Login

गोठलेलं मरणं - भाग: एक

अंतिम इच्छा

लघुकथा लेखन स्पर्धा एप्रिल २०२६


"डॉक्टर, काहीही करा पण तिला वाचवा! माझा मुलगा येतोय अमेरिकेहून...” सुनील आय.सी.यू. बाहेर डॉक्टरांचे हात धरून गयावया करत होता.



रात्रीचे बारा वाजले होते. संजीवनी हॉस्पिटलच्या त्या शांत कॉरिडॉरमध्ये फक्त सुनीलच्या हुंदक्यांचा आवाज घुमत होता. आय.सी.यू. रूमच्या काचेतून आत दिसणारी त्याची पत्नी, मधुरा, शेवटची घटका मोजत होती. आठ दिवसांपूर्वी तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. तेव्हापासून शुद्धीवर नव्हती, तरीही तिच्या ओठांची पुटपुट सुरू होती— ‘सागर... माझा सागर...’



तिचा जीव मुलात अडकला होता, पण अमेरिकेत असलेला सागर मात्र यायला तयार नव्हता. “बाबा, माझं करिअर आणि इथले प्रोजेक्ट्स सोडून मी लगेच कसं येणार?” हे त्याचं उत्तर ऐकून सुनीलच्या काळजात जणू सुरी खुपसली गेली होती.



आज आठ दिवस झाले मधुरा व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत होती, जणू मुलाच्या भेटीसाठी तिने प्राणांना अडवून धरलं होतं. तिचं मरण जणू तिथंच गोठून गेलं होतं. अखेर, हार मानून सुनीलने थरथरत्या हातांनी सागरला व्हिडिओ कॉल लावला.



सागरने फोन उचलला आणि तो कोरडेपणाने म्हणाला, “बोला बाबा.”



त्यावेळी रडत रडत सुनिल सागरला म्हणाला,



“अरे सागर, तुझी आई शेवटची घटका मोजत आहे रे! तू येतोस ना तिला भेटायला? तुझ्यात जीव अडकला आहे तिचा.”



“सॉरी बाबा मी तुम्हाला आधीच सांगितले ना! मला आता भारतात येणं शक्य नाही. सहा महिन्यांपूर्वी आई खूप आजारी होती, त्या वेळी मी येऊन गेलो ना? आता मला पुन्हा सुट्टी मिळणार नाही. आणि मी तिथे येऊन तरी काय करणार बाबा? तसंही आई आता व्हेंटिलेटरवर आहे. मी तिला आलेलो कळणार तरी आहे का?



“अरे असं काय बोलतोस सागर? तुझी आई आहे ती! तिचा जीव तुझ्यात अडकला आहे. ती जरी कोमात असली तरी तुझ्या शेवटच्या स्पर्शाने व आवाजाने ती तिचा शेवटचा श्वास सोडेल.”



"अहो बाबा, तुम्ही तरी समजून घ्या ना मला! आता भारतात येणं मला खरंच शक्य नाही. माझ्या नोकरीचा प्रश्न आहे हो; कोण सारखी सुट्टी देणार मला? आणि अमेरिकेहून तिथे येण्याचा खर्च किती आहे, हे बाबा तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही... तिचं काही बरं-वाईट झालं, तर सगळी कार्यं उरकून घ्या. माझी वाट पाहू नका. मी पैसे पाठवून देतो.”



“सागर, अरे सगळ्या गोष्टी पैशांनी नाही होत. आज तू जे वैभव उपभोगत आहेस, त्यासाठी तुझ्या आईने आणि मी खूप कष्ट घेतले आहेत. रक्ताचं पाणी करून आम्ही तुला मोठं केलं. परिस्थिती नसताना तुला अमेरिकेत शिकायला पाठवलं. शिक्षण झाल्यावर तुला तिथेच नोकरी मिळाली. त्यानंतर तू तुझ्या आवडीच्या मुलीशी लग्न केलंस आणि तिथेच कायमस्वरूपी राहण्याचा निर्णय घेतलास. तुझ्या आईने आणि मी तुला किती वेळा विनंती केली की भारतात परत ये... आता आम्ही म्हातारे झालो आहोत, आम्हाला तुझी खरी गरज आहे. आणि आता तर तुझी आई शेवटची घटका मोजत असताना तू सरळ ‘येणार नाही’ म्हणतोस? ती गेल्यावर तिचं कार्य मुलाऐवजी मला करायला सांगतोस? अरे, हे बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही रे?”



‌‌ यावर सागर काय बोलणार वाचा पुढच्या भागात. सागर खरंच इतका वाईट मुलगा असेल का? त्याला आपल्या आईविषयी काही वाटत नसेल का?




0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →