Login

हसावं की रडावं _ भाग १

एका आईला आलेला विचित्र अनुभव
जलद लेखन स्पर्धा _ मार्च २०२६

विषय _ मला आलेला विचित्र अनुभव

हसावं की रडावं _ भाग १


"वहिनी तुम्ही आणि ताई सहकुटुंब आल्यामुळे घर कसं अगदी भरल्यासारखं वाटतंय. ह्या तिन्ही मुलांना किती खेळू आणि किती नको असं झालंय. एरव्ही आपापल्या घरी तिघेही एकेकटे असतात." शीलाची धाकटी जाऊ वंदना तिन्ही मुलांकडे कौतुकाने पाहत बोलली.

"हो गं आमच्या दोघांच्याही शिक्षकाच्या नोकरीमुळे आम्हालाही सुट्टी असल्यामुळे निवांत येता आलं. आता सगळे मिळून मस्त धमाल करू. वंदना काय करायचं असेल ते अगदी मोकळेपणाने सांग मला. आपण दोघी मिळून सर्व करू. सरिता ताईंना माहेरपण उपभोगू दे."

"हो वहिनी नक्कीच. इतर कामासाठी कमलाबाई येतातच. जेवणाची पूर्वतयारी पण त्या करून देतात. त्यामुळे जास्त काही करायचं नसतं म्हणून तुम्ही पण आराम करा."

शाळेला मे महिन्याची सुट्टी लागली होती. सर्वांनाच थोडा बदल व्हावा म्हणून शरद आणि शीला त्यांच्या चार वर्षाच्या सानिकाला घेऊन त्याच्या भावाकडे अनिलकडे बोरगावला आला होता. बोरगाव तसे खेडेगावच होतं. अनिलने त्याच्या बहिणीला सरिताला आणि भाऊजी सतीशला पण आग्रहाने बोलावले होते. बऱ्याच कालावधीनंतर तिन्ही भावंडे एकत्र आली होती. सर्वांच्या गप्पांना ऊत आला होता. सानिका, अमेय आणि आयुष तिघेही खेळण्यात दंग झाले होते.

वंदनाने आज गोडधोडाचा स्वयंपाक केला होता. आधी लहान मुलांना जेवू घालायचे म्हणून तिघीही जणी मुलांना बोलवायला गेल्या. आधी ते अंगणात खेळत होते. मुलं जेवायचं म्हणून आतल्या खोलीत येऊन पुन्हा खेळायला लागली. वंदनाने पाहिलं तर मुलानी लादीवर फेस पावडर टाकली होती आणि तिघेही धावता धावता स्केटिंग करत होते. लादी खूपच गुळगुळीत झाली होती. इतक्यात सानिका घसरून जोरात पडली आणि पडताना तिला ड्रेसिंग टेबलचा कोपरा लागला. नशीब डोळा वाचला होता आणि डोळ्याच्या वर आडवी जखम झाली होती त्यातून भळाभळा रक्त वाहू लागले. ते पाहून शीला आणि दोघी घाबरून गेल्या. मुलं पण रक्त पाहून घाबरली. इतक्यात वंदना धावत जाऊन आतून हळद घेऊन आली आणि तिने वाहणाऱ्या
रक्तावर हळद दाबून धरली.

आवाज ऐकून बाहेरून शरद, अनिल आणि सतीश तिघेही धावत तिथे आले. सानिकाला वेदना सहन होत नव्हत्या आणि रक्त पाहून खूप रडू येतं होतं. तिच्या वेदना शीलाला पाहवत नव्हत्या. जखम खोल असावी म्हणून रक्त थांबत नव्हतं. सानिकाचा फ्रॉक, शीलाची साडी रक्ताने माखली होती. शीला रडवेल्या स्वरात अनिलला म्हणाली,

"अनिल इथे जवळपास डॉक्टर असेल तर लवकर आपण सानूला घेऊन जाऊया."

"हो वहिनी इथे जवळच एक लहान हॉस्पिटल आहे आपण तिथे जाऊया. थांब मी गाडी काढतो."

दुपारची वेळ असल्याने हॉस्पिटल मध्ये गर्दी नव्हती. साने हॉस्पिटल तसं लहानच होते. तिथे डॉक्टर साने आणि दोन सहकारी डॉक्टर असायचे. डॉक्टर साने कुठेतरी व्हिझीटला गेले होते.

(सानिकावर लगेच उपचार झाले अथवा नाही, शीलाला तिथे काय अनुभव आला पाहूया पुढील भागात)

क्रमशः

©️®️ सीमा गंगाधरे
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →