Login

मुलीचं करियर वगैरे वगैरे

करियर निवडतांना मुलगी म्हणून माझ्याकडून झालेल्या चुका आणि त्यातून घडत गेलेली मी
दहावीत असताना मी पास होईल हेच सर्वांसाठी खूप होते. त्यामुळे करियर वगैरे मी काय बनेल याबाबत फारसं काही ठरलेलं नव्हतं. मनात फक्त इतकं होतं की स्वतःच्या पायावर उभे राहायचं कोणाच्या जीवावर जगायचं नाही आणि कोणाची बोलणी खाऊ आयुष्य काढायचं नाही. 45 % मिळाले त्यातही इंग्रजीत 36 गुण मिळवून अगदी बॉर्डरवर पास झालेली. त्यामुळे अर्थातच घरच्यांनीही डॉक्टर किंवा इंजिनियर असा विचार माझ्यासाठी तरी केलाच नाही. म्हणून आम्ही सरळ अकरावीला कला विभागात दाखला घेतला. ही माझी पहिली चूक.

हो चूकच कारण मला आयुष्यात काहीतरी करायचं आहे याची जाणीव असतानाही मी फुकट दोन वर्ष वाया घालवली. त्यापेक्षा मी आयटीआय (ITI) मध्ये गेली असती तर मी माझ्या करिअरचे पायरी लवकर चढली असती असे मला वाटते. पण त्यावेळी आमच्या घरात किंवा आमच्या कुटुंबात इतकं शिकलेलं किंवा (स्त्री ) शिक्षणाविषयी प्रगल्भ दृष्टिकोन ठेवणारं कोणीच नसल्यामुळे मला योग्य मार्गदर्शन मिळाले नाही असेच मी म्हणणार. असो दुसरी चुक मी माझं पदवीधर शिक्षण झाल्यावर तेव्हा केली जेव्हा माझं मन मला म्हणत होतं तुला ट्रॅव्हलिंग क्षेत्रात जायचं आहे तरीही 2008 मध्ये एका ट्रॅव्हल एजन्सी मध्ये मी करत असलेली नोकरी सोडून दिली कारण घरच्यांना वाटत होतं की त्यामुळे माझं शारीरिक एक्झर्शन खूप होत आहे आणि आधीच बारकीशी असलेली मी लग्नाच्या बाजारात अगदीच टीव्ही पेशंट दिसत आहे.

कुछ तो लोग कहेंगे
लोगो का काम है कहना
वरना जिंदा कैसे रहेंगे?

हे तेव्हा मला कळलं नाही किंवा स्वतःसाठी ठामपणे उभे राहण्याची हिंमत माझ्यात नव्हती. असेही म्हटले तरीही चालेल. मी माझ्या स्वप्नपूर्तीसाठीच्या वळणा वरून माघार घेतली. का तर माझं लग्न करायचं वय झालं होतं? पण त्या काळी लग्नाच्या बाजारात मुलीची मिळकत + तिच्या बापाचीही मिळकत बघितली जात होती त्यामुळे अर्थातच पुढील चार वर्ष लग्न काही जमलं नाही. दरम्यान सरकारी नोकरी मिळावी म्हणून मी एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांसाठी क्लासेस लावले. ही माझी तिसरी चूक. आता मागे वळून पाहते तेव्हा वाटतं जितके पैसे आणि वेळ मी त्या क्लासेस तिथे जाण्या-येण्यात खर्च केले, तितके जर एखाद्या व्यवसायासाठी खर्च केले असते तर आज माझा स्वतःचा एखादा छानसा व्यवसाय असता. पण संशोधनात असे दिसून आले आहे की आपला मेंदू नेहमी आपल्याला सोपा मार्ग दाखवत असतो. कठीण मार्गावर चालण्यासाठी त्याला ट्रेन करावं लागतं. असो लग्न झालं, बाळ झालं. दरम्यान मी बरंच काही लिहू लागली होती. पण लिहून पोट भरता येत नाही हा एक गैरसमज मला फार भारी पडला. मी माझ्या लिखाणाकडे दुर्लक्ष करून प्रायव्हेट क्षेत्रात नऊ ते सहा अशी नोकरी स्वीकारली. ही माझी चौथी चूक.

सहा महिन्यातच पदरी लहान लेकरू व ती नोकरी करता करता मानसिक रित्या मी ढासळू लागले. एक वर्ष नोकरी करून मी परत सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करायचे ठरवले, कारण स्त्रियांसाठी सरकारी नोकरी चांगली असते असे ऐकण्यात होते. का ते तुम्ही आपापले संशोधन करून घ्या. तेव्हाही मला वाटतं मी एखादा व्यवसाय करायचा प्रयत्न करायला हवा होता किंवा माझ्या लिखाणालाच चालना देणारे पाऊल उचलायला हवे होते. असो 2017 मध्ये वयाच्या 31 व्या वर्षी मला एका निम सरकारी कंपनीत क्लर्क ची नोकरी मिळाली. चार-पाच वर्षे सगळं सुरळीत चाललं. मात्र चाळीशीत येता येता आपण कुठेतरी हरतो आहे असं सारखं वाटु लागलं आणि रोजच्या त्या रटाळ आयुष्याचा कंटाळा येऊ लागला. आता वाटतं ही नोकरी सोडून काहीतरी आपलं काम सुरू करावं. पण खरं बघितलं असता ही माझी पाचवी चूक असणार आहे.

आतापर्यंत मी इतकी परिपक्व नक्कीच झाली आहे की मला कळतं व वळतंही की मी कुठे चुकली आहे माझ्यासाठी काय योग्य व अयोग्य आहे. मी आधीच सांगितल्याप्रमाणे आपला मेंदू आपल्याला एखादी गोष्ट कठीण वाटत असल्यास ती सोडून द्यायचा सल्ला देतं. कारण त्याला कष्ट घ्यायचे नसतात. त्यामुळे तो कितीही म्हणत असला तरीही मी आता त्याच्या भोवऱ्या सापडणार नाही आणि परत एकदा घोळ चूक करणार नाही.

हे सर्व इथे सांगण्याचे कारण की आता दहावी बारावीचे निकाल लागून मुलांच्या करिअर निवडण्याची प्रोसेस सुरू झाली आहे. तेव्हा कितीही कठीण वाटत असेल, सोपे वाटत असेल तरीही विचार विनिमय करून आपलं अपत्य हे करू शकते, त्याचा अमुक अमुक गोष्टीत इंटरेस्ट आहे त्या सर्व गोष्टींची जुळवाजुळव करून त्याला डॉक्टर, इंजिनियर यापलीकडेही जाऊ द्या.

धन्यवाद.

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →