Login

विषारी स्पर्श : भाग २४.

.
फिरोझने तावीजच्या दोरीची दोन्ही टोकं आपल्या बोटांत अलगद पकडली होती… त्याचा श्वास जरा जड झाला होता… आता तो ती गाठ झीनतच्या गळ्यात बांधणार… आणि कदाचित त्यांच्या आयुष्यातील हे वादळ इथेच थांबणार…


पण…


अचानक...
झीनत झटकन मागे सरकली…


"फिरोझ थांब!!"


तिच्या आवाजात एक अनोखी कडवटपणा होता… तो आवाज ऐकून फिरोझच्या हातातील तावीज हवेतच थांबले… 


"ते तावीज समोरील टेबलावर ठेव… मी त्यासाठी पाक नाहीये…"


ती सावकाश बोलत होती… पण प्रत्येक शब्द जणू धारदार सुरीसारखा होता…


"मला अजूनही वाटतंय की माझं शरीर… माझा आत्मा… काहीच पात्र नाहीये…"


ती क्षणभर थांबली… तिच्या डोळ्यांत भीती आणि अपराधीपणाचं विचित्र मिश्रण होतं…


"तू येण्या आधी… मला पुन्हा तोच अनुभव आला… ते खरं होतं की… माझ्या भीतीचं सावट होतं… मला समजत नाही…"


खोलीत पुन्हा एकदा तीच गडद शांतता पसरली…


"तू खूप दमला आहेस फिरोझ… सकाळ पासून माझ्यासाठी धावत आहेस… माझ्या परिवाराची काळजी घेतो आहेस, तू आता घरी जा… मला थोडा वेळ दे… मी स्वतःला सावरते… मग मी ते तावीज स्वतः घालेन…"


तिचं बोलणं शांत होतं… पण त्यात एक अजब अंतर होतं… जणू ती त्याच्या पासून स्वतःला दूर करत होती… फिरोझ काही क्षण स्तब्ध उभाच राहिला… त्याच्या हातातील तावीज हळूहळू खाली झुकलं… त्याच्या मनात हजारो भावना एकदम उसळून आल्या.  राग… वेदना… असहाय्यता… आणि सगळ्यात जास्त.. एक गडद भीती त्याला खात होती…


"माझी झीनत अशी काय करतेय?… अजून किती दूर जाणार आहे माझ्या पासून?"


पण त्याला माहीत होतं… या क्षणी जर त्याने जोर दिला… तर ती आणखी दूर जाईल… त्याने एक खोल श्वास घेतला… आणि अत्यंत जड पावलांनी तो टेबलाजवळ गेला… रेशमी कापडात गुंडाळलेलं तावीज त्याने अलगद टेबलावर ठेवलं… त्याचे हात थरथरत होते…


त्या तावीजकडे पाहताना त्याला असं वाटत होतं... जणू तो तिचं रक्षण करण्याची एक संधीच टेबलावर ठेवून देतोय… तो पुन्हा वळला… झीनत समोर उभी होती… पण तिच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना नव्हती… पण तिची नजर… तटस्थ… थंड… आणि अनोळखी वाटू लागली होती. 


"फिरोझ…" ती पुन्हा बोलली…


"मी असं का वागतेय… हे मी तुला आत्ता सांगू शकत नाही…" ... तिचा आवाज आता थोडा मवाळ झाला होता…


"पण तू स्वतःला दोष देऊ नकोस…"
ती क्षणभर थांबली…
"तू आता तुझ्या घरी जा… काळजी करू नकोस मी कुठेच जाणार नाही… अम्मी-अब्बू तुझ्याशी संपर्कात असतील…"


आणि मग हळूच... तिच्यात बदल झाला.. जणू तिचे हृदय आतल्या आत आक्रंदत होते... पण ती बोलली.. 
"आणि… कृपया माझ्यावर रागावू नकोस… आणि स्वतःवरही"


त्या शेवटच्या वाक्याने फिरोझचं हृदय अक्षरशः दुभंगलं… तो हळूहळू तिच्या जवळ गेला…  तिचा हात आपल्या हातात घेतला… क्षणभर त्याने तिच्याकडे पाहिलं… त्या नजरेत हजारो प्रश्न होते… पण एकही शब्द नव्हता… त्याने तिच्या हातावर अलगद ओठ टेकवले… तो स्पर्श शीतल आणि शांत होता… पण त्यात एक न बोललेली वेदना होती… झीनतने मात्र नजर वळवली… तो क्षण… दोघांच्या नात्यात एक खोल दरी निर्माण करून गेला…


"ठीक आहे झीनत…"


फिरोझचा आवाज जरी शांत होता… पण तो आतून पूर्णपणे कोसळला होता…


"येऊ मी ?… पण झीनत मी अपेक्षा करतो मी सांगितलेल्या सगळी गोष्टी तू पाळशील…"


तो थोडा थांबला… घुटमळला... 
"आणि प्लिज … ते तावीज… तू गळ्यात घालशील माझ्यासाठी…"


त्याने शेवटचं वाक्य जणू स्वतःलाच धीर देण्यासाठी म्हटलं… आणि मग… तो वळला… झीनतच्या खोलीचा दरवाजा हळूच उघडला… आणि फिरोझ बाहेर आला… हॉलमध्ये अम्मी आणि अब्बू शांत बसले होते… त्यांच्या नजरा दाराकडेच लागल्या होत्या… फिरोझ बाहेर येताच अम्मीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं… एकच नजर… आणि तिला सगळं कळलं…


"बेटा फिरोझ…"
ती हळूच उठली…


"तू काळजी करू नकोस… मला माहित आहे झीनतने तुझं ऐकलं नसेल…"


तिच्या आवाजात माया होती… समजूत होती…
"मी आहे ना… मी तिची काळजी घेते… तू आधी जेवून जा…"


फिरोझने हलकेच डोकं हलवलं…
"नको अम्मी… मी घरी जाऊन जेवेन…"


तो शांतपणे म्हणाला…
"तुम्ही फक्त एक काम करा… झीनतला ते तावीज गळ्यात घालायला सांगा… आणि काही दिवस तिला बाहेर जाऊ देऊ नका…"


तो अब्बूकडे वळला…
"अब्बू… स्वतःची काळजी घ्या, चिडचिड करू नका…"


त्याच्या नजरेला अब्बूची नजर भिडली… त्या नजरेत राग होता… अस्वस्थता होती… त्यांच्या ओठांवर जे येत होते ते प्रयत्नाने आवंढा गिळत दाबून टाकत होते. 


क्षणभर असं वाटलं... अब्बू काहीतरी बोलणार…


पण फिरोझने आधीच शब्द पूर्ण केले...
"मी रोज येत जाईन… ऑफिसवरून… अब्बू तुम्ही शांत राहा"


तो थोडासा थांबला…
"अल्लाह हाफिज…"


तो वळला… आणि दाराकडे चालू लागला… त्याचे पाऊल जड झाले होते… दार उघडलं… बाहेरची थंड हवा त्याच्या चेहऱ्यावर आली… तो एक क्षण थांबला… मागे वळून पाहावं… की सरळ निघून जावं… मनात प्रचंड संघर्ष सुरू झाला… पण… त्याने डोळे मिटले… आणि… मागे न पाहता… तो बाहेर निघून गेला… 


दार हळूच बंद झालं… आणि घरात पुन्हा एकदा गूढ शांतता पसरली… टेबलावर ठेवलेलं ते तावीज… अजूनही झीनत ने न स्पर्शलेलं…


पण… खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने… त्या रेशमी कापडाचा एक कोपरा हलकासा हलला…


अस्वस्थ मनाने फिरोझने घरातून बाहेर पाऊल टाकले… दार हळूच बंद झाले… आतल्या प्रकाशाचा एक कवडसा क्षणभर त्याच्या पायाशी पडला… आणि लगेच अंधाराने तो गिळून टाकला…


अम्मीचा हलकासा “खुदा हाफिज…” कानावर पडला… पण फिरोझच्या कानात मात्र अजूनही झीनतचे शब्द घुमत होते… तो काही क्षण त्या बंद दरवाज्याकडे एकटक पाहत उभा राहिला… जणू काही... तो दरवाजा पुन्हा उघडेल… झीनत धावत बाहेर येईल… आणि त्याला थांबवेल… पण… काहीच झाले नाही… त्याने एक खोल श्वास घेतला… आणि वळला…


पण तो रस्त्याकडे वळताच... एक काळी मांजर झपकन त्याच्या समोरून गेली…  त्याचा पाय अडखळला… क्षणभर त्याचे हृदय थांबल्यासारखे झाले…
"च्याऽ…!" तो चिडून पुटपुटला…


त्याने त्या पळणाऱ्या मांजरीकडे रागाने रोखून पाहिले… ती पुढच्या गल्लीत वळली… आणि अचानक... थांबली… हळूहळू मागे वळली… तिचे डोळे... लालभडक झाले… जणू निखाऱ्या सारखे पेटलेले… ती फिस्कारली… अंधारातही तिचे तीक्ष्ण दात चमकून गेले.. 


तिच्या तोंडून निघालेला तो आवाज… साधारण नव्हता… त्या आवाजाने फिरोझच्या पाठीवर सरसरून काटा आला… क्षणातच ती मांजर अंधारात विलीन झाली… फिरोझचा हात नकळत गळ्यातील तावीजवर गेला… त्याला स्पष्ट जाणवले.  तावीज तापले आहे… जणू आत काहीतरी धगधगत आहे… त्याने घाबरून हात मागे घेतला…


"या अल्लाह…"
त्याच्या ओठांतून हळूच शब्द बाहेर पडले… 


त्याला समजले... हा साधा योगायोग नाही… काहीतरी… काळंबेरं येथेच दबा धरून बसलेय...  तो वेगाने चालू लागला… रस्त्यावर येताच त्याने पटकन एक रिक्षा थांबवली… 


"चलो…" तो थोडक्यात म्हणाला…


रिक्षा सुरू झाली… शरीर पुढे जात होतं… पण मन…? मन अजूनही त्या घरात अडकून पडलं होतं… झीनतच्या खोलीत… त्या टेबलावर ठेवलेल्या तावीज जवळ… रिक्षा वेगाने धावत होती… रस्त्यावरील दिवे एकामागून एक मागे सरकत होते… आणि त्या धावत्या प्रकाश छटांमध्ये फिरोझच्या आठवणी जाग्या झाल्या…


झीनत बरोबरची पहिली भेट…


झीनतचा निरागस हसरा चेहरा… तिच्या डोळ्यांतील निरागस चमक… पहिल्यांदा तिच्याशी बोलताना झालेली घालमेल… हळूहळू वाढत गेलेली ओढ… ती हुरहूर… आणि मग... हाजीअलीचा समुद्र… लाटांच्या साक्षीने चालताना… हातात हात गुंफलेले… त्या क्षणी धडधडणारे हृदय…


"झीनत… मला काही सांगायचं आहे… माझे तुझ्यावर प्रेम आहे" ... त्याचा आवाज आठवला…


आणि तिचे डोळे… ते ऐकून झीनतला आलेले अश्रू… ती रडली होती… पण त्या रडण्यात आनंद होता… त्यानंतर... ते बॅण्डस्टॅण्डला गेले होते… खडकांवर आदळणाऱ्या लाटा… वाऱ्यात उडणारे तिचे केस… आणि त्या क्षणी उमललेलं त्यांचं प्रेम…


ते सगळं आठवताच... फिरोझच्या डोळ्यात पाणी तरळलं… त्याने हाताच्या कडांनी ते पुसलं… पण हृदयातील दुःख काही पुसलं गेलं नाही… रिक्षा अजून वेगात धावत होती… वारा त्याच्या केसांशी खेळत होता… आणि त्या वाऱ्याबरोबर...  एक प्रश्न त्याच्या मनाला छळत होता…


"मग चुकलं कुठे आणि कुणाचे …?"


 तो स्वतःलाच विचारत होता… आणि अंतर्मन उत्तर देऊ लागलं…


"झीनत बदलायला लागली होती…"


मनातील तो विचार हळूहळू स्पष्ट होत गेला…


"तिचं वागणं… तिचा बोलण्याचा लेहजा… सगळे बदलले... आदर गेला अरेरावी आली.. बेफिकिरी वाढली"


नवीन मित्र मैत्रिणी… बाहेरच्या राज्यातून आलेले लोक… स्वातंत्र्याच्या नावाखाली चालणारे त्यांचे वेगळेच आयुष्य… 
"मला खटकत होतं सगळं…"
तो स्वतःशीच कबूल करत होता…


"तिच्या डोळ्यांत आता सुरम्याऐवजी आय लायनर दिसू लागला…"


"तिच्या आवाजातला तो आपलेपणा कमी होऊ लागला…"
"आणि एक दिवस…"


त्याचा श्वास अडखळला…


"तिच्या मोबाईल मध्ये आपण फोटो पाहिले…"
तिने गुपचूप अटेंड केलेल्या खाजगी पार्टीचे… तिच्या उत्तान वेषाचे… आणि तिच्या भोवती गोळा झालेलया अनोळखी लोकांचे… त्या दिवशी...  त्यांच्यात पहिल्यांदा मोठं भांडण झालं होतं…


"तू मला का नाही सांगितलं…? झीनत, हे सगळं तुला शोभतं का…? आपल्या पवित्र प्रेमात हे बसत नाही... आणि आपले संस्कार यातील काहीच नाही शिकवत"
 
त्याचेच शब्द त्याच्या कानात पुन्हा घुमले…


"मी काही चुकीचं करत नाही फिरोझ! थोडे स्वातंत्र्य उपभोगले तर तुझ्यातील पुरुषाला खटकले"


तिचा राग… तिचा हट्ट… तिचं स्वतःचं स्पष्टीकरण… आठवून तो अस्वस्थ झाला... त्या दिवसानंतर... त्याने स्वतःला थोडं दूर केलं… या भावनेने की ... 


"कदाचित ती माझ्या भावना समजून घेईल…"
"कदाचित तिच्यात बदल होईल…"


"पण… आज जे घडलं… ते सगळं... त्या छोट्याशा अंतरातूनच वाढत गेलं का…?" 


रिक्षा एका वळणावर झटक्यात ब्रेक लागल्याने थांबली… फिरोझ भानावर आला… त्याने आजूबाजूला पाहिलं… एक ट्रक ओव्हरटेक करत पुढे गेला...