ग्लिच- भाग 7

चूक की दुरुस्ती?

पुढच्या तीन दिवसांत रेघा वाढतच गेल्या.. बारा.. पंधरा.. एकोणीस..

आणि रोज संध्याकाळी विद्याचा फोन ठरलेला.. "काका, आज किती रेघा? आणि किती वाजता?"

गुरुवारी रात्री साडेदहा वाजता काकांचा जुना फोन वाजला..

"काका.. जुळल्या.. एकोणीसच्या एकोणीस रेघा जुळल्या.. जगभरची घड्याळं नेमकी तुमच्याच वेळांना अडखळली आहेत.. मी तीन तीनदा तपासलं.. आता योगायोग म्हणायला जागाच उरलेली नाही.."

"मग चांगलंच झालं की ताई.. तुम्हाला पुरावा मिळाला.."

फोनवर बराच वेळ शांतता होती.. एवढी लांब की काकांना वाटलं फोन कटला की काय..

"ताई?? आहात ना??"

"काका.." विद्याचा आवाज एकदम खोल गेला होता.. "आता गोष्ट पुराव्याच्याही पुढे गेलीये.. मेघनाचा आत्ताच फोन येऊन गेला.. आमच्या दुर्बिणीला.. आकाशात.. काहीतरी सापडलंय.."

"काय सापडलंय ताई??"

"ते फोनवर सांगण्यासारखं नाही.." ती क्षणभर थांबली.. "काका.. उद्या सकाळी मी स्टॉलवर येते.. आणि येताना.. हे विश्व आपल्याला खुणा का दाखवतंय, त्याचं उत्तर घेऊन येते.."


"काका.. आकाशात दगड सापडलाय.."

शुक्रवारी सकाळी विद्या स्टुलावर येऊन बसली होती.. बबनने आणून दिलेल्या चहाला तिने हातसुद्धा लावला नव्हता..

"दगड म्हणजे?? कसला दगड ताई??"

"आकाशात फिरणारा दगड.. पस्तीस मीटरचा.. म्हणजे दहा मजली इमारत उभी करा, तेवढा मोठा.. आणि तो पृथ्वीच्या दिशेने येतो आहे.."

काकांच्या हातातला ब्रश जागच्या जागी थांबला..

"तो.. आपल्यावर पडणार??"

"नाही.. तेच सांगायला आले आहे मी.." विद्याने पिशवीतून कागद काढले.. "आमच्या गणिताप्रमाणे तो सोमवारी रात्री पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल.. चंद्राच्या आतून.. म्हणजे खूपच जवळून, पण जाईल.. धोका नाही म्हणून पेपरात आज आतल्या पानावर एक छोटीशी बातमीही आली आहे.. कोणी वाचलीसुद्धा नसेल.."

"मग तुमच्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन का ताई??"

विद्याने खोल श्वास घेतला..

"कारण काका.. हा दगड इतके दिवस कोणालाच का दिसला नाही माहितीये? तो सूर्याच्या बाजूने येतो आहे.. डोळ्यांवर ऊन आलं की समोरचा ट्रकसुद्धा दिसत नाही ना, तसंच दुर्बिणीचंही होतं.. तेरा साली रशियात असाच एक दगड उन्हाच्या बाजूने आला होता.. वीस मीटरचा.. तो आकाशातच फुटला, तरी खिडक्यांच्या काचा फुटून जवळजवळ पंधराशे माणसं जखमी झाली होती.. आणि हा दगड त्याच्या जवळजवळ दुप्पट आहे.."

"बापरे.."

"आणि आता नीट ऐका.." विद्याने आकड्यांनी भरलेला कागद पुढे केला.. "मी या दगडाचा रस्ता उलटा मोजून बघितला.. म्हणजे आज तो जिथे आहे तिथून मागे मागे जात, महिन्यापूर्वी तो कुठे होता तिथपर्यंत.. आणि काका.. गणित जुळत नाहीये.."

"म्हणजे काय ताई??"

क्रमशः

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →