Login

हे बंध रेशमाचे पर्व दुसरे भाग १

कौटुंबिक कथा
हे बंध रेशमाचे पर्व २रे

©® सौ. हेमा पाटील.

नमस्कार वाचकहो,
बंध रेशमाचे ही कथामालिका जानेवारी महिन्यात लिहीली होती. आजपासून त्याचे पर्व दुसरे सुरू करत आहे. संदर्भासाठी बंध रेशमाचे पर्व एक चा थोडक्यात गोषवारा या भागात देत आहे.
ज्या वाचकांनी ही कथामालिका वाचली होती, त्यांच्या लक्षात येईल. ज्यांनी बंध रेशमाचे ही दीर्घकथा वाचली नसेल त्यांनी आधी वाचावी अशी विनंती आहे.

उमा, महेशराव यांची दोन मुले राजू आणि मृणाल आणि उमाचे सासू सासरे असे एका खेडेगावातील एक कुटुंब. खेडेगाव असले तरी उमा व तिचे यजमान महेशराव गावातील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करतात. घरची शेती आहे. सासुबाई व उमा यांच्यातील नाते, खेडेगावात राहत असताना येणारी सामाजिक बंधने, कौटुंबिक वातावरण याबाबत जाणून घेण्यासाठी ती दीर्घकथा पुन्हा एकदा नजरेखालून घालावी अशी विनंती.

सासुबाई नातवावर राजूवर जरा जास्तच प्रेम करतात. त्यांचे राजूवरील लक्ष विचलित व्हावे हा विचार करून उमाने घर बांधण्याचा निर्णय घेतला आणि तिचा हेतू सफल झाला असे तिला वाटले कारण राजूला शाळेत नेण्यासाठी तिला अडवणाऱ्या सासुबाईंनी आता चक्क राजूला अर्ध्या दिवसाऐवजी पूर्ण वेळ शाळेतच ठेव असे उमाला सांगितले.

उमाला या गोष्टीचा आनंद झाला. तिला एकत्र कुटुंबात राहायचे होते. त्यासोबतच मुलांवर चांगले संस्कार करायचे होते. मुलांचे फाजील लाड मुलांच्या प्रगतीत अडसर ठरतात असे तिचे स्पष्ट मत होते. यामुळे तिने पहिले पाऊल उचलले होते. सासुबाईंचे बंगला बांधायचे स्वप्न पूर्ण करायचे असे तिने ठरवले होते.
त्यासोबतच त्यांची राजूवरील भावनिक पकड कमी करायची होती तिला.

हे अजिबात सोपे नव्हते, पण तिला हातपाय गाळून बसायचे नव्हते. ते तिच्या रक्तातच नव्हते. त्यामुळे तिने हा प्लॅन आखला होता. आणखी चार वर्षांनी घर बांधले असते तरी चालले असते. ते इतके काही पडायला आले नव्हते. चार वर्षे अशाच पध्दतीने राजू जर आजीच्या इतक्या संपर्कात राहिला तर नंतर तो कुणाचेच ऐकणार नाही अशी भीती उमाला वाटत होती. त्यामुळे तिने विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला होता.

माणसाचे रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर असते असे म्हणतात. सून आली की सासूने घरातील सगळ्या कामांची जबाबदारी सुनेवर सोपवायची आणि आपण फक्त देखरेख करायची, वर्चस्व गाजवायचे असा त्याकाळी अलिखित नियमच होता. किती बरं होतं ना? किमान कामातून बायकांची सुटका तरी व्हायची.

आजच्या काळात स्वतःचा संसार करून झालेल्या काही सासवा सुनेचा ही संसार तेवढ्याच ताकदीने ओढताना दिसतात तेव्हा उमाच्या सासूबाई किती भाग्यवान होत्या असे वाटते. अर्थात त्यांनी शारिरीक अलिप्तता स्वीकारली होती, पण मनाने मात्र त्या अजूनही संसारातच गुंतलेल्या होत्या. ते त्यांचे गुंतलेले मन अलिप्त व्हावे यासाठी उमाच काय कुणीही काही करू शकणार नव्हते. या मनाला फक्त त्याच स्वतः अलिप्त करू शकणार होत्या.

उमाने फक्त राजूमध्ये त्यांचे अती गुंतणे कमी व्हावे यासाठी प्रयत्न केला होता, तोही त्यांना न दुखावता. आता घर बांधण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले होते. नवीन घर बांधणे हे स्वप्न प्रत्यक्षात येताना त्यांना घराकडे जातीने लक्ष द्यायचे होते. राजूमुळे ते जमेना तेव्हा त्यांनी राजूची जबाबदारी उमावर सोपवली. उमाला हेच तर हवे होते. त्यामुळे ती सुखावली. तिच्यावर कामाचा ताण पडत होता, पण तरीही ती आनंदी होती.

आता राजू शाळेतच समवयस्क मुलांसोबत शाळा सुटेपर्यंत खेळत असे. एका अर्थाने ते खेडेगावातील डे केअरच होते म्हणा ना. शिक्षिका आपल्या मुलांना तिथे दिवसभर ठेवत असत. एकमेकांसोबत ती मुले खेळत असत. अधूनमधून त्यांच्यापैकी कुणीतरी मुलांकडे डोकावून जात असे.

मुलांना आजीची माया लावणे वेगळे आणि नातवाच्या प्रेमात आंधळे होणे वेगळे. आपल्या आत्याबाई नातवाच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या आहेत हे राजूसाठी अपायकारक आहे हे उमाच्या लक्षात आले. एका आईने आपल्या मुलांच्या जडणघडणीचा जसा विचार करायला हवा तसाच उभा करत होती. सासुची नातवावरची माया तिला कळत नव्हती असे नव्हते. त्याचा अतिरेक टाळावा असे तिचे म्हणणे होते, पण दरवेळी सासुबाई ते धुडकावून लावत होत्या.

आता घराचा पाया काढण्याचे काम सुरू झाले आणि उमाच्या कामात वाढच झाली. घराच्या कामावर येणाऱ्या कामगारांचा चहापाणी, त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या दोन घागरी भरून ठेवणे, कामाकडे एखादी चक्कर मारणे सुरु झाले. तिने पहाटे लवकर उठून कामे आवरणे सुरू केले. आता एवढी धावपळ होत होती की, तिने महेशरावांच्या मागे लकडा लावला की, घर बांधून होईपर्यंत कपडे धुण्यासाठी परटाच्या बाईला सांगा. आधी तर आईच्या भीतीने महेशराव तयार होत नव्हते पण उमाची चाललेली कुतरओढ पाहून त्यांनी आईशी या विषयावर बोलण्याचे ठरवले.

"आई, त्या परटाच्या आनशी काकूंना निरोप दे गं. आपलं घराचं काम होईपर्यंत आपलं धुणं नदीवर धुवायला घेऊन जायला सांग. कसं ठरवायचं ते तू बघ." हे ऐकून पारूबाई म्हणाली,

"परटीण? ती कशापायी? तुजी बायकू काय आता बाळातीन हाय का?" महेशराव म्हणाले,

"अगं, उमाची फार तारांबळ होतेय. घरातलं आवरून शाळेत जायचं, घराच्या बांधकामाकडं चक्कर मारायची. त्यासाठी थोडे दिवस सांग आनशी काकूंना."

"मंग झेपत न्हाई तर नोकरी सोड की म्हणाव तुझ्या बायकूला." हे ऐकून महेश रावांचे टाळके सरकलेच.

"आई, तिच्या पगारावर लोन काढलं हाय. तिनं नोकरी सोडली तर घराचे हप्ते कुठून भरायचे? तिची नोकरी आहे म्हणून बंगला बांधायचं स्वप्न एवढ्या लवकर आपण पूर्ण करू शकतोय. एकट्याच्या पगारात एवढे शक्य होत नाही." महेशरावांचे हे बोलणे ऐकून पारूबाईची दातखीळ बसली. बंगल्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुनबाईची नोकरी चालू राहणे आवश्यक आहे हे तिला समजून चुकले. मुकाट्याने तेथून उठून ती बाहेर येऊन बाजेवर बसली. आता आईचा विरोध मावळेल याची महेशरावांना खात्री होती आणि तसेच झाले.

दोन दिवसांनी आनशी काकू एरवाळीच हाका मारत घराकडे आल्या. धुवायच्या कपड्यांचं बोचकं आणि निरमा पावडर, साबणाची वडी त्यात घालून ठेवा, नदीवर जाताना घेऊन जाईन असे त्यांनी सांगितले. उमावरच्या एका महत्त्वाच्या कामाचा भार हलका झाल्याने तिला हायसे वाटले. आता म्हशीची धार, वैरण पाणी, गोठा, स्वयंपाक, भांडी करतांना तिची खूप दमछाक होणार नव्हती.

आनशी काकू कपड्यांचं गाठोडं न्यायला आली तेव्हा पारूबाई एकटीच घरात होती. तिच्या पुढ्यात चहाचा कप ठेवून ती म्हणाली,

"कापडं चांगली धु गं. पोराची पांडरी कापडं साळंला लागतेती." यावर आनशी काकू म्हणाली,

"आता गं बया, परतेक पोरीच्या बाळातपनात म्याच कापडं धुत व्हते की! आन् आताच काय ह्ये आक्रीत म्हनायचं?"

"सुनंला हुईना झालंया. लोड पडतुया कामाचा." उपहासाने पारूबाई बोलली. तिच्या स्वरातील उपहास आनशी काकूला समजला, पण तिकडं दुर्लक्ष करत ती म्हणाली,

"चालायचं. नवी पिढी हाय." आणि तिने कपड्यांचे गाठोडे उचलले व नदीची वाट धरली. आनशी काकूने जसे दुर्लक्ष केले तशा सगळ्याच स्त्रिया दुर्लक्ष करत नाहीत. उलट नात्यात पडलेली फट काहीजणी शोधतच असतात. चुकून एखादी फट सापडली तर ती मुजवण्याऐवजी त्याची दरी कशी होईल यात धन्यता मानणाऱ्या ही स्त्रियाच असतात. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ही म्हण यांना अगदी चपखलपणे लागू होते.
यासाठीच चहाच्या पेल्यातील वादळ पेल्यातच निवून द्यावे असे म्हणतात.

आनशी काहीही उत्तर न देता गेली हे ऐकून पारूबाई अस्वस्थ झाली. तिने होकार दिला असता, आजकालच्या सुनांना चार शब्द सुनावले असते तर पारूबाईचा आत्मा थंडावला असता. ती कसर भरून काढली शेजारच्या नामाच्या म्हातारीने. ती आधीच कावली होती, त्यात पारूबाईने सुनेच्या कामचुकारपणाचा पाढा वाचला तशी ती उसळून स्वतःच्या सुनेला बडबड करू लागली व तिने समस्त सुनांचा उध्दार केला. ते ऐकून पारूबाईचा आत्मा थंडावला व ती दार लावून घराच्या बांधकामाकडे निघाली.
©® सौ. हेमा पाटील.

नमस्कार वाचक मित्रमैत्रिणींनो,
हे दुसरे पर्व मी लिहित आहे यात घडलेली घटना सत्य आहे असे आपणांस वाटेल, कारण सध्या अवतीभवती जे काही घडत आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी मी लिहित आहे. हे पर्व समजून घेण्यासाठी पर्व पहिले वाचलेत तर या पर्वाचा छान आनंद घेता येईल.

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →