ग्लिच- भाग 5

चुकलेली वेळ आणि भौतिकशास्त्र
आणि त्याच आठ दिवसांत, संस्थेत, विद्या नाईक झपाटल्यासारखी काम करत होती..

"मेघना, हे बघ.. मंगळवार साडेनऊ.. बुधवार सव्वासात.. गुरुवार पावणेपाच.." तिने स्क्रीनवर तारखा आणि वेळांची यादी लावली होती.. "जगभरची अणुघड्याळं नेमकी याच याच वेळेला अडखळत आहेत.. आठ दिवसांत अकरा वेळा.."

"विद्या, अगं सिस्टीमचा प्रॉब्लेम असेल दुसरं काय.."

"तीन खंडांतल्या, तीन वेगळ्या संस्थांच्या, तीन वेगळ्या सिस्टीम.. आणि त्या एकाच सेकंदाला चुकतात??" विद्याने मान हलवली.. "मेघना, घड्याळ चुकणं वेगळं आणि वेळ चुकणं वेगळं.. घड्याळ चुकलं तर ते एकटं चुकतं.. पण वेळच अडखळली, तर जगातली सगळी घड्याळं एकदम अडखळतात.. आणि नेमकं तेच होतंय.."

"मग सावंत सरांना सांग ना.."

सांगितलं.. आणि सावंत सरांनी चष्म्यावरून बघत एवढंच म्हटलं..

"मॅडम नाईक.. सायन्स फिक्शन वाचणं जरा कमी करा.." अख्ख्या केबिनमध्ये हशा पिकला.. "हा साधा डेटा एरर आहे.. रिपोर्ट बंद करा आणि कामाला लागा.."

विद्या केबिनबाहेर आली तेव्हा तिच्या डोळ्यांत पाणी तरारलं होतं.. पण तिने ते तिथल्या तिथे जिरवलं..

_______________

मंगळवारी सकाळी विद्याला विद्यापीठात व्याख्यान द्यायचं होतं.. आणि नेमका स्टेशनजवळ तिच्या चपलेचा बंद तुटला..

"अरे देवा.. आजच्या दिवशीच??"

तिने आजूबाजूला बघितलं, तर समोरच वडाच्या झाडाखाली पॉलिशवाले काका दिसले..

"काका, चप्पल शिवून मिळेल का?"

"शिवत नाही ताई, मी फक्त पॉलिश करतो.. शिवणारा पलीकडे बसतो, पण तो आज आलेला नाही.."

"बरं मग एक काम करा.. या पिशवीत बूट आहेत, ते तरी पॉलिश करून द्या.. अनवाणी पायांनी व्याख्यानाला कशी जाऊ मी?"

ती स्टुलावर बसली आणि पिशवीतून कागद काढून स्वतःशीच पुटपुटत वाचू लागली.. जाळं.. धाग्यांचं जाळं.. डोक्यातलं आणि आकाशातलं..

काकांनी तिच्याकडे बघितलं आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला..

निळी साडी.. खांद्याला मोठी पिशवी.. एका पायात चप्पल आणि दुसऱ्या पायात नुसता मोजा..

हीच ती.. रखमाकाकूंच्या बुटात दिसलेली बाई.. जशीच्या तशी..

काकांचे हात थरथरायला लागले.. त्यांनी कसाबसा डावा बूट उचलला.. पॉलिश लावलं, फटके मारले, चकाकी आणली.. आणि सवयीप्रमाणे बुटाच्या टोकात नजर टाकली..

टोकात, स्वतःच्या खांद्यामागच्या रस्त्यावर, एक रिक्षा उलटी चालली होती.. मागे मागे.. फिल्म उलटी फिरवल्यासारखी.. काकांनी मागे वळून बघितलं, तर खऱ्या रस्त्यावर तीच रिक्षा सरळ पुढे जात होती..

"मॅडम.." काकांच्या तोंडून आपोआप निघून गेलं.. "तुमच्या बुटात रिक्षा उलटी चाललीये.."

बाईचं वाचन एकदम थांबलं..

काकांनी डोळे मिटून घेतले.. आता ही पण हसणार.. उठून निघून जाणार.. किंवा जगतापला बोलावणार..

"किती वेळ उलटी चालली?"

काकांनी चमकून वर बघितलं.. बाई हसत नव्हती.. ती श्वास रोखून बुटाकडे वाकून बघत होती..

"दोन.. तीन सेकंद.."

"असं पहिल्यांदाच झालं का?"

"नाही.."

"मग कधीपासून होतंय??"

"मागच्या मंगळवारपासून.."

"मागच्या मंगळवारी नेमकं किती वाजता??" तिचा आवाज आता स्पष्ट कापत होता..

"साडेनऊ वाजता.."

विद्या ताडकन उभी राहिली.. तिच्या हातातले कागद खाली पडले..

गेले आठ दिवस जगातली सगळ्यात महागडी यंत्रं जे सांगत होती.. तेच हा माणूस पेटीच्या झाकणावर खडूने लिहीत होता..!!!

काकांनी पेटीचं झाकण उघडलं आणि आतली बाजू तिच्याकडे फिरवली..

अकरा रेघा.. आणि प्रत्येक रेघेशेजारी वेळ..

विद्या एकेक वेळ वाचत गेली.. आणि वाचता वाचता तिने तोंडावर हात ठेवला..

"काका.. हे.. हे तुम्ही कधी लिहिलंत??"

"जेव्हाच्या तेव्हा.. खूण दिसली की लगेच.. पण का ताई? काय झालं एवढं??"

विद्याने उत्तर द्यायला तोंड उघडलं..

तोच पेटीच्या कोपऱ्यातल्या मुंग्या, अख्खी रांग, दोघांच्या डोळ्यांदेखत पुन्हा एकदा पुतळ्यासारख्या थांबल्या..

आणि नेमक्या त्याच क्षणी विद्याच्या फोनवर मेघनाचा मेसेज चमकला..

It happened again. Right now..!!!

क्रमशः
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →