळ निरोप देतो असे सांगितले. शाळेतला शिपाई उमाच्या माहेरचा होता. पारूबाई काहीच बोलली नाही. आता गारवा घेऊन येणाऱ्या महिला आणि गारव्याचे सोपस्कार याबाबतच पारूबाई बोलत होती. उमा फक्त ऐकून घेत होती.

सासुबाईंना जे काही करायचे असेल ते करू देत असा विचार तिने केला होता. फक्त आता एवढ्या सगळ्या जणी गोळा झाल्यावर तिच्यावर कामाचा ताण येणार होता हे निश्चित. त्याची काळजी उमाला वाटत होती.' बघूया. त्यावेळी बघू कसं करायचं ते.' असा विचार उमाने केला आणि तिने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले.

दोन दिवसांनी सगळ्याजणी जमा झाल्या. प्रत्येकीने येताना आंबील घुगऱ्या, दहीभात, पुरणपोळ्या आणि पारूबाईला उभायत पोशाख आणला होता. ते पाहून पारूबाई हरखली होती. आई-वडिलांना एकत्र उभे करून तिन्ही मुलींनी दोघांचे पाय धुतले आणि दोघांना हळदीकुंकू लावून त्यांच्या हातात संपूर्ण पोशाख दिला आणि खाली वाकून नमस्कार केला. त्यानंतर आणलेल्या आंबील घुगऱ्या , दहीभात त्यांनी सगळीकडे विस्कटला. खरंतर दहीभात आंबील घुगऱ्या या गोष्टी राखणदारासाठी असतात. देवीचे जे सैनिक असतात त्यांच्यासाठी हा नैवेद्य असतो असे सांगितले जाते. त्यामुळे वास्तूत शांतता राहावी, जमिनीखाली उकरल्यामुळे दुखावले गेलेल्या अगर हातून मरण पावलेल्या सूक्ष्म जीवांना खरंतर श्रद्धांजली वाहायला हवी. संपूर्ण विधी पूर्ण झाला आणि सगळेजण घराकडे आले. सगळ्यांची जेवणे भांडीकुंडी सगळं उरकेपर्यंत तीन वाजून गेले.

उमाने आज सुट्टीच काढली होती त्याशिवाय सगळे नियोजन करता येणे शक्य नव्हते. जेवण खाण झाल्यानंतर उमाचे आई-वडील जायला निघाले तेव्हा उमा म्हणाली,

" राहणार नाही का आजचा दिवस?" यावर उमाचे बाबा म्हणाले,

" नाही बाळा, आज नाही, पाहू पुन्हा येऊ कधीतरी." त्यानंतर बाकीचे पाहुणे त्या दिवशी मुक्कामी राहिले. सर्वांचे जेवण खाण आणि आदरातिथ्य करण्यात उमाचा अख्खा दिवस गेला. त्या दिवशी सकाळी लवकर उठून उमाने चपात्या आणि भाजी सर्वांसाठी बनवली आणि महेशराव व ती शाळेत निघून गेली. ती पुढे जाताच घरात पारूबाईची बडबड सुरू झाली.

"बगिटलं का हातातलं काम तसंच टाकून ग्येली. साळंत एकुंद्या दिवशी ग्येली नसती तर काय बिगाडलं आसतं का?" यावर पारूबाईची भावजय म्हणाली,

"अहो, सारख्या सुट्ट्या कुठं मिळायच्या? दोन पोरं आहेत, त्यांची आजारपणा आहेत. त्यावेळी सुट्ट्या लागत असतील. आपण सगळेजण हायेच की, ती येईल की संध्याकाळी." हे ऐकून पारूबाई म्हणाली,

" तुमचं लेकीचं नातं लागतंया नव्हं का! त्यामुळं तुमी तिचीच बाजू घेनार." हे ऐकून भावजयीने मिठाची गुळणी घेतली आणि ती गप्प बसली. तेवढ्यात आनशी काकू कपडे धुवायला घेऊन जाण्यासाठी आली. पाहुण्यांनी भरलेलं घर बघून तिने विचारलं,

"आज काय इशेष? समदं घर भरलंया पावन्यांनी." तिच्या हातावर एक लाडू ठेवून पारूबाई म्हणाली,

"या समद्या गारवा घेऊन आलेत्या." आनशी काकूने लाडू खाऊन टाकला आणि कपड्याचा ढिगारा उचलून ती नदीच्या दिशेने चालू पडली. इकडे घरात सगळ्यांचा तोच विषय सुरू झाला होता. नवीन घराचे बांधकाम आणि उमाची मज्जाच आहे.

बया बया, बाळातीन नसताना बी घरी परटीन येतीया. सुनंला लईच डोक्यावर बसवलंया." अशी पारूबाईची बहीण म्हणाली. ते ऐकून पारूबाईला आणखी स्फुरण चढले. दोघी बहिणींची एकमेकींच्या सुनांना नावे ठेवण्याची अहमहमिका लागली. मध्ये मध्ये पोरी ठिणग्या टाकण्याचे काम करत होत्या. बराच वेळ हा कार्यक्रम सुरू होता. तेवढ्यात नवरा आलेला दिसला त्याबरोबर पारूबाईने आवरते घेतले आणि ती स्वयंपाकघराकडे वळली.

सगळ्यांची जेवणे खाणे झाल्यावर भांड्यांचा हा ढिगारा पडला होता. तो गोळा करून ठेवून सगळ्याजणी कलंडल्या. उमा संध्याकाळी शाळेतून आल्यानंतरच सगळ्याजणी उठल्या. उमाने आल्या आल्या चुलीवर चहाचे पातेले चढवले आणि ती खरकट्या भांड्यांकडे वळली. पटपट तिने भांडी घासून घेतली. त्यानंतर सर्वांना चहा गाळून दिला‌ स्वतः सुद्धा घेतला आणि ती संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली.

महेशरावांनी कालवणाचं आणून दिलं होतं. चुलीवर मटणाला फोडणी देऊन तिने लसूण सोलायला घेतला. खलबत्त्यात लसूण खोबरं बारीक कुटून तिने कालवणाला फोडणी दिली आणि भाकरी करायला घेतल्या. भाकरी टोपल्यात पडल्यावर तिने पारूबाईला आवाज दिला,

"आत्या, आत येता का?" पारूबाई आत आली. तिने सांगितले,

"जेवायला वाढायला सुरुवात करा म्हणजे मला भाकरीचा अंदाज येईल." पारूबाई ने ताटे करायला घेतली. एकेकाला ताट देईपर्यंत इकडे उमाच्या भाकरी टोपल्यात पडत होत्या. सगळ्यांची जेवणे उरकली तरी उमा भाकरी करतच होती. आता सगळ्यांची जेवणे उरकली आहेत, तूच एकटी राहिली आहेस असे पारूबाईने सांगितले तेव्हा शेवटची परातीतली भाकरी तिने तव्यात टाकली. दोन्ही पोरं महेशरावांच्या पुढ्यात जेवण करून कधीच झोपी गेली होती.

उमाही कंटाळली होती. कशीतरी पोटाची खळगी भरून ती पुन्हा भांड्याच्या ढिगार्‍यावर बसली. उमा बाहेर भांडी घासत होती आणि या सगळ्याजणी तिथेच बाहेर माच्यावर गप्पा मारत बसल्या होत्या. त्यांच्या गप्पा ऐकत ऐकत उमाची भांडी झाली. त्यांच्यापैकी एकीलाही उमाला भांडी घासायला मदत करायला जावे असे वाटले नाही.

उमाने भांडी आत नेऊन ठेवली आणि उमा झोपायला गेली. तिला बसवतच नव्हते. तिला झोपायला गेलेली पाहून पारूबाई उसाणली,

" बगा, मानसं बसलेत तर यिऊन गप्पा माराव्या मानसात मिसळावं पर न्हाई, ग्येली झोपायला! तिला मानसाची काय परवाच नाय." हे ऐकून पारूबाईची भावजय पुन्हा एकदा म्हणाली,
" आवं दिवाणसाब दमली असंल ती. दिवसभर तिचं रहाटगाडगं सुरू हाय." हे ऐकून पारूबाई म्हणाली,

"ज्यादा न्हाई, पर धा मिनटं तरी बसायचं हुतं, पर न्हाई." दुपारी खच्चून झोपा काढल्यामुळे त्या सर्वांच्या गप्पा रंगल्या होत्या. उमाला आत ऐकू येत होते. हसणे कानावर पडत होते, पण ती इतकी दमली होती की तिला त्या गप्पांमध्ये सहभागी होणे शक्य नव्हते. तिलाही गप्पा मारायला आवडत असे, पण आज मात्र ती फार थकली होती.

एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक भांडीकुंडी आवररणे तिच्यासाठी जास्तच होते. महेशरावांनी तिला विचारले,

" दमलीस!" यावर ती म्हणाली,

"सकाळपासून काम सुरू आहे." यावर महेशराव म्हणाले,

"झोप आता पटकन." ते काय बोलत आहेत तोपर्यंत उमाची झोप लागली सुद्धा. तुम्ही म्हणाल, असं कुठे असतं का?
होय! त्या काळात सुनांनी खाली मान घालून घरातील सगळं काम करायचं. वर मान करून पहायचं नाही. उलट उत्तर द्यायचं नाही अशीच पद्धत होती. उमा त्याच्या विरोधात कसे वागेल? जी सून याविरोधात आवाज उठवे ती उर्मट, तोंडाळ, नात्यांची पर्वा न करणारी अशी विशेषणे तिच्या पदरात पडत.

त्यामुळे पडेल ते काम उमा मुकाट्याने करत होती. तोंडातून एक चकार शब्द काढत नव्हती. चुकून तसा एखादा शब्द निघाला तर आईच्या संस्कारांपर्यंत नक्कीच गोष्ट जाईल याची तिला खात्री होती. त्यामुळे ती शांतपणे येणाऱ्या प्रत्येक दिवसाला तोंड देत होती. एकत्र कुटुंब पद्धतीत राहायचे होते तिला. कामाने माणूस मरत नाही तर अधिक बलवान बनतो असे तिचे मत होते. त्यामुळे जमेल तितके काम करण्याकडे तिचा कल होता.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

गेल्या वीस वर्षांपूर्वी असे वातावरण होते हे मान्य करणे अवघड वाटेल, पण त्याच काळात महिला नोकरीसाठी बाहेर पडत असल्या तरी घरातील जबाबदाऱ्यांपासून त्यांची अजिबात सुटका होत नव्हती हे ही तितकेच खरे. खेडेगावात तर आणखीच बिकट अवस्था! पाहूया पुढे काय होते ते. कथा आवडली तर कमेंट नक्की करावी ही विनंती.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →