आषाढी एकादशीला रिया वारीचा ५ दिवसांचा पायी अनुभव घेऊन घरी परतली. तिची आई सुमती स्वयंपाकघरातून आली आणि रियाच्या थकेलेल्या पायाला तेल चोळू लागली.
सुमती: "काय गं माऊली! पाय खूप दुखतायत का?"
रिया: "पाय दुखतायत आई, पण मन खूप प्रसन्न आहे! वारीत लाखो लोकांचे मॅनेजमेंट पाहून आम्ही थक्क झालो. पण काल मला जाणवलं की जगातील सर्वात बेस्ट मॅनेजर तर तू आहेस! गृहिणी म्हणून तू वर्षानुवर्षे सुट्टी न घेता घर सांभाळतेस. तू आमच्या घराची अखंड वारकरी आहेस. तिथे प्रत्येकजण दुसऱ्याला 'माऊली' म्हणतो, तेव्हा मला कळलं की आईसारखं निस्वार्थी प्रेम दुसरं कोणीच करू शकत नाही."
सुमती: "कुटुंबाची काळजी घेणं हीच आम्हा गृहिणींची वारी असते. चला, वारीत जाऊन मुलगी शहाणी झाली! बरं, आज एकादशी आहे, भूक लागली असेल ना?
मी तुला खायला देते. काय देऊ साबुदाणा खिचडी की साबुदाणा वडा?"
रिया: "आई मी फक्त फळं खाणार आहे! आज मी डाएट करणार, कडक उपवास! मला फळं खाऊन बॉडी डिटॉक्स करायची आहे."
सुमती: (हसून) "बरं बाबा, कर डिटॉक्स! मी साबुदाणा वडा बनवलाय, तो बाजूला ठेवते."
अर्ध्या तासानंतर किचनमधून वड्यांचा खमंग सुवास सुटला. रिया हळूच किचनमध्ये डोकावली. सुमती ताटात गरमागरम वडे काढत होती.
रिया: (लाडाने) "आई, वड्यांचा सुवास खूप भारी आहे ग! उपवासामुळे वीकनेस वाटतोय, एकच वडा दे ना प्लिज!"
सुमतीने हसून ताट पुढे केले. रियाने एका ऐवजी तीन वडे आणि वाटीभर खिचडी संपवली.
सुमती: (टोमणा मारत) "काय गं माऊली! मघाशी कोण म्हणत होतं कडक उपवास करणार? रोजच्या जेवणापेक्षा आज जास्त खाल्लीस खिचडी. म्हणूनच म्हणतात—'एकादशी आणि दुप्पट खाशी!"
रिया: (जीभ चावत) "सॉरी आई! वारीत चालणं सोपं आहे, पण तुझ्या हाताच्या साबुदाणा वड्यासमोर स्वतःला रोखणं फार कठीण आहे!"
सुमती: "उपवास म्हणजे फक्त अन्नाचा प्रकार बदलणे नाही, तर जिभेवर ताबा ठेवणे पण असतं. वारीत जी शिस्त शिकलीस, ती रोजच्या व्यवहारात पण जपायला शिक."
रिया: "हो माऊली! पुढच्या एकादशीला मी खरोखरच जिभेवर कंट्रोल ठेवीन आणि घरात तुला मदत करून माझी 'घरची वारी' पूर्ण करेन!"
दोघी माय-लेकी खळखळून हसल्या.
