Login

गोड जिद्द भाग १

गोड जिद्द भाग १
गोड जिद्द

भाग १

" स्वराली, अगं काय हे ? माझ्या ओळखीच्या लोकांसमोर अक्षरशः नाक कापलं गेलं माझं ! लोक काय म्हणतील, नणंदेने आपल्या वहिनीचं प्रमोशन केलं आणि वहिनीने तर जळलेले, बसलेले कपकेक्स पाठवले ?
कशासाठी हा अट्टाहास केला होतास जर तुला नीट जमणार नव्हतं तर ?"
नणंद बाईंचा, शलाकाचा फोनवरचा आवाज स्वरालीच्या कानात गरम शिशासारखा टोचत होता.

स्वराली काहीच बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते. समोर ओव्हनमधून काढलेले ते चपट्या आकाराचे, कडक झालेले कपकेक्स जणू तिला हिणवत होते. खरं तर तिने पंधरा दिवस आधीपासून तयारी केली होती. सोसायटीतल्या दोन-चार छोट्या ऑर्डर्स यशस्वी झाल्यामुळे तिचा आत्मविश्वास आभाळाला भिडला होता.

पण शलाकाने तिच्या ऑफिसच्या एका मोठ्या पार्टीसाठी दिलेल्या या ऑर्डने तो आत्मविश्वास एका क्षणात मातीत मिळवला होता. ऐनवेळी व्होल्टेज कमी झालं की ओव्हनच्या टायमरमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला, स्वरालीला कळलंच नाही. पण तिची सगळी मेहनत कोळसा झाली होती.

" आई, तू रडतेयस का ? रडू नको ना..."

पाच वर्षांच्या नभाने तिचा ड्रेस ओढत, मोठ्या आशेने तिच्याकडे पाहत विचारलं. नभाला वाटलं होतं की आज तिला उरलेले कपकेक्स खायला मिळतील, पण आईचा उतरलेला चेहरा पाहून तीही बिचारी कोमेजली.

स्वरालीने घाईघाईने पदराने डोळे पुसले.
"नाही ग सोन्या, काही नाही. ते वाफ लागली डोळ्यांना म्हणून पाणी आलं."
तिने खोटं हसू चेहऱ्यावर आणलं, पण आतून ती पार कोलमडली होती.

त्या दिवसापासून स्वरालीने ओव्हनला स्पर्श करणं सोडून दिलं. किचनच्या एका कोपऱ्यात असलेलं ते मशीन आता तिला एखाद्या अपयशाच्या स्मारका सारखं वाटू लागलं. शलाकाचे ते शब्द,
'नाक कापलं गेलं माझं'
तिला रात्री झोपू देत नव्हते. ती हळूहळू एका अनामिक नैराश्यात जात होती. तिला वाटलं,

" कदाचित मी फक्त घरातल्यांसाठी स्वयंपाक करायलाच बनले आहे. व्यवसायाचं हे अचाट स्वप्न पाहणं हीच माझी मोठी चूक होती."

काही महिने असेच उदास गेले. एके दिवशी नभा शाळेतून आली ती रडतच. तिच्या शाळेत चित्रकला स्पर्धा होती. नभाने खूप उत्साहाने रंग भरले होते, पण तिला कोणतंच बक्षीस मिळालं नव्हतं. ती घरी आल्यावर आपला चित्रकलेचा पेपर चुरगाळून कोपऱ्यात फेकून देऊन रडत बसली.

स्वरालीने तिला जवळ घेतलं, तिचे केस कुरवाळले तिला प्रेमाने समजावून सांगू लागली,

" नभा, अगं बाळ, असं रडायचं नसतं. एक वेळ बक्षीस नाही मिळालं तर काय झालं ? आज तू हरली आहेस, मान्य आहे. पण एकदा तुझा तो पेपर नीट बघ. तुला तुझी चूक कळाली ना ?

तुझे रंग चित्राच्या रेषेबाहेर गेले होते म्हणून तुझे मार्क्स कापले गेले. आता रडण्यापेक्षा ती चूक समजून घे आणि पुन्हा सराव कर. बघ, पुढच्या वेळी नक्कीच तुला गोल्ड मेडल मिळेल!"

नभाने रडणं थांबवलं. तिने आपले मोठे, निरागस डोळ्यांनी आईच्या डोळ्यांकडे बघितलं.अतिशय शांतपणे विचारलं,

" आई, मग तू का हरून बसली आहेस ? तू पण त्या दिवशी शलाका आत्याच्या फ्रेंड्ससाठी केक बनवताना चूक केली होतीस ना ?
मग त्यानंतर तू परत केक का नाही बनवले ? मला सांगतेस चूक सुधारली की प्राइज मिळेल, मग तू स्वतःची चूक का नाही सुधारलीस?"

नभाचा तो प्रश्न एखाद्या धारधार सुरीसारखा स्वरालीच्या काळजात आरपार घुसला. ज्या मुलीला ती जिद्दीचे धडे देत होती, त्याच मुलीने तिला तिच्या दुबळेपणाचा आरसा दाखवला होता. स्वरालीकडे उत्तर नव्हतं. तिला जाणवलं की, आपण केवळ नणंदेच्या शब्दांना घाबरून स्वतःची कला गाडून टाकली आहे.

त्या दिवशी, संध्याकाळी स्वरालीने मोबाईल हातात घेतला. तिच्या एका जिवलग मैत्रिणीने स्टेटसवर प्रियांका चोप्राचा एक फोटो आणि त्याखाली एक वाक्य टाकलं होतं,
"अपयश ही जग थांबवण्याची खुण नाही, तर अधिक हुशारीने पुन्हा प्रयत्न करण्याची संधी आहे."

Don’t be afraid to fail, but be afraid of not trying again.

स्वरालीला वाटलं की हे वाक्य आणि नभाचा तो प्रश्न एकाच वेळी तिच्या आयुष्यात का आले? कदाचित नियती तिला सांगत होती की, उठण्याची वेळ आली आहे. तिने किचनच्या ओट्यावर जाऊन त्या ओव्हनवर साचलेली धूळ पुसायला घेतली. तिचे हात थरथरत होते, पण डोळ्यांत आता भीती ऐवजी एक जिद्द चमकत होती.

पुढच्या आठवड्यात स्वरालीने पुन्हा एकदा पिठ, साखर आणि कोको पावडर बाहेर काढली. यावेळी तिला कोणाला काही सिद्ध करायचं नव्हतं, तर तिला स्वतःच्या लेकीला दाखवून द्यायचं होतं की तिची आई हरलेली नाही.