Login

विषारी स्पर्श : भाग २३.

.
झीनत घाबरून अंग चोरत बेडच्या कोपऱ्यात आणखीन सरकत होती. तिने दोन्ही हातांनी उशीला घट्ट मिठी मारली होती. जणू तीच तिची एकमेव ढाल होती. तिचे डोळे… ते डोळे आता फिरोझकडे पाहत होते. पण त्या नजरेत ओळखीपेक्षा संशय जास्त होता… जणू समोर उभा असलेला माणूस तिच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होता.


तो नजारा… फिरोझच्या हृदयाला आतून विदीर्ण करून गेला.


"ही… ही माझी झीनत आहे…? जी माझ्यावर जीव ओवाळून टाकायची… आज तीच मला अशा नजरेने पाहतेय…?"


त्याच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं. ओठ थरथरू लागले… पण तो स्वतःला आवरत होता. त्याच्या मनात विचारांचा महापूर उसळला. 


"आता काय करावं?… अम्मीला बोलवावं का?… पण… झीनतशी बोलायचं आहे… तिला सगळं समजावायचं आहे… तिला तावीज घालायचं आहे…"


त्याची तगमग वाढत चालली होती. शेवटी... एक दीर्घ श्वास घेत… त्याने आपल्या डोळ्यांतलं पाणी अलगद टिपून घेतलं… चेहऱ्यावर एक हलकंसं, पण जबरदस्तीचं हसू आणलं… आणि तो पुन्हा तिच्याकडे वळला. आपल्या आवाजात सगळी कोमलता ओतत बोलला... 


"झीनत !! मेरी जान झीनत!!! बघ मी आलोय तुला भेटायला... अशी काय माझ्यावर रागावली आहेस? बोल ना माझ्याशी..."


त्या हळुवार आवाजाने… जणू काही तिच्या मनावरचा एखादा पडदा हलू लागला. झीनतच्या चेहऱ्यावरच्या ताणलेल्या रेषा हळूहळू मोकळ्या व्हायला लागल्या… डोळ्यांतील संशय वितळू लागला… त्या नजरेत… हळूहळू… ओळख परतू लागली… ती त्याच्याकडे एकटक पाहत राहिली…


आणि मग... अचानक तिच्या ओठांवर एक हलकंसं, थरथरतं हसू उमटलं… पण त्या हसण्या बरोबरच तिच्या डोळ्यांतून दोन टपोरे अश्रू गालांवरून ओघळले… त्या अश्रूंमध्ये साचलेली वेदना… अपराधीपणा… आणि प्रेम... सगळं एकदम बाहेर पडलं. क्षणाचाही विलंब न लावता तिने आपल्या हातात घट्ट पकडलेली उशी दूर फेकून दिली… आणि... आपले दोन्ही हात पुढे पसरवत… स्वतःला पूर्णपणे फिरोझच्या दिशेने झोकून दिलं.


फिरोझ तर ह्याच क्षणाची वाट पाहत होता. तोही क्षणाचाही विचार न करता पुढे झाला... आणि तिला घट्ट आपल्या बाहुपाशात सामावून घेतलं. त्या मिठीत दोघांच्याही भावनांचे सगळे बांध तुटले… झीनत स्फुंदून रडत होती.  तिचा आवाज हुंदक्यांमध्ये हरवत होता… आणि फिरोझ... त्याने स्वतःला थांबवण्याचा प्रयत्नच केला नाही. त्याच्या डोळ्यांतूनही अश्रू वाहू लागले… तो तिच्या कपाळावर, गालांवर, डोळ्यांवर हलकेच चुंबन देत होता. जणू त्या प्रत्येक स्पर्शातून तो तिला सांगत होता..


"मी आहे… मी कुठेही जाणार नाही… तू एकटी नाहीस…"


त्याच्या स्पर्शात आश्वासन होतं… विश्वास होता… आणि न बोलता व्यक्त होणारं गहिरं प्रेम… बराच वेळ… दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून गेले होते… अश्रू वाहत होते… शब्द हरवले होते… फक्त भावना उरल्या होत्या… काळ जणू थांबला होता. हळूहळू... अश्रू सुकले… श्वास स्थिर झाले… पण तरीही, झीनत त्याला सोडायला तयार नव्हती. तिने अजूनही त्याला घट्ट धरून ठेवलं होतं.  जणू सोडलं तर तो पुन्हा हरवून जाईल…


शेवटी... फिरोझने हळूच स्वतःला सावरलं… तिला अलगद दूर केलं… आणि तिच्या समोर बसवलं.  त्याने खिशात हात घालून ते रेशमी वस्त्र बाहेर काढले... फिरोझच्या हातात ते रेशमी कापड अलगद उलगडत होतं… त्या कापडात गुंडाळलेलं तावीज जणू काही साधं वस्तू नव्हतं. त्या क्षणी ते त्यांच्या प्रेमाचं, विश्वासाचं आणि पुन्हा उभं राहण्याच्या आशेचं प्रतीक बनलं होतं… त्याने एक क्षण थांबून झीनतकडे पाहिलं… झीनतच्या डोळ्यांत अजूनही ओल होती… पण त्या ओलसर डोळ्यांच्या तळाशी एक नवीन शांतता दिसत होती… जणू ती आतून तुटून पुन्हा जोडली जात होती… फिरोझने हलक्या आवाजात पुन्हा तिचं नाव घेतलं… तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले… त्या हातांवर अलगद चुंबन घेत त्याने खोल श्वास घेतला… आणि बोलायला सुरुवात केली.


"झीनत…"


तो शब्द ऐकताच ती त्याच्याकडे वळली… तिच्या चेहऱ्यावर अजूनही अपराधीपणाची सावली होती… पण त्याच वेळी त्याच्यावरच्या प्रेमाचा प्रकाशही होता… फिरोझ तिच्या अगदी जवळ सरकला… त्याने तिच्या गालावर अलगद हात ठेवला… तिच्या थरथरणाऱ्या श्वासाची जाणीव त्याला होत होती…


"माझ्या फुला सारख्या झीनत!! जे काही झाले ते आता आठवून तू पण व्यथित होऊ नकोस आणि मलाही व्यथित करू नकोस. मला माहित आहे आपण एकमेकां शिवाय जगू शकणार नाहीत. मी तुझ्यावर रागावलो, पण तू माझी अवस्था समजून घे. तुला या घराला आणि परिवाराला सांभाळायचे आहे.. आणि मलाही.. मग आता हास माझ्या जान"


हे शब्द ऐकताच झीनतच्या ओठांवर एक हलकंसं, थरथरतं हास्य उमटलं… पण त्या हास्याबरोबर तिच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू ओघळले… ती पुढे सरकली… तिने फिरोझचा हात दोन्ही हातांनी घट्ट धरला… आणि त्यावर ओठ टेकवले… तिच्या स्पर्शात पश्चात्ताप होता… कृतज्ञता होती… आणि सर्वात जास्त... निरागस प्रेम होतं… ती बोलू लागली… तिचा आवाज अजूनही थरथरत होता… पण शब्द स्पष्ट होते…


"फिरोझ !! माझ्या एका चुकीने किती मोठे संकट माझ्या परिवारावर आणि माझ्या प्रेमावर आले..."


ती बोलत असताना… फिरोझ एकटक तिच्याकडे पाहत होता… मध्येच तो तिचे हात घट्ट पकडत होता… कधी तिच्या डोळ्यांत साचलेले अश्रू आपल्या अंगठ्याने पुसत होता… ती जेव्हा म्हणाली..."मी तुझ्या प्रेमाची पात्र नाहीये..."


तेव्हा मात्र फिरोझने लगेच तिच्या ओठांवर हलकेच बोट ठेवलं…


"श्श्श… असं पुन्हा कधीही बोलू नकोस…"


त्याचा आवाज आता ठाम झाला होता… त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच जिद्द होती… 


"झीनत !! माझे प्रेम फक्त तुझ्या शरीराचे आकर्षण नाही आहे..."


तो प्रत्येक शब्द जणू तिच्या भंगलेल्या आत्म्याला सांधत होता… झीनत शांतपणे ऐकत होती… तिच्या चेहऱ्यावर आता एक वेगळीच स्थिरता दिसत होती… जणू ती स्वतःला पुन्हा स्वीकारत होती… खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली… फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज… आणि बाहेर कुठेतरी दूरवरून येणारा वाऱ्याचा मंद सळसळ आवाज… त्या शांततेत फिरोझने हळूच तावीज हातात घेतलं…


"माझ्या जान झीनत… आता हे सगळं थोडावेळ बाजूला ठेवूया…"


तो हलक्या आवाजात म्हणाला… पण त्या आवाजात एक अदृश्य ताकद होती…


"तर ऐक !! चष्मेवाल्या बाबांनी सांगितले आहे की तू काही दिवस बाहेर पडायचे नाही… दारे खिडक्या उघड्या ठेवायच्या नाहीत…"


तो बोलत असताना झीनत त्याच्याकडे निरखून पाहत होती… तिच्या डोळ्यांत आता भीती नव्हती… विश्वास होता… 


"तुला आणि मला गळ्यात घालायला बाबांनी तावीज दिलेले आहेत…"


रेशमी वस्त्रातून त्याने तावीज उचलले आणि म्हणाला…


"माझ्या गळ्यात तर बाबांनी स्वतः तावीज घातले… आणि मला निक्षून सांगितले की आजच… आत्ताच… तुझ्या गळ्यात हे बांध…"


हे ऐकताच झीनतच्या श्वासाची लय बदलली… तिने नकळत आपल्या गळ्याकडे हात नेला… फिरोझ तिच्या अगदी जवळ सरकला… त्याने हलक्या हाताने तिचे केस बाजूला सारले… तिच्या मानेला स्पर्श करताच ती थोडीशी शहारली… त्या स्पर्शात प्रेम होतं… आश्वासन होतं…आणि एक न बोललेलं वचन होतं..."मी तुझ्या सोबत आहे …"