बुधवारी सकाळी काकांनी नेहमीप्रमाणे पेटीच्या कोपऱ्यात साखर टाकली.. आणि ते बघतच राहिले..
मुंग्यांची रांग नेहमीसारखी आली.. आणि अचानक, कोणीतरी बटण दाबावं तशा, सगळ्या मुंग्या एकाच क्षणी जागच्या जागी थांबल्या..
अख्खी रांग.. पुतळ्यासारखी स्तब्ध..
"बबन.. ए बबन.. इकडे ये रे.. या मुंग्या बघ.."
"काका, मुंग्या काय बघायच्या त्यात?" बबन किटली सांभाळत लांबूनच ओरडला.. "गिऱ्हाईक बघा गिऱ्हाईक.."
काकांनी श्वास रोखून मनातल्या मनात आकडे मोजायला सुरुवात केली.. एक.. दोन.. तीन..
आणि बरोबर एकोणिसाव्या आकड्याला सगळ्या मुंग्या एकदम चालू लागल्या.. जणू काही झालंच नव्हतं..
काकांच्या पोटात खड्डा पडला.. मुंग्यांमध्ये कोणी सरदार नसतो हे त्यांना चाळीस वर्षांच्या बघण्यातून पक्कं माहीत होतं.. मग एकाच क्षणी या सगळ्यांना थांबवलं तरी कोणी??
गुरुवारी कबुतराची पाळी आली.. एक कबुतर झाडावरून उतरलं, पेटीजवळ आलं, दोनदा मान वाकडी करून उडून गेलं.. आणि मिनिटाभराने तेच कबुतर, त्याच फांदीवरून, अगदी त्याच पद्धतीने परत उतरलं.. परत दोनदा मान वाकडी.. जणू सिनेमाचा तोच तुकडा कोणीतरी परत लावला होता..
शुक्रवारी स्टेशनचं मोठं घड्याळ दुपारी अचानक चार मिनिटं पुढे गेलं.. आणि काकांनी डोळे चोळून परत बघेपर्यंत ते पुन्हा जागेवर आलं होतं..
आणि शनिवारी दुपारी तर हद्दच झाली..
आभाळ पूर्ण स्वच्छ होतं.. आणि अचानक स्टेशनसमोरच्या रस्त्याच्या फक्त एका बाजूला पाऊस सुरू झाला.. फक्त एका बाजूला.. दुसरी बाजू कोरडी ठणठणीत..
"बबन..!! बघ.. लवकर बघ..!!" काका ओरडले..
बबनने बघितलं.. जवळजवळ दीड मिनिट तो पाऊस पडत होता आणि मग थांबला..
"बघितलंस ना आता?? मग सांग, मी येडा आहे का??"
"काका.." बबन त्या कोरड्या रस्त्याकडे बघत चाचरत म्हणाला.. "ढगाची सावली असेल.. वाऱ्याने होतं कधी कधी असं.."
"अरे बबन, तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंस ना आत्ता??"
"जाऊदे ना काका.. आपल्याला काय करायचंय त्याचं.." असं म्हणत बबन किटली घेऊन निघूनही गेला..
काका बघतच राहिले.. माणसं स्वतःच्या डोळ्यांनी बघूनही मानत नाहीत.. कारण मानलं तर जग बदलावं लागतं.. आणि जग बदलण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यांना खोटं ठरवणं केव्हाही स्वस्त पडतं..!!!
त्याच रात्री घरात आणखी एक प्रकार घडला.. काकांनी झोपताना पंखा बंद केला.. पंखा फिरायचा थांबला.. पण भिंतीवरची पंख्याची सावली मात्र अजून तीन सेकंद फिरतच राहिली..
काका त्या सावलीकडे बघत तसेच उभे राहिले.. घशाला कोरड पडली होती..
जग बाहेरून जसंच्या तसं चालू होतं.. लोकल वेळेवर येत होत्या, भाजी महाग होत होती, गिऱ्हाईकं घाईत पळत होती.. पण या जगाच्या आतला कुठलातरी स्क्रू हळूहळू ढिला होत चालला होता.. आणि ते फक्त एका माणसाला दिसत होतं..
मग काकांनी एक काम केलं.. पेटीच्या झाकणाच्या आतल्या बाजूला त्यांनी खडूने रेघा मारायला सुरुवात केली.. प्रत्येक इचित्र घटनेची एक रेघ, आणि शेजारी ती घडल्याची वेळ..
बस.. मंगळवार, साडेनऊ..
मुंग्या.. बुधवार, सव्वासात..
कबुतर.. गुरुवार, पावणेपाच..
सावली.. शनिवार, पावणेअकरा..
मुंग्या.. बुधवार, सव्वासात..
कबुतर.. गुरुवार, पावणेपाच..
सावली.. शनिवार, पावणेअकरा..
आठ दिवसांत अकरा रेघा जमल्या होत्या..
