ग्लिच- भाग 3

चूक सापडली

तेवढ्यात स्क्रीनवर लाल अक्षरं चमकली..

TIME SYNC ERROR

विद्याने पटकन पुढे होऊन बघितलं..

"मेघना, इकडे ये.. हे बघ.. जपानचं अणुघड्याळ अडखळलंय.."

"मग? घड्याळच आहे ना ते.. बिघडलं असेल.." मेघना जांभई देत म्हणाली..

"अगं, ते आपल्या भिंतीवरचं घड्याळ नाही.. अणुघड्याळ तीस लाख वर्षांत एक सेकंदसुद्धा चुकत नाही.. आणि हे बघ.." विद्याचा आवाज एकदम बदलला.. "जर्मनी.. अमेरिका.. तिन्हीकडची घड्याळं एकाच क्षणी अडखळली आहेत.."

"म्हणजे??"

"म्हणजे मेघना.." विद्या स्क्रीनकडे बघत हळू म्हणाली.. "तीन वेगवेगळ्या देशांतली घड्याळं एकत्र कधीच बिघडत नसतात.. आणि तरी ती एकाच क्षणी अडखळली असतील, तर घड्याळांत काही बिघाड नाहीये.. वेळेतच काहीतरी बिघडलंय.."

"विद्या, काहीतरीच बोलू नकोस गं.."

"आधी वेळ नोंदवून घे.. आपल्या भारतीय वेळेप्रमाणे हे नेमकं किती वाजता झालं?"

मेघनाने हिशोब केला आणि म्हणाली..

"सकाळी साडेनऊ वाजता.."

_______________

आणि त्याच रात्री, स्टेशनमागच्या वस्तीतल्या आपल्या एका खोलीच्या घरात, काकांना काही केल्या झोप येत नव्हती..

शेवटी त्यांनी कपाटातून जुना बूट काढला.. रखमाकाकूंनी घेऊन दिलेला, लग्नानंतरचा.. जो ते फक्त सणावाराला घालायचे..

पॉलिश लावलं.. सम फटके मारले.. आणि पिवळ्या बल्बच्या उजेडात बुटाच्या टोकावर चकाकी आणली..

टोकात त्यांची खोली दिसायला हवी होती.. बल्ब, भिंत आणि त्यांचा स्वतःचा वाकलेला चेहरा..

पण टोकात त्यांची पेटी दिसत होती.. स्टेशनबाहेरची.. वडाच्या झाडाखालची.. आणि तीही भर दिवसाउजेडी..

आणि हे चित्रही तसंच होतं.. मंद नाही, धूसर नाही.. लख्ख.. जिवंत.. पॉलिशच्या आरशात कधीच दिसत नाही एवढं स्पष्ट..

पेटीसमोरच्या स्टुलावर एक बाई बसलेली दिसत होती..

निळी साडी.. खांद्याला मोठी पिशवी.. आणि पायात एकच चप्पल.. दुसऱ्या पायात नुसता मोजा..

काकांनी डोळे गच्च मिटून घेतले आणि परत उघडले..

बूट आता परत साधा बूट झाला होता.. टोकात बल्ब, भिंत आणि त्यांचा स्वतःचा घाबरलेला चेहरा..

ते भिंतीला टेकून बसले.. छाती धडधडत होती.. आणि त्या धडधडीच्या खाली, खोल कुठेतरी, चाळीस वर्षांपूर्वीची एक जुनी ओळख हळूहळू जागी होत होती..

टुरिंग टॉकीज.. फडके मास्तर.. प्रोजेक्टरची रिळं.. आणि रिळ संपत आलं की पडद्याच्या उजव्या कोपऱ्यात एका सेकंदासाठी चमकणारी ती पांढरी खूण.. जी अख्ख्या थेटरात फक्त रिळवाल्यालाच दिसते..

"दगडू, खूण बघणाऱ्याने झोपायचं नसतं.." फडके मास्तर नेहमी म्हणायचे..

काकांनी हातातल्या बुटाकडे बघितलं आणि स्वतःशीच हळू म्हटलं..

"कोणीतरी.. रिळ बदलतंय.."

आणि नेमका त्याच क्षणी खोलीतला बल्ब क्षणभर विझला आणि परत लागला..

पण बुटाच्या टोकातला बल्ब मात्र.. दोन सेकंद उशिरा विझला..!!!

क्रमशः

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →