Login

विषारी स्पर्श : भाग २०.

.
रेहमानजींच्या आवाजाने त्या किर्रर्र शांततेला जणू तडा गेला… त्या आवाजात एक विचित्र वजन होते... आज्ञेचे, आणि कुठेतरी दडलेल्या भीतीचेही. फिरोझच्या छातीत धडधड इतकी वाढली होती की त्यालाच स्वतःचा श्वास ऐकू येत होता. त्याने कसाबसा मान हलवून होकार दिला… आणि नजर खाली रोवून उभा राहिला. जमिनीवर मांडलेल्या वस्तूंवर रेहमानजी काहीतरी टाकत होते… पण त्या अंधारात ते नेमके काय आहे, हे फिरोझला दिसत नव्हते. फक्त हलणाऱ्या सावल्या… आणि धूप, रक्त, माती आणि ओलसर गवताचा मिसळलेला गंध...एक विचित्र, अस्वस्थ करणारा वास त्याच्या नाकात घुसत होता.


काही क्षणांनी रेहमानजींनी एक अगरबत्ती पेटवली… तिच्या नाजूक ज्योतीने अंधारात थोडासा उजेड पसरवला, पण त्या उजेडाने अंधार अजूनच गडद वाटू लागला. त्यांनी हळूहळू मागे वळून फिरोझकडे हात पुढे केला… त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर पडलेली सावली… ती मानवी वाटत नव्हती. फिरोझच्या काळजात धस्स झाले. थरथरत्या हाताने त्याने पिशवीत हात घातला. आत काहीतरी हलत होते… जिवंत, उष्ण… आणि बेचैन. त्याच्या बोटांना एक कोंबडी लागली. त्याने ती बाहेर काढली... काळी, उरफाट्या पिसांची… तिचे डोळे चमकत होते, जणू काहीतरी समजत होते तिला. ती हातात येताच जोरात फडफडू लागली.


“दे…” रेहमानजींचा आवाज कुजबुजेसारखा, पण आदेश देणारा.
फिरोझने ती त्यांच्या हातावर ठेवली… आणि पुढच्याच क्षणी...
चक्क!
सुरी चमकली… आणि एकाच वारात तिची मान वेगळी झाली.


त्या क्षणी निघालेला घुसमटलेला आवाज… तो सरळ फिरोझच्या छातीत घुसला. त्याचे पाय थरथरले. कोंबडीचे रक्त जोराने उडाले… खाली मांडलेल्या वस्तूंवर सांडू लागले. लाल, गरम, आणि जिवंत. त्या रक्ताचा वास हवेत पसरताच वातावरणात काहीतरी बदलले… रेहमानजींचे ओठ हलत होते… ते काहीतरी मंत्रोच्चार करत होते… आवाज खूप मंद, पण धारदार.


“आ जा… तेरे लिए दावत लाई है… आ जा…”


एक एक करून पाचही कोंबड्या… त्याच प्रकारे… त्याच निर्दय शांततेत बळी गेल्या. प्रत्येक वेळी फिरोझच्या आत काहीतरी तुटत होते. शेवटची कोंबडी संपताच रेहमानजींनी बाटलीतले पाणी घेतले आणि त्या रक्ताने माखलेल्या कलेवरांवर गोल फिरवत शिंपडले… जणू काही एक सीमारेषा आखत होते. मग त्यांनी आपली सुरी स्वच्छ केली… आणि शांतपणे पिशवीत ठेवली. आता ते हळूहळू उभे राहिले.


क्षणभर… पूर्ण शांतता. ना वारा… ना आवाज… फक्त काळोख. रेहमानजी स्थिर उभे राहून समोर टक लावून पाहत होते… जणू काही त्यांना तिथे काही दिसत होते… जे फिरोझला दिसत नव्हते. मग त्यांनी अचानक नाकाने खोल श्वास घेतला… एकदा… दोनदा… जणू ते काहीतरी “सूंघत” होते. फिरोझचा घसा कोरडा पडला.


“आ… गया…” रेहमानजींच्या ओठातून कुजबुज बाहेर पडली.


त्या क्षणी फिरोझच्या अंगावर अक्षरशः काटा आला. त्याला जाणवले... ते दोघे एकटे नव्हते. हवेत एक विचित्र दर्प पसरला… कुजका… उग्र… आणि जिवंत. जणू एखादी अदृश्य गोष्ट त्यांच्या भोवती फिरत होती. त्याचे हात थरथरू लागले… त्याने नकळत डोळे मिटले आणि मनात “अल्लाह…” असा जप सुरू केला.
तेवढ्यात…


सssssर्रर्र…!
आजूबाजूची झाडी हलू लागली. वाऱ्याची एक झुळूक आली… मग दुसरी… आणि काही क्षणातच ती झुळूक वेड्यासारखी सळसळू लागली. पानांचा आवाज वाढत गेला… जणू कोणी त्या झाडांमध्ये येऊन बघत होते. फिरोझचा श्वास अडकला. आणि मग...
धप्प्प!!!
जणू काहीतरी जड वस्तू त्या कोंबड्यांच्या कलेवरांवर कोसळली.


क्षणभरासाठी वेळच थांबला. वारा… थांबला. आवाज… बंद. सगळं स्तब्ध. फिरोझने घाबरून त्या दिशेने पाहण्याचा प्रयत्न केला... पण त्याच्या नजरेत काही येण्याच्या आतच रेहमानजींनी त्याचा हात जोरात पकडला. “चल!” त्यांनी दातओठ खाऊन फुसफुसले.  त्यांच्या पकडीत एक वेगळीच घाई होती… आणि भीतीही. फिरोझ काही न बोलता त्यांच्या मागे धावू लागला. दोघेही रुळांवरून वेगाने चालू लागले… नाही, पळू लागलेच जणू. फिरोझला सतत वाटत होते...


कोणीतरी त्यांच्या मागे येत आहे. त्याने एकदा मागे वळून पाहावे… असा प्रचंड मोह होत होता… पण बाबांचे शब्द कानात घुमत होते...
“पाठी वळून बघू नकोस…”


त्याने दात घट्ट मिटले… आणि नजर सरळ ठेवली. पावलांचा आवाज वाढत होता… श्वास जोरात चालू होता… आणि मागे...  काहीतरी… काहीतरी हलत होते… दोघेही त्या तुटलेल्या भिंतीच्या दिशेने चालत नव्हते… ते त्या अंधारातून स्वतःचा जीव वाचवत बाहेर पडत होते.


फिरोझच्या मनात भीतीचे वादळ घोंगावू लागले होते... त्याचे पाय लटपटू लागले होते.. असा भास होत होता की त्याच्या मागून कोणीतरी वेगाने येतेय... बस... आता पुढच्याच क्षणी जे कोणी मागून येतेय त्याचा हात आपल्या खांदयावर पडेल... ही जाणीव त्याच्या जीवाचा थरकाप उडवत होती... आपल्यात आणि मागून येणाऱ्या भासात किती अंतर आहे हे मागे वळून पाहावे अशी तीव्र इच्छा मनात येत होती. परंतु तो स्वतःच्या मनाला फार जिकिरीचे दाबून ठेवत होता.. त्याला बाबांनी सांगितलेले वाक्य आठवले... 'मागे वळून पाहू नकोस' फिरोझने रेहमानजींचा हात घट्ट पकडला आणि स्वतःला त्यांच्या बरोबर ओढत चालू लागला... बाहेरचा रास्ता जवळ जवळ येऊ लागला आणि फिरोझला मोकळे वाटू लागले.. त्याने आपला हात रेहमानजींच्या हातातून सोडवून घेतला आणि एकटा चालू लागला. 

ते दोघे रुळांवरून तुटलेल्या भिंतीच्या रस्त्याने बाहेरच्या पायवाटेवर पोहोचले.. दोघेही घामाघूम झाले होते. फिरोझने रुमाल काढून आपल्या चेहेऱ्यावरचा घाम पुसला... त्याचे शर्ट संपूर्ण ओले झाले होते.. चालत चालत ते जेथे बाईक पार्क केली होती तेथे पोहोचले, आता पुढे काय?? त्याला प्रश्न पडला होता. त्याने रेहमानजींकडे पाहिले. त्यांच्या सदऱ्यावर ताज्या लाल रक्ताचे शिंतोडे दिसत होते. त्यांचा चेहेरा बऱ्यापैकी नॉर्मल दिसत होता. त्याला काहीतरी विचारायचे होते. पण धीर होत नव्हता, इतक्यात त्यांनीच विचारले.

"आपको उभी कहा जाना है? मैं बाबाके यहा निकल रहा हु. आपको कहा छोडू?"

"अ .... मला ना..... एक मिनिट.. हा !! मला तुम्ही पश्चिमेला त्या नाक्यावर सोडा.. मी तेथून रिक्षा घेईन" ... फिरोझने कसेतरी ठरवत त्यांना सांगितले. 

"ठीक है, चलो बैठो" .. रेहमानजीं बाईक स्टार्ट करत म्हणाले. 

फिरोझ त्यांच्या मागे बसला आणि त्यांनी बाईक पुढे हाकली. थोड्याच वेळात ते मुख्य रस्त्याला लागले.. रहदारी आणि लख्ख प्रकाश कधी कधी किती हवाहवासा वाटतो याची प्रचिती फिरोझला येत होती. बाहेर आल्यापासून सारखा तो प्रसंगच डोक्यात फिरू लागला होता. आपल्या आयुष्यातला तो रुळांवर घालवलेला तुकडा स्मृतींमधून पुसून जावा असेच त्याला वाटत होते. थोड्याच वेळात रेहमानजींनी त्याला नाक्यावर सोडले आणि ते पुढे निघून गेले. 

फिरोझला आपल्या घरी जायचे होते.. सकाळपासून तो बाहेर होता.. त्याचेही आई वडील त्याची वाट पहात होते. तो घरी जाण्यासाठी रिक्षा करणारच होता की त्याला बाबांचे बोलणे आठवले. झीनतसाठी दिलेले तावीज आजच नेवून देणे गरजेचे होते. 

थकलेल्या मनात विचार येत होता.. "उद्या जाऊन दिले तर?? काय हरकत आहे??"


क्रमशः
©किशोर तरवडे
0

🎭 Series Post

View all