शीर्षक:- गोची
भाग:- १
"मीनल, ए मिलन..आजचा चहा मिळेल की नाही." डोळ्यावरचा चष्मा आणि डोक्यावरचा पदर सावरत सासू सुमन सून मीनलला मोठं मोठ्याने आवाज देत होत्या.
"च्यॅक! सुरू झाली, यांची किटकिट! घड्याळात सात वाजत नाही तोपर्यंत यांना चहा लागतो." ती डोळे झाकूनच वैतागत पुटपुटली आणि शेजारची उशी कानांवर घेऊन पुन्हा झोपी गेली.
तिचा नवरा रूद्र फिरायला गेला होता. तो अजून दारात पाय ठेवत नाही तोच सुमनच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.
"तुझ्या बायकोने कानात बोळे घातलेत वाटतं. केव्हाची मी आवाज देतेय; पण हुं नाही की चू नाही. तिला काही ऐकू जात नाही की मुद्दाम करतेय, देव जाणे." रागाने त्या दोघांच्या रूमकडे बघत त्या म्हणाल्या.
"झोप लागली असेल, आई. बघतो मी." असे म्हणत तो लगबगीने त्याच्या रूममध्ये आला आणि तिला उठवू लागला,"मीनू, उठ लवकर. आईचा आवाज ऐकू येत नाही का तुला?"
"मच्, आला ऐकू. रोजचेच आहे हे आईंचे, त्यात काय नवीन? मला कंटाळा आलाय ओ रोज उठून तेच ते करण्याचा. झोपू दे ना, थोडावेळ." असे ती म्हणत ती कूस बदलून झोपली.
"उठ गं, मी अंघोळ करून येईपर्यंत तू उठायला हवीस." तो कपाटातून टाॅवेल काढून घेत तिला म्हणाला.
तिने हुंकार भरताच तो अंघोळीला निघून गेला.
"सूर्य डोक्यावर आला तरी महाराणी घोरत पडली आहे. आदल्या जन्मी कुंभकर्णाची औलाद होती का कोणास ठाऊक? माझंच मेलीच नशीब फुटकं म्हणायचे. सून असूनही एक कप चहासाठी तरसाव लागतं मला. असली बीनकामाची सून आहे म्हटल्यावर मलाच सगळी काम करावी लागतात." सुमन पदर सावरत बडबडत किचनमध्ये आल्या.
"चल बाई सुमन, स्वतःचा चहा स्वतःच बनव आता. आयुष्यभर तेच करत आले. सून आल्यावर तरी किचन सुटेल असे वाटलेलं; पण अशी बीनकामाची, कामचोर सून मिळल्यावर असंच होणार." त्यांनी बडबडतच चहाचे आधण ठेवत चहा ठेवला.
चहा होईपर्यंत त्यांनी किचनमध्ये सभोवताली नजर फिरवली. किचन ओट्याखाली त्यांची नजर जाताच त्यांच्या रागात अजून भर पडली.
तो मीनलच्या कानातला सोन्याचा झुमका होता.
"निष्काळजीपणाची पण एक हद्द झाली आता. सोन्याचे कानातले पडले तरी या पोरीला त्याचं काय नाही." त्या झुमक्याकडे पाहत त्या तनतनल्या.
त्यांनी तो उचलून हातात घेतला. चहाचा गॅस बंद केला आणि तरतरा मीनलच्या रूममध्ये आल्या. त्यात ती अजून उठली नव्हती, त्याचाही राग मनात होताच.
त्यांनी काहीच विचार न करता तेथील टेबलावर असलेला पाण्याचा जग उचलला आणि सरळ बक्कदिशी तिच्या तोंडावर
ओतला.
ओतला.
जोराने पाणी तोंडावर पडल्याने ती हडबडून उठली. तोंडावरील पाणी पुसत समोर पाहिले तर सुमन कमरेवर हात ठेवून नाकपुड्या फुगवत तिला पाहत होती.
तिने अंगावरील पांघरूण एका झटक्यात काढून फेकले आणि रागाने तिच्यावर वसकली,"ही कसली उठवण्याची तुमची पद्धत आहे, आई?"
"असे घोरत पडणाऱ्या सुनेला असेच उठवावे लागते. आवाज देऊन माझा घसा कोरडा पडला. मग काय करणार? आणि हे काय आहे?" त्यांनी झुमका दाखवत रागाने तिला विचारले.
क्रमशः
काय उत्तर देईल मीनल सुमनला?
