Login

विषारी स्पर्श : भाग २१.

.
फिरोझ रिक्षा थांबवून घरी जाणारच होता… इतक्यात त्याच्या मनात अचानक चष्मेवाले बाबांचे शब्द घुमले... 
“तावीज आजच पोहोचव…”


तो जागच्या जागी थबकला. खिशावर हात गेला… रेशमी कापडात गुंडाळलेले तावीज खिशात सुरक्षित होते... त्याचा स्पर्श त्याला उबदार वाटत होता… जणू त्यात जीवन आहे.  क्षणात दोन विचार त्याच्या मनात भिडले...
“बस… आता पुरे… सकाळपासून धावपळ… घरी जाऊन अंघोळ करावी… झोप घ्यावी… उद्या देऊ तावीज… काय फरक पडणार आहे?”


पण लगेच दुसरं मन कडाडलं...
“जर काही फरक पडत नसेल तर बाबांनी इतक्या ताकीदीनं सांगितलं असतं का? काहीतरी कारण आहे… आणि जर आजच द्यायचा असेल तर? उशीर झाला तर…?”


फिरोझने डोळे मिटले…
झीनतचा रागाने निघून जाणारा चेहरा त्याच्या नजरेसमोर उभा राहिला…
“कदाचित आता ती शांत झाली असेल… जाऊन बोलूया… आणि तावीज बांधून येऊया…”


त्याने स्वतःला सावरलं… रस्ता ओलांडला… आणि राजच्या घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षेत बसताच त्याच्या शरीराने शरणागती पत्करली. सकाळपासूनचा थकवा… मानसिक ताण… भीती… सगळं एकदम अंगावर कोसळलं. त्याने डोके सीटला टेकवले… रिक्षा सुरू झाली… बाहेरची थंडगार हवा चेहऱ्यावर येऊ लागली… डोळे आपोआप मिटले…


आणि हळूहळू... तो वास्तवातून निसटत गेला… त्याच्या समोर पुन्हा तोच रुळांवरील काळोख उभा राहिला… रेहमानजींची सावली… रक्ताचा वास… कापलेल्या कोंबड्यांचे कलेवर… आणि मग...
धप्प्प!!!
तोच आवाज.
फिरोझने स्वप्नातच त्या दिशेने पाहिले… सुरुवातीला काहीच दिसत नव्हते… फक्त काळोख… पण हळूहळू… त्याचे डोळे त्या अंधाराला सरावले… आणि मग... काहीतरी हलताना दिसलं… गुढग्यांवर टेकलेलं… वाकडं-तिकडं… मानवी आकृतीसारखं… पण पूर्णपणे नाही. ते त्या कलेवरांवर तुटून पडलेलं होतं… 


खाण्याचा आवाज... हाडांवर दाब येण्याचा करकर आवाज… मांस फाटल्याचा मंद, पण अंगावर काटा आणणारा स्पर्शिक ध्वनी… फिरोझच्या पोटात ढवळू लागलं… त्या सावलीचे हात... लांब… तीक्ष्ण… ती काहीतरी पकडून फाडत होती… अचानक... ती आकृती थांबली. जणू तिला काहीतरी जाणवलं. हळूहळू… ती वळली…


आणि त्या अंधारातून... दोन लालसर चमकणारे बिंदू त्याच्याकडे रोखले गेले. डोळे. ते डोळे त्याच्याकडे पाहत होते. फिरोझचा श्वास अडकला. त्या आकृतीच्या चेहऱ्यावर काहीतरी विकृत होतं… पूर्ण दिसत नव्हतं… पण जेवढं दिसत होतं तेच भयानक होतं. तिच्या तोंडातून काहीतरी ओघळत होतं… ती हळूहळू उठू लागली…


एक पाऊल पुढे… मग दुसरं… प्रत्येक पावलागणिक ती जवळ येत होती… फिरोझ पळायचा प्रयत्न करत होता... पण पाय हलत नव्हते! जणू तो जमिनीत खिळला होता… त्या आकृतीचा श्वास आता त्याला ऐकू येत होता… जड… गरम… आणि जवळ येणारा… ती झेप घेणारच होती...


तेवढ्यात... कोणीतरी जोरात त्याला मागे खेचलं! रेहमानजी! त्यांनी त्याचा हात पकडला… आणि त्याला त्या काळोखातून ओढत दूर घेऊन गेले…


“भाई जान!!… भाई जान!!… सो गये क्या??… आपका ठिकाना आ गया है!”


रिक्षावाल्याच्या कर्कश्य आवाजाने फिरोझ दचकून जागा झाला. त्याने धापा टाकत डोळे उघडले… समोर लख्ख दिवे… रस्ता… लोक… तो काही क्षण काहीच बोलू शकला नाही. त्याने पटकन आपल्या कपाळाला हात लावला... घामाने ओलेचिंब. श्वास सावरत त्याने आजूबाजूला पाहिले… 


“स्वप्न होतं… फक्त स्वप्न…”


तो स्वतःलाच समजावत होता. पण… मनाच्या कुठल्या तरी खोल कोपऱ्यात एक विचार अजूनही जिवंत होता...


“ते फक्त स्वप्न नव्हतं…”


त्याने अलगद खिशावर हात ठेवला... तावीज अजूनही तिथेच होते... आणि आता... ते अजून जास्त जड वाटत होते…  फिरोझचे संपूर्ण शरीर घामाने निथळत होते. डोळे उघडून वास्तवात परत यायला त्याला काही क्षण लागले. छाती धडधडत होती… श्वास जड झाले होते. समोर परिचित रस्ता, राजच्या घराचा दरवाजा दिसताच त्याच्या जीवात जीव आला.


त्याने घाईघाईने रुमाल काढून चेहरा पुसला… पैसे देऊन खाली उतरला. मनात एकच विचार घोंगावत होता...
"आजचा दिवस… आयुष्यात कधी विसरता येणार नाही..."


सावध, जड पावलांनी तो दरवाज्यापाशी गेला. बेल वाजवली… काही क्षणात दरवाजा उघडला... समोर अम्मीजान उभ्या होत्या. त्याला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं...


"अरे फिरोझ बाळा! ये… ये आत… अजी ऐका ना, फिरोझ आला आहे!"


त्या आवाजात प्रेम होतं… पण काळजीही दडलेली होती. फिरोझ शांतपणे आत आला. शूज काढले… हॉलमध्ये नजर टाकली... सगळं शांत होतं. तो काही न बोलता थेट बाथरूममध्ये गेला. थंड पाण्याने चेहरा, हात, पाय धुतले… जणू काही बाहेरचं सगळं भय धुवून टाकायचा प्रयत्न करत होता. बाहेर आला, तेव्हा अम्मीने त्याच्यासाठी टॉवेल आणून ठेवला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा, डोळ्यांमधली भीती… सगळं अम्मीच्या नजरेतून सुटलं नाही.


इतक्यात अब्बू बाहेर आले. दोघेही त्याच्याकडे एकटक पाहत होते. फिरोझने टॉवेलने चेहरा पुसला… आणि थेट सोफ्यावर कोसळल्यासारखा बसला. डोळे मिटले… पण पुढच्याच क्षणी त्याने दचकून पुन्हा डोळे उघडले. त्या भयानक दृश्यांचे सावट अजूनही त्याच्या मनातून गेले नव्हते. अम्मी त्याच्या जवळ बसल्या. त्यांनी अलगद त्याच्या कपाळावर हात ठेवला... ताप आहे का पाहिलं… नंतर मायेने केसांवरून हात फिरवत पाठीवरून थोपटत म्हणाल्या...


"बेटा… काय झालंय? खूप थकलेला दिसतोयस… चेहरा पण फिकट झालाय तुझा…
तू बाबांकडे जाऊन आलास ना? थांब… मी चहा घेऊन येते… काहीतरी खायलाही देते…"


त्या उठून किचनकडे गेल्या. आता खोलीत फक्त फिरोझ आणि अब्बू उरले. अब्बू हळूच त्याच्या समोर येऊन बसले… त्यांच्या आवाजात अपराधीपणाची जड छटा होती...


"बेटा… उताऱ्याचं काम व्यवस्थित झालं ना? बाबांनी फोन केला होता…
तू आमच्यासाठी किती धावपळ करतोयस… आणि आम्ही… आम्ही काहीच करू शकत नाही…"
त्यांचा आवाज थरथरला.


"आमच्या घरातलं संकट… आणि तू त्यात एवढा गुंतलायस…
मला खूप अपराधी वाटतंय रे…"


फिरोझने हळूच डोळे उघडले… अब्बूकडे पाहिलं… आणि सरळ बसत म्हणाला...
"अब्बू… तुम्ही असं का बोलताय?"
त्याचा आवाज थकलेला होता… पण ठाम होता.


"मी तुमच्यासाठी काही परकं काम करत नाहीये… हे घर माझ्यासाठी परकं नाही…
आणि झीनत…"
तो थोडा थांबला… आवाज किंचित दाटला...
"…ती माझ्यासाठी फक्त जबाबदारी नाही… ती माझा विश्वास आहे."


अब्बू शांत झाले… त्याच्या शब्दांनी त्यांना आधार मिळत होता. फिरोझ पुढे म्हणाला...
"आणि राहिला प्रश्न आज घडलेल्या गोष्टींचा… तर अब्बू…
आपण जे ऐकलं… जे पाहिलं… ते सगळं सत्य असेलच असं नाही."


अब्बूने हळूच त्याच्याकडे पाहिलं.
"त्या दुष्ट शक्तीचं कामच काय असतं?
मनात शंका पेरायची… नात्यांमध्ये भेगा पाडायच्या…"


फिरोझचा आवाज आता अधिक खोल झाला होता...
"जर आपणच आपल्या माणसांवर विश्वास ठेवला नाही…
तर मग त्या वाईट शक्ती जिंकतात, अब्बू."


अब्बूच्या डोळ्यांत पुन्हा पाणी तरळलं. फिरोझने पुढे झुकत त्यांच्या हातावर हात ठेवला...
"झीनत चुकली असेल… परिस्थितीला बळी पडली असेल…
पण ती वाईट नाहीये… ती तशी कधीच नव्हती."


तो थोडा थांबला… आणि अलगद म्हणाला...
"आणि… आज तिला आपल्या सगळ्यांच्या आधाराची गरज आहे… न्यायाची नाही."


खोलीत काही क्षण शांतता पसरली. त्या शांततेत अब्बूच्या मनातील वादळ हळूहळू शांत होऊ लागलं… त्यांनी हलक्या आवाजात विचारलं...
"बेटा… तू खरंच मानतोस ना… की आपली झीनत… अजूनही तशीच आहे?"


फिरोझने क्षणभर डोळे मिटले… आतल्या संघर्षावर मात करत… तो ठामपणे म्हणाला...
"हो अब्बू…
मी तिच्यावर आजही तितकाच विश्वास ठेवतो… जितका आधी ठेवत होतो."