Login

गुंतलेली वीण - भाग:१

Realistic
जलद लेखन स्पर्धा मार्च २०२६


सकाळचे आठ वाजले होते. स्वाती किचनमध्ये पोळ्या लाटत होती. तेवढ्यात प्रतीक स्वयंपाकघरात आला आणि आईला म्हणाला,

"आई, अगं माझा निळा शर्ट कुठेय? इस्त्री करून ठेवला होतास ना? की विसरलीस नेहमीप्रमाणे. माझी आज महत्वाची मिटिंग आहे.”

स्वाती पदराने घाम पुसत म्हणाली,

"अरे बाबा, कपाटाच्या दुसऱ्या कप्प्यात आहे बघ. रात्रीच करून ठेवलाय."

तेवढ्यात रेश्मा (सून) तयार होऊन बाहेर आली आणि म्हणाली,

"आई, आज ‘बुटीकमध्ये’ खूप काम आहे, यायला उशीर होईल. रात्रीच्या जेवणाचं तुम्ही बघून घ्याल ना? आणि हो, मोनाचा डबा विसरू नका! ती शाळेतून आल्यावर तिला डान्स क्लासला घेऊन जा.”

स्वाती हळूच म्हणाली,

"रेश्मा, आज जरा माझे गुडघे खूप दुखतायत गं, मला नाही जमणार रात्रीचा स्वयंपाक करायला.”

पण स्वातीचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच रेश्मा मोबाईलवर बोलत बाहेर पडली, "ओके आई, बाय!"

तेवढ्यात प्रतीकही आवरून आला आणि आईला म्हणाला,

"आई, चल मी पण निघतो. डब्याला काय भाजी दिली आहेस?”
“बटाट्याची भाजी दिली आहे.”
.
“बटाट्याची! दुसरी कुठली भाजी नाही बनवता येत का तुला? मला नको डबा. मी कॅन्टीनमध्ये खाईन काहीतरी.”

“अरे, काल रेश्माने भाजी आणली नाही, मग घरात बटाटा होता म्हणून तिच भाजी मी केली.”

“अग आई, तुला माहीत आहे ना रेश्मा तिच्या ‘बुटीकच्या’ कामात किती व्यस्त असते? तिला कुठे वेळ असतो भाजी आणायला? तूच आणायची भाजी. तू तर घरीच असतेस ना. चल, मी निघतो आता, बाय! संध्याकाळी भेटू या.”

स्वातीच्या डोळ्यात पाणी आले. तिने स्वतःच्या दुखणाऱ्या गुडघ्यांकडे पाहिले आणि हॉलमध्ये पेपर वाचत बसलेल्या नवऱ्याला म्हणाली,

“अहो, हल्ली माझे गुडघे खूपच दुखतात. आता स्वयंपाकघरातील कामे करताना उभं देखील राहवत नाही. आता मी सत्तर वर्षांची झाली. अजून किती दिवस मी स्वयंपाक करायचा?”
.
“स्वाती, याला जबाबदार तूच आहेस.”

“झाले तुमच चालू, आता मुलगा बोलून गेला. आता तुम्ही बोला. कोणाला माझी काळजी नाही का? जो तो आपापल्या कामात व्यस्त, मी एकटीच रिकामी. दिवसभर घरात राबते आहे.” असे म्हणून रागाने स्वाती आपल्या खोलीत गेली आणि विचार करू लागली खरच का ह्या सगळ्याला मी जबाबदार आहे. माझे वागण चुकीचे आहे का? मुलाच्या संसारात स्वतःला जास्तच गुंतवून घेतले का मी? माझ्या मैत्रिणी कशा मस्त सहलीला जातात नवऱ्यासोबत. मुलाच्या संसारात इतकी गुंतले की माझ्या संसाराकडे दुर्लक्ष केले का? कुमारला पण माझी गरज आहे हे मी विसरूनच गेले.

स्वाती आता सत्तर वर्षांची होती, पण तिच्या पाठीमागचे ‘आईपण’ अजून संपत नव्हते, म्हणण्यापेक्षा देवाला तिचे आईपण संपवायचे नव्हते; ती अजूनही आपल्या चाळीस वर्षांच्या मुलाचा-प्रतीकचा, त्याची बायको रेश्मा व त्यांची मुलगी मोना या तिघांचे ‘आईपण’ निभावत होती. प्रतीक एका कॉलेजमध्ये प्रोफेसर होता. तर रेश्माचे स्वतःचे ‘बुटीक’ होते. त्यांची मुलगी मोना शाळेत जायची. स्वातीचा सगळा वेळ घरातील, स्वयंपाकघरातील कामांत व नातीचे करण्यातच जात होता. स्वाती स्वत:साठी कधी जगलीच नव्हती. आता तिला आईपणाच्या प्रवासातून आता ‘निवृत्त’ व्हायचं होतं. पण तिला ते जमत नव्हते. आणि त्याला कारणीभूत ती स्वतःच होती.
स्वातीला संसारातून ‘निवृत्ती’ घायला का जमत नव्हते. ते वाचू या पुढच्या भागात.

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →