पुण्याजवळच्या एका छोट्याशा खेडेगावात राहणारे रोहन आणि सई नुकतेचं लग्नबंधनात अडकले होते. सईच्या घरी अंगणातचं मांडवाखाली त्यांचं लग्न साध्या पद्धतीनं पार पडलं होतं.
लग्नानंतर रोहन सईला आपल्या गावाकडच्या घरी घेऊन आला. यथासांग तिचा गृहप्रवेश झाला आणि दोन दिवसांनी सत्यनारायणाची पूजाही होऊन गेली. दोन जीव एकरूप झाले. नव्या नवलाईचे दिवस सरत होते. लग्नासाठी रोहननं घेतलेली सुट्टी संपत आली होती आणि काही दिवसांतच रोहन आणि सई त्याच्या नोकरीच्या ठिकाणी पुण्यात राहायला आले.
सईसाठी सगळंच नवीन होतं. आत्तापर्यतचं तिचं आयुष्य खेड्यातचं गेल्यामुळं पुण्यातल्या मोठ्या मोठ्या इमारती, गजबजलेले रस्ते, दुकानाच्या रांगाच्या रांगा आणि कधीही नं झोपणाऱ्या शहराची धावपळ पाहून सई थोडी गांगरून गेली होती.
रोहनला ते लक्षात आलं. त्यानं समजूतदारपणे सईचा हात हातात घेतला.
“घाबरू नकोस सई. मी आहे ना तुझ्यासोबत. होशील सेट इथे हळू हळू. सोसायटीत दोन चार ओळखी करून घे म्हणजे सोपं जाईल तुला."
सई मनमोकळं हसली. मनावरचा ताण जरा हलका आल्यासारखा वाटला तिला.
बघता बघता सहा महिने उलटले. लेकाचा संसार बघायला म्हणून सईच्या सासूबाईंचं शहरातल्या घरी आगमन झालं. सोबत त्यांची धाकटी मुलगीही होती. कविता तिचं नाव! आता घरात आई आणि कविताही असतील हे समजल्यावर सईला बरंच वाटलं. दिवसभर रोहन ऑफिसला गेला कि सईला वेळ कसा घालवायचा असं होऊन जायचं! आता तो प्रश्न काही दिवसांसाठी तरी मिटेल असं तिला वाटलं. त्या दोघी येणार कळतांच सई त्यांच्या स्वागताच्या तयारीत गुंतली.
दिवसभर राबून तिनं सासूबाईंच्या आवडीचा स्वयंपाक करून ठेवला. नणंदेला आवडेल असं घर आवरून सावरून ठेवलं. त्यांना आवडेल म्हणून छान आईस्क्रीम मागवलं आणि साडी नेसून, टापटीप आवरून त्यांच्या येण्याची वाट बघत बसली.
जरा वेळांत दोघी आल्या. सासूबाईंनी घरात पाऊल टाकताच सई नम्रपणे त्यांच्या पाया पडली. नणंदेला मिठी मारली. हसून छान स्वागत केलं.
“कायम सुखी रहा!"शारदाबाई म्हणाल्या खऱ्या पण त्यांच्या आवाजात आपुलकीपेक्षा औपचारिकपणा जास्त होता. सईला मात्र अजून ते काही लक्षात आलं नाही. सईनं त्यांच्या हातातलं सामान घेतलं आणि आत खोलीत नेऊन नीट ठेवलं. बाहेर येऊन थंडगार पाण्याचा ग्लास त्यांच्या हातात दिला.
पाणी घेता घेता कवितानं सईकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि हळूच आईला म्हणाली,
“होय आई? हिचं का आपली नवी वहिनी? लग्नात तर भारी चमकत होती. आता बघ मेकप केला नाहीये तर अगदी काळवंडलेली दिसते.”
सईने ते ऐकलं पण ती काही बोलली नाही. तिच्या मनाला मात्र ते बोलणं टोचून गेलं होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी सई लवकर उठून सगळ्यांसाठी चहा आणि नाश्त्याच्या तयारीला लागली. शारदाबाईंनी उठल्यावर चहा घेतला आणि लगेच नाराजी व्यक्त केली.
“सुनबाई असा चहा असतो का? इतका फिका? असा पाण्यासारखा पांचट चहा कोण पितं? साखर आहे ना घरात? घाल कि मग! काय हा चहा केलायस त्यात ना अद्रक ना वेलची! आमच्या घरात असं चालत नाही बरं का!"
सईच्या डोळ्यांत पाणी आलं पण तिने ते कसोशीनं लपवलं.
रोहन नेमका त्यावेळी अंघोळीला गेला असल्यामुळं त्याला हे काही ऎकूंचं गेलं नाही. थोड्यावेळानं तो ऑफिसला निघाला. जातांना सईचा निरोप घ्यायला खोलीत गेला तर तिचा उदास चेहरा पाहून त्याला कळेचना की नेमकं झालं तरी काय?
रोहन नेमका त्यावेळी अंघोळीला गेला असल्यामुळं त्याला हे काही ऎकूंचं गेलं नाही. थोड्यावेळानं तो ऑफिसला निघाला. जातांना सईचा निरोप घ्यायला खोलीत गेला तर तिचा उदास चेहरा पाहून त्याला कळेचना की नेमकं झालं तरी काय?
“सगळं ठीक आहे ना?” त्यानं विचारलं.
सईने हसण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
“हो हो. काही नाही झालं. मी ठीक आहे.” सई म्हणाली.
रोहन सईचा निरोप घेऊन निघून गेला पण त्याच्या मनात शंकेचं वादळ उठलं.
रोहन ऑफिसला गेला आणि घरी शारदाबाईंनी सईला वेठीस धरलं. तिला घरातली सगळी कामं एकटीला करायला लावली. त्या आणि कविता मात्र मोबाईलवर वेळ घालवत, हसत खिदळत निवांत बसल्या. दुपारभर ढाराढूर झोपल्या.
संध्याकाळ झाली. दिवसभराच्या कामानं आणि जाचानं वैतागून सई दमून भागून गॅलरीत उभी होती. तिच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते.
तेवढ्यात रोहन मागून आला.
तेवढ्यात रोहन मागून आला.
“सई, तू रडतेयस?"
सई काही बोलणार, इतक्यात घरातून शारदाबाईंचा आवाज आला,
सई काही बोलणार, इतक्यात घरातून शारदाबाईंचा आवाज आला,
“रोहन! तुझ्या बायकोला सांग, उद्यापासून घरात आमच्या नियमांप्रमाणेचं वागायचं!”
रोहन संभ्रमित झाला होता. त्याच्या एका बाजूला आई आणि दुसऱ्या बाजूला पत्नी होती! आता तो कोणाची साथ देणार? पाहू पुढच्या भागात.
क्रमशः…
©️®️सायली पराड कुलकर्णी
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
