जलद लेखन स्पर्धा _ मार्च २०२६
विषय _ मला आलेला विचित्र अनुभव
हसावं की रडावं _ भाग २
शीला आणि शरद धावतच सानिकाला घेऊन हॉस्पिटल मध्ये आले. तिथे त्या डॉक्टर शिल्पाला भेटल्या. त्या डॉक्टर साने यांच्या हाताखाली शिकाऊ डॉक्टर होत्या. त्यांनी सानिकाला पाहिल्याबरोबर शीलावर प्रश्नांचा भडीमार केला.
"अशी कशी ही लहान मुलगी पडली. किती रक्त गेलं आहे. तुम्ही ह्या जखमेत काय भरलं आहे. मसाला तर नाही भरला ना! काही लोकांना जखम झाल्यावर काय करावं कळतच नाही."
तिचे प्रश्न ऐकून शीलाला तिला सणसणीत उत्तर द्यावेसे वाटले.
"जखम झाल्यावर रक्त थांबवण्यासाठी अगदी अडाणी माणसाला सुद्धा माहित असतं की तिथे हळद लावायची असते. तिच्या जखमेवर आम्ही मीठ चोळू की मसाला लावून तिच्या जखमेची आग वाढवू. एक डॉक्टर असून तुम्ही असे प्रश्न विचारता. कमीत कमी तुमच्यासमोर कोण आहे ते बघून तरी प्रश्न विचारा."
परंतु शीलाला आता सानिकावर लवकरात लवकर उपचार व्हावे असे मनापासून वाटत होतं म्हणून तिने तिचा संताप बाजूला सारून उत्तर दिलं,
"रक्त थांबवण्यासाठी हळद भरली आहे."
डॉक्टर शिल्पाने नर्सच्या सहाय्याने जखम साफ केली आणि म्हणाली,
"जखम खोल आहे टाके घालावे लागतील."
इतक्यात दुसरे सहाय्यक डॉक्टर सुहास तिथे आले आणि घाई करणाऱ्या डॉक्टर शिल्पाला म्हणाले,
"मी आताच सरांना फोन केला होता. ते ऑन द वे आहेत. पाच मिनिटात येतील. त्यांनी सर्व पूर्व तयारी करायला सांगितली आहे. ते आल्यावर लगेच टाके घालतील."
"डॉक्टर सुहास मी आहे ना, मी घालते टाके. आपण सरांसाठी थांबायला नको."
"डॉक्टर शिल्पा मला वाटते ह्या मुलीच्या बरोबर डोळ्याच्या वर जखम झाली आहे. एक तर ती मुलगी आहे टाके नीट घालायला हवेत नाहीतर तिच्या चेहऱ्यावर मोठी खूण राहील. सर आता पोहोचतीलच."
त्या दोघांचं संभाषण ऐकून शीलाला कळलं की ही एक शिकाऊ डॉक्टर आहे. ती नीट टाके घालू शकणार नाही. तिला मनोमन वाटत होतं की लवकरात लवकर डॉक्टर साने स्वतः येऊन त्यांनीच टाके घालावेत. त्या डॉक्टर शिल्पा खूपच हट्टी होत्या. त्या ऐकायलाच तयार नव्हत्या. त्यांनी स्वतःच टाके घातले आणि ते खरोखर व्यवस्थित घातले नाहीत. हे काढायचे टाके होते ते काढल्यानंतर सानिकाच्या डोळ्यावर नक्कीच मोठी खूण राहणार होती.
डॉक्टर साने आल्यावर त्यांनी सानिकाला घातलेले टाके पाहिले आणि डॉक्टर शिल्पाला केबिन मध्ये बोलावून म्हणाले,
"तुम्हाला मी येतो असे सांगितलं ना तुम्ही इतकी घाई का केलीत?"
"सर मला स्वतंत्रपणे टाके घालायचे होते आणि सर मला जमलं टाके घालायला. आता मला जमणाऱ्या सर्वच गोष्टी स्वतः करायला आवडेल."
"हो पण तुम्ही स्वतःच्या हट्टाखातर ह्या मुलीला व्यवस्थित टाके घातलेले नाहीत."
नंतर बाहेर येऊन डॉक्टर सानेनी शीला आणि शरदाला पुढच्या आठवड्यात टाके काढण्यासाठी या असं सांगितलं. तिथून निघाल्यावर शीलाने आपला संताप व्यक्त केला.
"एक डॉक्टर असून कोणी असं कसं विचारू शकते. तुम्ही मसाला नाही भरला ना. अरे रक्त थांबवण्यासाठी पूर्वापार आपण हळद वापरत आलो आहोत. हिला हळदीचे गुणधर्म माहित नाहीत का. मी फक्त सानिका साठी गप्प राहिले. हिला डॉक्टर होण्यासाठी बरंच काही शिकायचं आहे. सर्वात आधी पेशंट्स शी कसं बोलायचं हे आधी शिकवावं लागेल."
(सानिकाला टाके काढायला घेऊन गेल्यावर शीलाला अजून काय ऐकावं लागेल पाहूया पुढील भागात)
