अंतिम इच्छा
सरिता सुंदर आणि देखणी होती शिवाय ती शहरात वाढलेली सुशिक्षित मुलगी होती. तिने जीवनसाथी म्हणून सागरची निवड केली. सागर हा सुशिक्षित असला तरीही आईच्या शब्दाबाहेर नव्हता. आईने सरिताच्या आणि त्याच्या लग्नाला संमती दिली असली, तरीही सुनेने तीच्या मर्यादा पाळाव्या हे तिचं ठाम मत होते. तिने मंगळसूत्र गळ्यातून कधीही काढू नये. त्याचा मान राखावा मंगळसूत्र हे एक सुरक्षा कवच आणि संस्काराचा महत्त्वाचा धागा आहे. संस्कार ची ही शिदोरी सुनेने सांभाळावी ही त्यांची अंतिम ईच्छा होती.
सोबतच हातात तिने बांगड्या घालाव्यात आईच्या शब्दाला सागरनेही दुजोरा दिला. म्हणून सरिताचा नाइलाज झाला.
लग्न करून आल्यानंतर सागरच्या आईने सरिताला पारंपारिक एक जुना डबा दिला ज्यामध्ये वंशपरंपरेने सुनेने वापरण्यासाठी खानदानी सोन्याच्या बांगड्या होत्या. त्या बांगड्या तिने हातात घातल्या. पण मध्यरात्री तिला त्या बांगड्यांपासून हाताला त्रास होऊ लागला. तिचे हात जड झाल्यासारखा भास तिला होत होता. सुरुवातीला त्याकडे तिने दुर्लक्ष केले असले तरीही हळूहळू तो त्रास तिला जास्त होऊ लागला.
तिने सागरला सांगितले जेव्हापासून बांगड्या घातल्या तेव्हापासून तिला त्रास होत आहे. पण सागरने तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही. तिच्यावर रागावून त्याने तिला गप्प केले. तिचे ऐकणारा कोणीही नाही हे तिच्या लक्षात आले. पण यावर काय करायचे हे तिला सुचत नव्हते. हळूहळू तिचे हात खूप जखडल्यासारखे झाले आणि तिला कोणीतरी आपल्याला ताब्यात करत आहे असं वाटत होतं. ती स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न करत होती. पण सावरण्याऐवजी त्यामध्ये गुंतत चालली होती. हळूहळू तिला काहीतरी कुजबुज सुरू झाल्यासारखे वाटत होती.
आजूबाजूला तिला कोणीही दिसत नव्हते. पण काहीतरी आवाज येत होते. कोणीतरी तिला आवाज देत आहे असा भास होत होता. तो भास नव्हता तिला खरंच कोणीतरी बोलावत आहे. पण कोणी दिसत नाही, म्हणून ती या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नव्हती. पण दुर्लक्ष ही ती करू शकत नव्हती. यामुळे तिचे डोके बेधुंद होत होते आणि हात घट्ट कोणी बांधून ठेवल्यासारखे वाटत होतं.
आधी रात्री होणारा त्रास आता तिला दिवसाही होऊ लागला. तिला हवं ते काम ती करू शकत नव्हती. तिच्याकडून कोणीतरी जबरदस्ती काम करून घेत आहे असं तिला वाटत होतं. पण ती मनात नसतांना कोणीतरी तिच्या हातात दुसराच काम तिच्यावर लादत होतं. एक दिवस ती कंटाळून ती बांगड्यांकडे पाहत बसली. विचार करत होती त्या बांगड्या काढून फेकायच्या पण, सागरला राग येईल या विचाराने ती तसे करू शकत नव्हते. त्या बांगड्यांचे तिने एवढे निरीक्षण केले की हळूहळू तिला त्या बांगड्या मध्ये बांगड्यासंबंधी जुन्या आठवणी आठवू लागल्या. त्या बांगड्या वंशपरंपरागत ठेवा होत्या. त्या सागरच्या आजीच्या बांगड्या होत्या, जी स्वभावाने हट्टी आणि रागीट होती. त्यांच्या हातात ह्या बांगड्या होत्या आणि तिच्या मृत्यू हा नैसर्गिक नसून घातपात असल्याचे तिला जाणवले. त्यांचा घातपात सागरच्या आईने केला. ही गोष्ट त्यांनी घरातल्या सदस्यापासून त्यांना त्रास होऊ नये म्हणून लपवून ठेवली. पण सागरच्या आजी ह्या त्याच्या सुनेला सासरवास करत होत्या. आजी ह्या सुनेचा जीव घेण्यासाठी गेल्या होत्या, हीच त्यांची अंतिम ईच्छा अपूर्ण राहिली. तीच पूर्ण करण्याच्या हेतूने त्या सरिताला वर्चस्वात घेण्याचा प्रयत्न करीत होती. पण स्वतःचा जीव वाचवताना सागरच्या आईने आजीला जोरात धक्का दिला आणि ती कोपऱ्यात असलेल्या जात्यावर पडल्या. तिच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. हा घातपात नव्हता हे बचाव करण्यासाठी केलेला प्रयत्न होता. त्यामध्ये आजीचा मृत्यू झाला. आजीची आत्मा अतृप्त होती. स्वतःच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्या बांगड्याच्या माध्यमातून तिच्या सुनेचा म्हणजे सागरच्या आईचा मृत्यू पाहण्याची इच्छा अधुरी राहिली होती. जे त्यांना सरिता कडून करून घ्यायचे होते. त्यासाठी सरिता तयार नव्हती.
आजीच्या आत्म्याने सरिता वर पूर्ण वर्चस्व निर्माण केले. ती न कळत आता आजीसासूच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी निघाली. ती सासूच्या खोलीत गेली त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न ती करण्यास तेवढ्यात सागर घरी आला. सागर आल्याने सरिता डचकली पण अजूनही तिचे हात सासूबाईच्या खोलीच्या दरवाज्यावरच होते आणि तिच्या मनाची घालमेल सुरू होती. तिच्या मनातून आवाज येत होता, पुढे हो बदला घे...... हेच तुझे ध्येय आहे.....
पण तिचा स्वतःचा आत्मा तिला सांगत होता नाही तू हे.... तुझं काम नाही..... हे तू अशी नाहीस....
सागर तिला पाहून जरा जागेवरच थबकला त्याला तिचे बदलते रूप दिसू लागले. तिच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव होता, डोळ्यात एक प्रकारचे क्रूरता होती. तर कधीच तिच्या मनातील संवेदना तिच्या चेहऱ्यावर झळकत होत्या. द्विधा मनस्थितीत असल्याचे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.
"सरिता काय झालं तुला?" तो हळू आवाजात म्हणाला.
"सरिता काय झालं तुला?" तो हळू आवाजात म्हणाला.
सागर चा आवाज ऐकता सारिताच्या डोळ्यात पाणी आले. थोड्यावेळा ती स्वतःला मुक्त समजू लागली. पण काही क्षणातच तिच्या हात परत जकडायला लागले, बांगड्या खणखणल्या आणि पूर्ण घरात थंड हवा पसरली होती. आणि नंतर अचानक सागरच्या आईच्या खोलीचा दरवाजा बंद झाला.
पूर्ण शांतता पसरली भयानक शांतता.
सागर घाबरून दार उघडायला गेला, पण दार आत मधून बंद होतं. इकडे बाहेर सरिता थरथरत होती. तिच्या हातातील बांगड्या अचानक तुटायला लागल्या. एक-एक करून त्या जमिनीवर पडू लागल्या. प्रत्येक बांगडी फुटताना घरात एक वेगळीच किंकाळी तिच्या कानात घुमत होती.
शेवटची बांगडी फुटताच दार स्वतःहून उघडलं.
दोघेही आत धावत गेले…
सागरची आई खोलीत शांत बसलेली होती. तिचा चेहऱ्यावर प्रथमच अशी विचित्र शांतता आणि समाधान दिसत होते.
यामध्ये एक वेगळी गोष्ट झाल्याचे सरिताच्या लक्षात आले. तिच्या हातात जशा बांगड्या होत्या, तशाच बांगड्या तिच्या सासूच्या हातात तिला दिसल्या.
ती आश्चर्याने घाबरलेल्या आवाजात म्हणाली, "ह्या बांगड्या माझ्या आहेत.....
... माझ्या हातात होत्या.
ती उठली… आणि तिच्या आवाजात अचानक कडकपणा आला. अगदी तसाच, जसा सरिताला त्या दिवसांपासून ऐकू येत होता.
“सुनेने घरच्या परंपरा पाळाव्याच लागतात…”
तो आवाज ऐकताच सागरच्या डोळ्यात आश्चर्य दिसत होते. तो घाबरून स्तब्ध उभा राहिला होता त्याला स्पष्ट जाणवत होते की, त्याची आई ज्या प्रकारे बोलत आहे ती पद्धत त्याच्या आजीची होती आणि आईच्या डोळ्यात त्याला आजी स्पष्ट दिसत होती.
सरिता यातून पूर्णपणे मुक्त झालेली होती पण......
पण.......
पण......
बांगड्याने सागर च घर सोडलं होतं, की बांगड्यांनी दुसरं घर शोधलं होतं........
पण......
बांगड्याने सागर च घर सोडलं होतं, की बांगड्यांनी दुसरं घर शोधलं होतं........
