ग्लिच- भाग 8


"म्हणजे काय ताई??"

"म्हणजे महिन्यापूर्वीच्या जागेवरून निघालेला दगड आज या ठिकाणी असायला हवा होता.." तिने कागदावर एक जागा दाखवली.. "आणि प्रत्यक्षात तो या ठिकाणी आहे.." दुसरी जागा.. "फरक अगदी केसाएवढा वाटतो.. पण चंद्राच्या पलीकडच्या हिशोबात केसाएवढा फरक म्हणजे जमीन आणि आभाळ एवढा फरक.."

"ताई.. मला सरळ भाषेत सांगा.."

विद्याने काकांच्या डोळ्यांत बघितलं.. आणि एकेक शब्द तोलून मापून म्हणाली..

"जुन्या रस्त्याने गेला असता, तर हा दगड सरळ पृथ्वीवर आदळला असता.. समुद्रात किंवा किनाऱ्यावर.. लाखो माणसांचा जीव गेला असता.. आणि नव्या रस्त्याने तो जवळून निघून जाणार आहे.. काका.. कोणीतरी त्या दगडाला ढकललं आहे.. गेले तीन आठवडे.. रोज केसाच्या हजाराव्या भागाएवढं.. थोडं थोडं.. हळू हळू.."

काकांच्या अंगावर सर्रकन काटा आला..

"तीन आठवडे म्हणालात??" त्यांनी थरथरत्या हाताने पेटीचं झाकण उघडलं.. एकोणीस रेघा.. "ताई.. माझ्या रेघा पण तीन आठवड्यांच्याच आहेत.."

"तेच तर.." विद्याचा आवाज कापला.. "काका, ज्या ज्या क्षणी तो दगड जागेवरून सरकला, त्या त्या क्षणी जगातली वेळ अडखळली.. आणि वेळ अडखळली की तिचे हादरे सगळीकडे उमटले.. घड्याळांत.. मुंग्यांत.. सावल्यांत.. आणि तुमच्या बुटाच्या चकाकीत.. गाडी खड्ड्यातून गेली की हातातला चहा सांडतो ना.. तसंच.. विश्वाची गाडी गेले तीन आठवडे खड्ड्यांतून चालली होती.. आणि तो सांडलेला चहा फक्त तुम्हाला दिसत होता.."

_______________

त्याच दुपारी.. संस्थेत.. सावंत सरांची केबिन..

"सर, दगडाचा जुना रस्ता सरळ पृथ्वीवर येत होता.. नवा रस्ता बाहेरून जातो.. आणि हा बदल नेमका आपल्या एकोणीस वेळांनाच झाला आहे.. हा घ्या पूर्ण रिपोर्ट.."

सावंत सरांनी यावेळी मात्र फाईल उघडली.. आणि ते बराच वेळ वाचत राहिले..

"मॅडम नाईक.. तुमचे आकडे बरोबर आहेत.."

विद्याच्या जीवात जीव आला..

"पण निष्कर्ष साफ चुकीचा आहे.." सरांनी फाईल बंद केली.. "जुनी मोजमापंच चुकली असतील.. यंत्रांची चूक.. चूक सगळ्यांकडून होते मॅडम.. यंत्रांकडूनही होते.."

विद्या शांतपणे उभी राहिली.. आणि म्हणाली..

"सर.. चूक सगळ्यांकडून होते हे मला मान्य आहे.. पण चूक नेहमी वेडीवाकडी असते.. कधी इकडे झुकते, कधी तिकडे.. ही मात्र एकोणीस वेळा, तीन खंडांत, एकाच दिशेने आणि एकाच मापाने झाली आहे.. सर.. ही चूक नाही.. ही दुरुस्ती आहे.."

केबिनमध्ये क्षणभर शांतता पसरली..

"दुरुस्ती?? आणि ती कोणी केली म्हणे??" सर उपहासाने हसले.. "देवाने??"

"मला माहीत नाही सर.. पण मुंगीलाही कुठे माहीत असतं की रांग कोण चालवतं.. तरी रांग चालते, हे खरं असतं ना.."

"बास झालं..!!" सरांनी टेबलावर हात आपटला.. "हा रिपोर्ट बाहेर गेला तर अख्ख्या संस्थेचं हसं होईल.. अडखळलेली घड्याळं आपण छापू शकतो मॅडम.. ढकललेला दगड छापू शकत नाही.. फाईल बंद.. विषय बंद.."

_______________

"त्यांनी फाईल बंद करून टाकली ताई??" संध्याकाळी काकांनी विचारलं..

"हो.." विद्या स्टुलावर बसली होती.. आवाज एकदम सपाट झाला होता तिचा..

"ताई, मला एक गोष्ट कळत नाही.." काका पॉलिश करता करता म्हणाले.. "एवढं मोठं काम चाललंय.. आकाशातला दगड सरकवण्याचं.. मग त्याच्या खुणा टीव्हीवर का दिसल्या नाहीत? मोठमोठ्या शहरांत का दिसल्या नाहीत? फक्त माझ्या बुटात का??"

"त्याचं उत्तर एका दोनशे वर्षं जुन्या प्रयोगात आहे काका.." विद्या म्हणाली.. "विज्ञानातला सगळ्यात विचित्र प्रयोग आहे तो.. सूक्ष्म कण असे वागतात की जणू आपण त्यांच्याकडे बघतोय की नाही हे त्यांना कळतं.. कोणी बघत नसेल तर कण मोकळेपणाने वागतो.. एकाच वेळी सगळ्या वाटांनी जातो.. आणि कोणी मोजायला गेलं की मात्र तो एकच वाट धरतो.. शहाण्या मुलासारखा.. बघण्याने वागणं बदलतं.. हे हजारो प्रयोगशाळांत पुन्हा पुन्हा सिद्ध झालं आहे.."

"म्हणजे काय ताई??"

"म्हणजे असं काका.. या जगात दुरुस्ती करायची सगळ्यात सोपी जागा कोणती? जिथे कोणीच बघत नाही ती.." विद्याने स्टेशनच्या गर्दीकडे हात केला.. "हे बघा.. हजार माणसं चालली आहेत.. प्रत्येकजण मोबाईलमध्ये, घाईत, स्वतःच्याच डोक्यात.. आकाशाकडे कोण बघतं?? चकाकीकडे कोण बघतं?? कोणीही नाही.. फक्त एक माणूस.. ज्याच्याकडे हे जग ढुंकूनही बघत नाही असा एक माणूस.. रोज दहा तास चकाकीत बघत बसलेला.."

काका गप्प झाले.. त्यांच्या घशात आवंढा दाटून आला होता..

चाळीस वर्षं या रस्त्याने त्यांच्याकडे कधी वळूनही बघितलं नव्हतं.. आणि आज कळत होतं की नेमकं त्याचमुळे त्यांना हे सगळं दिसलं होतं.. ज्यांच्याकडे जग बघत नाही, त्यांनाच जग सगळ्यात नीट दिसतं..!!!

"सोमवारी रात्री बाराच्या सुमारास तो दगड पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येईल.." विद्या उठता उठता म्हणाली.. "संस्थेत त्या रात्री दुर्बिणीजवळ शंभर माणसं असतील.. मेघना असेल.. सावंत सरही असतील.."

"मग तुम्ही तिकडेच जाणार ना ताई??"

"नाही.." तिने पिशवी खांद्याला लावली.. "मी इथे येणार आहे.. तुमच्या या स्टुलावर.."

"अहो का?? एवढी मोठी दुर्बीण सोडून माझ्या बुटाजवळ??"

विद्या हसली.. आणि जाता जाता थांबून, मागे वळून म्हणाली..

"फडके मास्तरांचा नियम आहे काका.. रिळ बदलताना शेवटची खूण पडद्याच्या कोपऱ्यात येते.. आणि या अख्ख्या गावात.. पडद्याचा कोपरा एकच आहे.."

क्रमशः

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →