गर्विष्ठ (भाग:-१)

सर्वांशी गर्विष्ठपणे वागणाऱ्या निरूपाबाईची कथा. त्यांच्या तशा वागण्याचे कारण जेव्हा प्रणाली आणि शिवदत्त यांना समजले तेव्हा त्यांनी काय केले जाणून घ्या या कथेत..


शीर्षक:- गर्विष्ठ

भाग:-१

"ए मुला, ही काय खेळायची जागा आहे का? चल पळ इथून." निरूपाबाई कॉरिडॉरमध्ये खेळणाऱ्या छोट्या सहिष्णूवर जवळजवळ खेकसत म्हणाल्या.

त्यांच्या मोठ्या आवाजाने आधी तो दचकला आणि नंतर "सॉरी आजी," असे पुटपुटत मान खाली घातली.

"ए मला आजी म्हणायचं नाही. उगीच नसलेली नाती जोडायची नाहीत, सांगून ठेवतेय." त्या पुन्हा त्याच्यावर ओरडल्या.

बिचारा डोळ्यांत पाणी आणत ओठ बाहेर काढत घरी आला.

"मम्मा, त्या आजी मला रागवल्या. इथे खेळायच नाही म्हणून माझ्यावर ओरडल्या." तो ओठ बाहेर काढत म्हणत हाताची घडी घालून सोफ्यावर बसला.

"अरे बाळा, तू नवीन दिसलास ना त्यांना म्हणून ते ओरडले असतील. ओखळ झाली की नाही रागावणार त्या." त्याची आई प्रणाली त्याला समजावत म्हणाली.

"तरी मी तुला म्हणत होतो, लगेच बाहेर खेळायला जाऊ नकोस म्हणून." त्याचे बाबा शिवदत्त सामानाचे खोके उचलत त्याला म्हणाले.

"काय हो, तुम्ही पण ना त्याला का रागवता? आधीच त्या आजीचा ओरडा खाऊन आलाय आणि आता तुम्हीही ओरडा म्हणजे पुन्हा तो अजून हिरमुसून जाईल." प्रणाली त्याला चिडून म्हणाली.

"हम्म, सहिष्णू आपण संध्याकाळी इथल्या बागेत जाऊ. जा आता आत तुझ्या खेळण्याचा बॉक्स व्यवस्थित आहे का बघ?" शिवदत्त त्याला जवळ घेत म्हणाला.

बागेत जायचे ऐकून सहिष्णू खुश झाला आणि आत निघून गेला.

शिवदत्तची बदली झाल्याने तो बिऱ्हाड घेऊन या अपार्टमेंटमध्ये नवीन राहायला आला. तो आणि प्रणाली दोघे मिळून सामान लावत होते. तो दिवस पूर्ण व्यस्त गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी प्रणाली कचारा बादली ठेवण्यासाठी दार उघडले तर समोर निरूपाबाई कुंडीतील माती व्यवस्थित करताना दिसल्या.

"नमस्कार काकू, आम्ही कालच इथे शिफ्ट झालोय." प्रणाली हसतमुखाने ओळख करून देत‌ म्हणाली.

"हा मग, मी काय करू?" निरूपाबाई एक कटाक्ष टाकत चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता कडक आवाजात म्हणाल्या.

एका क्षणात तिच्या चेहऱ्यावरच हसू मावळलं. पण तरीही ती तसेच हसरे भाव ठेवत म्हणाली,"अं..ऽऽ.. काही नाही, असंच ओळख करून घ्यावी म्हणून म्हणाले. या ना घरात एक कप चहा घ्या."

"मला काय एक कप चहा माझ्या घरात मिळत नाही का? चहासाठी तुझ्या घरी येऊ." निरूपणा कुंडीतील माती ठीक करत तिच्याकडे न बघताच खवचटपणे म्हणाल्या आणि तेथून उठून त्यांच्या दाराजवळ गेल्या.

"तसं काही नाही, काकू. मी तर..." प्रणालीचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत निरूपाबाईंनी घरात गेल्या आणि धाडकन तिच्या तोंडासमोर दार आपटले.

क्रमशः

निरूपाबाई असं का वागत असतील?

©️ जयश्री शिंदे


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →