लघुकथा लेखन स्पर्धा एप्रिल २०२६
“बाबा मला माहित आहे तुम्ही आणि आईने माझ्यासाठी किती कष्ट घेतलेत. पण तुम्हाला हेही माहिती आहे की मला कधीच अमेरिकेत यायचं नव्हतं. मला तुमच्या सोबत भारतातच राहायचं होतं. मला ‘आर्टसला’ जायचे होते. मला चित्रकलेची खूप आवड होती. मी खूप छान चित्र काढायचो. मला चित्रकार व्हायचे होतं; पण आईच्या व तुमच्या इच्छेखातर व आनंदासाठी मी सायन्सला गेलो. तुम्ही इंजिनिअर होऊ शकला नाही म्हणून, तुमची स्वप्नं माझ्यावर लादून मला इंजिनिअर बनवलंत.
“तुमच्या मित्राचा मुलगा अमेरिकेत शिकायला होता म्हणून तुम्ही मला अमेरिकेत पाठवले. आणि जेव्हा मी तुमच्या मर्जीनुसार अमेरिकेत इंजिनिअरचे शिक्षण घेतले, जेव्हा मला इथे नोकरी मिळाली, इथे मी स्वतःचे घर घेतलं, मला ग्रीन कार्ड मिळालं, तेव्हा तुम्ही आनंदी होता. तुम्हाला माझा खूप अभिमान वाटत होता, तुम्ही इथे येऊन राहिलात, अमेरिकेत फिरलात. आणि आता मला इथल्या जीवनशैलीची सवय झाली आहे. मी जे घर आणि कार घेतली आहे. त्याचे कर्ज माझ्या डोक्यावर आहे. माझी व माझ्या बायकोची नोकरी आहे. माझ्या मुलांना इथल्या शिक्षणाची, जीवनशैलीची सवय झाली आहे. हे सगळं सोडून, आता तुम्हाला गरज आहे म्हणून मी भारतात परत यावं, हे कसं शक्य आहे बाबा? तुम्हा दोघांना इथे रहा म्हटलं तर तुम्हाला इथे राहायचे नव्हतं!”
“हे काय बोलतोयस सागर? आम्ही काय तुझ्यावर जबरदस्ती केली होती का सायन्स घ्यायची? आणि केली असली तरी त्यामुळे तुझे काही वाईट झाले नाही. माझे स्वप्नं तू पूर्ण केले हे मान्य; पण त्यामुळे तुझे चांगलेच झाले ना! आर्ट्सला जाऊन तू मोठा चित्रकार झाला असतास कदाचित, पण आता एवढा पैसा, ऐषाराम व नाव मिळालंय ते मिळालं असतं का?
“ज्याची इच्छा असेल ना, तो आपल्या जन्मभूमीत परत येतोच. तुझी इच्छाच नाही परत यायची. तुला आता तिथल्या जीवनशैलीची सवय झाली ना. ऐषारामात जगतो आहेस. त्यामुळे हे सगळं बोलतो आहेस. तुला नसेल यायचं तर नको येऊ आणि तुझ्या पैशांची गरज नाही मला! माझी बायको गेल्यावर तिचे कार्य करायला मी समर्थ आहे; तिचे कार्य करण्याएवढे पैसे आहेत माझ्याकडे.”
“सॉरी बाबा, पण जरा प्रॅक्टिकली विचार करा, तुम्ही पण गाव सोडून शिक्षणासाठी, नोकरीसाठी शहरातच आलात ना. तुमच्या आईवडिलांची पण इच्छा होती तुम्ही गावाला येऊन राहावं, पण तुम्ही शहरातील नोकरी आणि शहरी राहणीमान सोडून गावी गेलात का? नाही, माझ्या शिक्षणासाठी, तुमच्या नोकरीसाठी शहरात राहिला ना.
“माझंही तसचं आहे बाबा. नुसती इच्छा असून उपयोग नसतो बाबा. इथली नोकरी सोडून तिथे येणं खूप अवघड आहे. आम्ही नोकरीचा (करार) केलेला असतो. मी भारतात आलो, तर मला, इथल्या पगाराएवढी नोकरी मिळणे अवघड आहे. माझी मुलं एन. आर. आय. आहेत, त्यामुळे भारतात आल्यावर त्यांच्या शाळेची फी दुप्पट होईल. सध्यातरी माझ्याकडे घर आणि कारचे कर्ज फेडण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत.”
मुलाच्या मनातील भावना ऐकल्यावर सागराचे वडील खूप दुःखी झाले.
सुनील आता काय निर्णय घेईल? वाचा पुढच्या भागात.
