जलद लेखन स्पर्धा _ मार्च २०२६
विषय _ मला आलेला विचित्र अनुभव
हसावं की रडावं _ भाग ३
एका आठवड्याने सानिकाचे टाके काढण्यासाठी शीला आणि शरद पुन्हा डॉक्टर साने यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे ते जाऊन बसले इतक्यात डॉक्टर शिल्पा यांनी हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला. त्यांनी ह्या दोघांना पाहिलं आणि त्यांच्याजवळ येऊन वाटेल तसं बोलायला लागल्या.
"काय हो तुमच्या मुलीवर ताबडतोब उपचार केले. तिला जास्त त्रास होऊ नये ह्याची काळजी घेतली आणि तुम्ही आमच्या सराना माझ्याबद्दल काहीही सांगितलं. सर मला म्हणाले मी येणार असताना तुम्ही टाके का घातले. मी तुमच्याशी नीट बोलले नाही असेही तुम्ही सांगितले ना!"
तिला मध्येच थांबवत शीला म्हणाली,
"अहो आम्ही काहीच सांगितलं नाही डॉक्टरांना. आम्ही त्यांना भेटलो पण नाही. उलट ते बाहेर येऊन आम्हाला म्हणाले एक आठवड्याने या. खरं सांगायचं तर मला त्या दिवशीच तुम्हाला सणसणीत उत्तर द्यायचे होते."
शीला मध्येच बोलायची थांबली कारण डॉक्टरांनी त्यांना आतमध्ये बोलावले.
"या मिस्टर शरद आणि शीला. सर्वप्रथम मी तुमची माफी मागतो की तुमच्याशी माझ्या सहकारी डॉक्टर शिल्पा नीट बोलल्या नाहीत. मला डॉक्टर सुहासने सर्व सांगितले. त्यांनी तुम्हाला राग येईल असे प्रश्न विचारले. अहो आम्ही सर्वच, डॉक्टर शिल्पाला नेहमी सांगतो की पेशंटला आधी धीर द्यायचा असतो. पण तुम्हाला माहिती आहे व्यक्ती तितक्या प्रकृती. उताविळपणा आहे बाकी एरव्ही त्या स्वभावाने खूप चांगल्या आहेत."
"अहो डॉक्टर पण मला एक सांगा कोणतीही व्यक्ती जखमेत मसाला भरेल का! रक्तामुळे हळदीचा रंग लाल झाला. हे लहान मुलांना पण कळलं असतं. ह्या अशा डॉक्टरमुळे आम्हा सामान्य व्यक्तींना वाटणारच न की काही डॉक्टर पैसे देऊन खोटं प्रमाणपत्र घेऊन डॉक्टर झाले आहेत. ते डॉक्टर त्यांना सांगत होते एका मुलीच्या चेहऱ्यावर डाग राहिला तर तिला मोठी झाल्यावर तिचा चेहरा आरशात पाहून खूप वाईट वाटेल."
"हे बघा मी आत्ता आधी टाके काढतो. जर खूप खराब खूण राहणार असेल तर आपण दुसरा उपाय करू. तुम्ही काळजी करू नका. आणि हो ह्या सर्वांमुळे तुम्हाला जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल मी दिलगीर आहे."
"त्या दिवशी आम्ही खूप घाबरलो होतो आणि अशा परिस्थितीत त्यांनी मला असं विचारलं."
"कसं आहे ना इथे खेडेगावात कोणाला यायचं नसतं. गावातली डॉक्टर झालेली मुलं त्यांना चांगल्या अनुभवासाठी शहरात जायचं असतं. इथे यायला तयार होणाऱ्यांना लवकरात लवकर स्वतंत्रपणे काम करण्यासाठी ते इथे यायला तयार होतात."
घरी येताना शीलाला हसावं की रडावं कळतच नव्हतं. हा प्रसंग शीला कधीच विसरू शकणार नव्हती.
