Login

सासूच्या सासूचे नियम ( भाग एक )

आजी सासूबाईंचे नियम सांगून धाक दाखवणाऱ्या सरलाताईंची गोष्ट

"काय सर्वांसमोर हसत बाहेर आलीस प्रतीक्षा.... अनोळखी पाहुणे आल्यावर आत मध्ये राहावे इतके सुद्धा कळत नाही का ???? त्यांच्या त्यांच्या गप्पा सुरू असतात घरातल्या मोठ्या लोकांसोबत... कशाला मध्ये मध्ये फिदीफिदी हसत बाहेर यायचं...?"

"अरेच्चा.... आता पाहुणे घरी आल्यानंतर त्यांच्यासमोर साधे उभे ही राहू नये का माणसाने...?? असा माणूसघाण पणा घरच्या सुनेने केलेला शोभतो का??? दुसऱ्यांच्या घरी ,"बाहेर या पाहुण्यांना भेटा" म्हणून सुनांच्या मागे लागतात आणि तुम्ही आतच बसा म्हणून सांगताय..."

"घरातली मोठी पुरुष मंडळी बोलत असतात ना... त्यांच्यासोबत तुला कशाला मध्येच पाहिजे चोंबडेपणा?? या घराचा नियम आहे हा... माझ्या सासूबाईंनी घालून दिला होता.. पाहुणे मंडळी आली की आत थांबावे... बोलवल्यावरच बाहेर यावे.. तसेही बाहेर काही काम नसते ...उगाच वाईट इम्प्रेशन पडते..."

"तुमच्या सासुबाई आदिवासी काळातल्या होत्या का??? कोणत्या काळातले नियम आहेत हे???"

"नियम म्हणजे नियम.... पाळायचे म्हणजे पाळायचे..." असे म्हणत सरलाताई तोंड वाकडे करत निघून गेल्या.

प्रतीक्षा ला कळतच नव्हते," हा काय नियम आहे... पाहुणे आले की बाहेर यायचं नाही... विचित्रच आहे जरा...
असो, आपल्याला काय.... तसेही पाहुण्यांच्या आचरट गप्पांमधून सुटका तरी मिळाली... काही ना काहीतरी विचारत राहतात , 'मूल कधी? विचार करा आता..' वगैरे वगैरे.... बरेच झाले.... नाही तर मी तशीही फॉर्मॅलिटीसाठीच पाहुण्यांसमोर जायचे .... तरीही यांच्या सासुबाईंचे नियम जरा विचित्रच आहेत.."असे मनातल्या मनात मनात प्रतीक्षा आपल्या कामाला लागली..

"अगं हे काय???? मातीने हात बरबटले आहेस..." एके दिवशी तिला सरलाताई ओरडत म्हणाल्या...

"अहो मी आपल्या अंगणामध्ये मस्त बटण गुलाबाचे झाड लावले... शेजारच्या वर्षा काकूंनी मला त्याचे रोप दिले होते सकाळी... तर त्यासाठी माती उकरावी लागली... त्यामुळे हात घाण झाले आहेत... मी आत्ता लगेच धुऊन टाकते ...तसाही मी हात कशाला लावलेला नाही..."

"कोण सांगितले आहेत नसते उपद्व्याप????आपण सगळी झाडे नर्सरीतून आणतो.. घरात कोणीही झाड लावायचे नाही.."

"नर्सरीतून आणलेले झाड चालते, पण घरात लावायचे नाही हा काय प्रकार आहे???"

"माझ्या सासूबाईंनी घालून दिलेल्या नियम आहे तो.... नियम म्हणजे नियम ....तो पाळायचाच ..."असे म्हणत सरला ताई निघून गेल्या..

"या आणि यांच्या सासुबाई... दोघीही विचित्रच दिसतात... नर्सरीतून आणलेली झाडे चालतात पण घरात लावायची नाहीत स्वतः ...हे जरा अतिच झाले..."

एके दिवशी,

"सतत काय केसात हात घालून बसतेस??? सारखा सारखा केसांमधून हात फिरवणे चांगले नाही... घरात दारिद्र्य येते..."

"काही काय सासूबाई ....केसात हात फिरवला की दारिद्र्य येते हे उज्वल ज्ञान कोणी सांगितले तुम्हाला???"

"फार चोंबडेपणा करू नकोस ....माझ्या सासूबाईंनी सांगितले आहे ...त्यांनी या घरांमध्ये नियम घालून दिलेला आहे.... सतत केसांमध्ये हात फिरवत बसायचा नाही.... नियम म्हणजे नियम... तो पाळलाच पाहिजे..."

सारखे सारखे चित्रविचित्र नियम ऐकून प्रतीक्षा चे डोके फिरायचे ... ती तिच्या नवऱ्याला सतत म्हणायची,

"तुझ्या आईचे आणि आजीचे नियम जरा विचित्रच आहेत नाही... काही लॉजिक नाही काही नाही ...धड अंधश्रद्धा ही म्हणू शकत नाही..."

तिचा नवरा हसत म्हणाला,

" का ग... काय झाले?"

"अरे म्हणजे बघ ना... मी पाळीच्या संदर्भात काही अंधश्रद्धा ऐकल्या होत्या, बघितल्या होत्या ,वाचल्या होत्या, काही देवा धर्माच्या बाबतीतला अंधश्रद्धा ही मला माहित आहेत, पण यांचे काहीतरी तिसरेच असते ....म्हणे, डोक्यात हात घालू नकोस ,पाहुण्यांसमोर येऊ नकोस, झाडे नर्सरीतूनच आणायची, असले बावळट नियम कोण बनवतं???
असं वाटतं की स्वतःच्या हट्टा पायी किंवा उगाच स्वतःचा काहीतरी वेगळाच मोठेपणा मिरवायला कुणीतरी नियम बनवले आहे..."

तिचा नवरा पुन्हा हसायला लागला...

"हसतोस काय??? अरे सांग ना तू तुझ्या आईला काहीतरी ... की तू ही असे काही फाजील नियम पाळतोस ???" प्रतीक्षा ने डोळे बारीक करून तिच्या नवऱ्याला विचारले.


"मला त्यातले काही फारसे माहित नाही बाई... मी जन्माला आल्यापासून बघतो आहे, आई आजीचे नियम पाळते .... तुला सांगत असेल आणि त्यातून काही नुकसान नसेल तर फॉलो कर ना तू पण..." असे म्हणून त्याने त्यातून हात काढून घेतला...

"शी बाई... काय बावळटपणा आहे..." असे म्हणत प्रतीक्षा परत वैतागली...

जेव्हापासून प्रतीक्षा या घरात लग्न करून आली होती तेव्हापासून तिच्या सासूबाई म्हणजे सरलाबाई, नाना विचित्र नियम तिला सांगत असत आणि पाळायचे बंधन हे ठेवत असत...

बरं नियम सुद्धा असे होते की,' ना सर ना पैर ' ....तिने ऐकलेल्या आजपर्यंतच्या अंधश्रद्धा मध्ये सुद्धा असले कुठले नियम नसायचे... पण यांच्याच घरी असले विचित्र नियम ऐकून ती वैतागली होती...

सरला ताईंच्या सासूबाई म्हणजेच प्रतीक्षा च्या आजीसासूबाई या दूर अकोल्याला गावी राहत... त्यांना वयोमानानुसार फारसे येणे जाणे व्हायचे नाही... त्यामुळे प्रतीक्षाचा आजी सासूबाई सोबत थोडा कमीच संबंध आला होता ... पण या सरला ताईंच्या बोलण्यावरून तिला असे वाटायचे की, बरेच आहे की त्या गावी राहतात...

एके दिवशी सरला ताईंच्या मुलीला म्हणजेच मीराला बघायला पाहुणे येणार असतात..
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →