Login

हक्क      भाग १

भावाच्या व्यवसायात तोटा होताना पाहून वाटणी मागणारी बहीण आणि तिला पाठिंबा देणारी आई. भाऊ पुन्हा यशस्वी झाल्यावर त्याच्यावर हक्क दाखवू पाहणाऱ्या माय लेकीची गोष्ट नक्की वाचा.


हक्क      भाग १


@ आरती पाटील घाडीगांवकर
©® लघुकथा


" मोहन ss या दिवाळीत रियासाठी सोन्याच्या बांगड्या कर. खूप वर्षांनी तुझी लाडकी बहीण भाऊबीजसाठी येणार आहे. अजून सुद्धा काहीतरी महागड दे. ती पण खुश होईल. " रेवतीबाई आनंदाने म्हणत होत्या.

मोहन काही बोलणार तोच, मोहनचा फोन वाजला. त्यामुळे तो फोनवर बोलतच बाहेर निघून गेला. इकडे स्वयंपाक घरात निशाने रेवतीबाईचं बोलणं ऐकलं होत. तिच्या मनात धस्स्स झालं.

निशा - मोहनच्या लग्नाला आठ वर्षे झाली होती. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून निशाने मोहनची आई आणि बहिणीप्रति अति ओढ पहिली होती. लग्न झालेलं असताना, रिया माहेरची धुरा हातात धरून होती. मोहनसुद्धा सर्व रियाला विचारून करायचा. वडिलांचा व्यवसाय त्यांच्या मागे मोहनने मजबुतीने सांभाळाला होता. निशाचे वडील देखील व्यावसायिक असल्यामुळे निशा आणि मोहनच लग्न झालं. रिया नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांने मोहनकडून पैसे, महागडे गिफ्ट्स घेऊन जायची. मोहनही एकुलती एक बहीण म्हणून तिचे सर्व हट्ट पुरवायचा.

पण हळूहळू मोहनला व्यवसायात तोटा होऊ लागला. रियाचा नवरा देखील व्यावसायिक असल्यामुळे त्याच्या ओळखीतून ही गोष्ट कळाली. रियाने लगेच आईला म्हणजेच रेवतीबाईंना विश्वासात घेऊन वाटणी करायला मानवलं. रेवतीबाईंचा आपल्या लेकीकडे जास्त ओढा होता, त्यामुळे त्यांनी रियाला घरी बोलावलं आणि मोहन - निशासमोर वाटणीचा विषय काढला.

वाटणीचा विषय ऐकून मोहन चाट पडला.
" आई अगं वाटणी कश्याची ? बाबांनी ताईच्या लग्नात तिला भरपूर दिलं आहे. अगदी फ्लॅट आणि गाडी सुद्धा. मी सुद्धा तिला नेहमी काही ना काही देतोच. मग वाटणी कश्याची ? " मोहनने आश्चर्याने विचारलं.

" हे बघ मोहन, बाबांनी जे लग्नात दिलं ते त्यांच्या मनाने दिलं. ते यात जोडू नकोस. ह्या प्रॉपर्टी मध्ये माझा हक्क आहे, आणि तो मला हवाच आहे. " रिया टेचात म्हणाली.

" अगं ताई पण आधीच व्यवसायात थोडा प्रॉब्लेम सुरु आहे. प्रॉपर्टी अर्धी केली तर, लोन मिळणार नाही, ज्यांच्या कडून लोन घेतलं आहे, ते माझ्या मानेवर बसतील कारण लोन पेक्षा जास्त प्रॉपर्टी नसेल तर ते लगेच दारावर येतील, पैसे परत मागायला. " मोहन स्वतःची परिस्थिती सांगत होता.

" म्हणून तर आताच हिस्सा दे म्हणून सांगतेय. सर्व लॉस करून बसशील किंवा गमावून बसशील तर माझं सुद्धा मला मिळणार नाही. " रिया तुसडेपणाने म्हणाली.

" बरोबर बोलतेय ताई मोहन. अरे तिचं तिला देऊन टाक. उद्या प्रॉब्लेम नकोत. " रेवतीबाईंनी सुद्धा मोहनाची परिस्थिती समजून न घेता लेकीचीच बाजू घेतली.

" आई गं तू तरी मला समजून घे. लगेच काय ताईच्या बाजूने झालीस ? " मोहन किंचित रागाने म्हणाला.

" मोहन, मला कोर्टाची पायरी चढायला नको लावूस. जे माझं आहे, माझा ज्यावर हक्क आहे. ते मला हवंच. " रिया तोऱ्यात म्हणाली.

मोहनला मात्र आपल्या रक्ताच्या नात्यांचे रंग कळून चुकले. आपल्याच आई आणि बहिणी विरोधात उभं राहायची ताकद त्याच्यात नव्हती. त्यामुळे त्याने अर्धी प्रॉपर्टी रियाच्या नावे केली.

कर्जदारांच घरी येणं सुरु झालं, तसं रेवतीबाई 'थोडे दिवस रियाकडे पण जाऊन येते.' म्हणत तिथून निघून गेल्या.


क्रमश :


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →