Login

गोठलेलं मरणं- भाग : तीन

अंतिम इच्छा
लघुकथा लेखन स्पर्धा एप्रिल २०२६


"ठीक आहे सागर, आता एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करण्याची वेळ नाही.‌ तुला येणं शक्य नाही तर नको येऊ तू. पण आईची शेवटची इच्छा म्हणून तू दहा मिनिटे वेळ काढ आणि व्हिडिओ कॉलवरुन तरी तुझ्या आईशी बोल. त्यामुळे तुझ्यासाठी अडकलेला तिचा जीव शांत होईल आणि तुझा आवाज ऐकून ती शांतपणे प्राण सोडेल. तशी मी डॉक्टरांची परवानगी घेतो.”



“ठीक आहे बाबा. तुम्ही डॉक्टरांची परवानगी घ्या आणि मला कळवा. मी व्हिडिओ कॉलवरुन आईशी बोलीन”



दुसऱ्या दिवशी सकाळी सुनिल डॉक्टरांना भेटायला गेला आणि त्यांना म्हणाला,



“नमस्कार डॉक्टर, माझ्या बायकोचा जीव तिच्या मुलात अडकला आहे आणि मुलाचा जीव त्याच्या कर्मभूमीत.‌ त्यामुळे तो आईला भेटायला भारतात येऊ शकत नाहीये. मुलाच्या प्रेमापोटी माझ्या बायकोचे हे ‘गोठलेले मरण’ मला बघवत नाही. किती दिवस तिला असं व्हेंटिलेटरवर ठेवून वेदना द्यायच्या म्हणून डॉक्टर, मी तुमची परवानगी मागायला आलो आहे.‌ मी सागरला व्हिडिओ कॉल लावला आणि तो त्याच्या आईशी थोडा वेळ बोलला तर चालेल का? जास्त नाही, फक्त पाच मिनिटं. मला माहित आहे मधुरा व्हेंटिलेटरवर आहे. त्यामुळे त्याचा म्हणावा तसा उपयोग होणार नाही.‌ पण माझ्या बायकोची शेवटची इच्छा म्हणून मला सागरचा आवाज तिला ऐकवायचा आहे.‌ प्लीज, मला परवानगी द्या. त्यानंतर आपण व्हेंटिलेटर काढून टाकू म्हणजे ती शांतपणे प्राण सोडू शकेल.”



सुनिलचं बोलणं ऐकल्यावर डॉक्टरांनी त्याला आय. सी. यू मध्ये व्हिडिओ कॉल करण्याची परवानगी दिली.‌ सुनिलने सागरला व्हिडिओ कॉल लावला आणि मधुराच्यासमोर तो फोन धरला. आईच्या चेहऱ्यावरचा ऑक्सिजनचा मास्क आणि डोळे मिटलेल्या आईचा क्षीण चेहरा बघून सागरला रडू कोसळले. तो रडत रडतच आईला म्हणाला,



“आई मला माहित आहे तू माझ्यावर रागावली आहे. मी तुला भेटायला आलो नाही म्हणून. पण आई, माफ कर. मला खात्री आहे तू मला समजून घेशील. आई, एकदा शेवटचं डोळे उघडून बघ ना ग. तुझा सागर तुझ्याशी बोलतोय. तुला अश्या अवस्थेत मी नाही बघू शकत.”



असं बोलून सागरने व्हिडिओ कॉल बंद केला आणि तो‌ ढसाढसा रडू लागला आणि स्वतःशीच पुटपुटला,



“काय आयुष्य आहे माझं! आज माझ्याकडे एवढा पैसा आहे माझ्याकडे, पण माझ्या आईचा जीव माझ्या प्रेमासाठी, आवाजासाठी व स्पर्शासाठी अडकला आहे आणि मी मात्र काहीच करू शकत नाही.‌ हतबल आहे मी!”



आणि इकडे भारतात, आपल्या मुलाचा आवाज ऐकल्यावर मधुराच्या मिटलेल्या डोळ्यांतून अश्रू आले. आणि तिचा अडकलेला जीव शांत झाला.



©️®️ ज्योती सिनफळ.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →