Login

विषारी स्पर्श : भाग १९.

.
अंगणातील दिव्याची ज्योत क्षणभर हलताना पाहून फिरोझच्या मनात नकळत एक सकारात्मक विचार चमकून गेला...

“कदाचित सगळं ठीक होईल…”


इतक्यात बाबांचा आवाज घुमला...

“बेटा! हा रेहमान आहे. यांच्याकडे सगळा उतारा दिलेला आहे. त्या आत्म्याला काळ्या कोंबड्यांचा नैवेद्य द्यायचा आहे. फक्त एकच लक्षात ठेव, निघताना पाठी वळून बघायचं नाही.”


फिरोझने मान हलवली.

“हो बाबा… मी लक्षात ठेवेन.”


तो थोडा थांबला, मग आठवणीने म्हणाला...
“आणि… आपण झीनतसाठी तावीज देणार होतात ना?”


बाबा हलकेच हसले.

“हो… देणारच आहे. आणि खरं सांगायचं तर त्या तावीजची गरज तिला सगळ्यात जास्त आहे.”


त्यांनी थोडं पुढे झुकत गंभीर स्वरात सांगितलं...

“पण तू तिचा हितचिंतक मित्र आहेस… म्हणून तुलाही हा तावीज घालणं आवश्यक आहे.”


इतक्यात त्यांनी आपल्या मखमली बटव्यातून दोन तावीज बाहेर काढले. त्यांनी डोळे मिटले… काही क्षण ओठ हलत राहिले… मंद स्वरात दुआ वाचत त्यांनी त्या तावीजांवर फुंकर मारली. क्षणभर वातावरण अधिकच गूढ झालं. मग त्यांनी फिरोझला जवळ बोलावलं. त्याच्या गळ्यात एक तावीज स्वतः बांधत म्हणाले...


“बघ फिरोझ… सध्या दिवस वाईट आहेत. हा तावीज कधीही गळ्यातून काढू नकोस.”


फिरोझने शांतपणे मान डोलावली. बाबांनी दुसरा तावीज रेशमी कापडात बांधून त्याच्या हातात दिला...


“उतारा करून झाल्यावर… तू स्वतः सुलेमानजींच्या घरी जाऊन झीनतच्या गळ्यात हा तावीज बांध. लक्षात ठेव...हा तिचं रक्षण करेल.”


फिरोझने तो तावीज काळजीपूर्वक आपल्या खिशात ठेवला.

“जी बाबा…”

तो उठला.


रेहमान आधीच तयार उभा होता... गंभीर, स्थिर… आणि थोडासा भेसूर वाटणारा. त्यांच्या हातातली पिशवी हलकेच हलत होती. क्षणभर फिरोझच्या मनात भीतीची एक लाट उठली… पण त्याने स्वतःला सावरलं.

दोघे बाहेर पडले. रेहमानने बाईक सुरू केली. फिरोझ मागे बसला. पिशवी त्याच्या हातात होती. रस्त्यावर पालिकेच्या पिवळ्या दिव्यांचा फिकट प्रकाश पडत होता. त्या प्रकाशात सगळं काही अधिकच उदास,  साड वाटत होतं. वाराही जड झाला होता.


समोरून येणाऱ्या गाड्यांचे दिवे जणू थेट डोळ्यांत घुसत होते. फिरोझच्या मनात ताण वाढत चालला होता. काही वेळाने ते बाबांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले. रेहमानने बाईक एका बाजूला उभी केली. त्याने  फिरोझच्या हातातील पिशवी परत घेतली. संपूर्ण प्रवासात त्याने एक शब्दही उच्चारला नव्हता. फक्त त्याची नजर… आणि चालण्याची ढब… काहीतरी वेगळंच सांगत होती.


समोर एक कच्ची पायवाट होती. रेहमान त्या दिशेने चालू लागला. फिरोझ थोडा घाबरतच त्याच्या मागे निघाला. काही अंतरावर रेल्वेचा परिसर दिसू लागला. थोडं पुढे गेल्यावर लक्षात आलं...ती पायवाट एका तुटलेल्या भिंतीतून रेल्वेच्या आत जाणाऱ्या रस्त्याला मिळत होती. फिरोझच्या अंगावर शहारा आला. 


“बापरे… म्हणजे आपल्याला इथूनच आत जायचं आहे…”


नकळत त्याची नजर आकाशाकडे गेली. आकाश पूर्ण काळं… कुळकुळीत… एकही तारा नव्हता. त्याने दिशांचा अंदाज घेतला… आणि मग एका कोपऱ्यात त्याला फिकटशी चंद्राची कोर दिसली. तीसुद्धा जणू काही धूसर… कमकुवत… जणू चंद्राला ग्रहण लागलंय… त्याने खोल श्वास घेतला. समोर पाहिलं तर रेहमान बराच पुढे गेला होता. तो घाईघाईने त्याच्या मागे धावला. त्या पायवाटेवर आता फक्त ते दोघेच होते.


त्याने एकदा मागे वळून पाहिलं... आसपास कोणीच नव्हतं. फक्त अंगावर येणार गडद अंधार होता. ते तुटलेल्या भिंतीजवळ पोहोचले.रेहमानने एक नजर मागे टाकली... फिरोझ आहे याची खात्री केली. मग त्याने पहिलं पाऊल रेल्वेच्या हद्दीत टाकलं. सावधतेने दोन्ही बाजूंना पाहिलं. सगळीकडे काळोख पसरलेला होता. तो खाली उतरला. फिरोझही त्याच्या मागे उतरला.


समोर सहा रेल्वे मार्ग पसरलेले होते. ते ज्या रुळावर उभे होते, तो जुना… वापरात नसलेला वाटत होता. आजूबाजूला खुरटी झाडं… ओसाड वातावरण… लांबून जाणाऱ्या लोकलच्या प्रकाशात ते हळूहळू पुढे चालू लागले. 


आणि अचानक… फिरोझच्या डोळ्यांसमोर एक दृश्य उभं राहिलं. झीनत… रेल्वे रुळांवरून चालत होती… एका धूसर काळ्या अनोळखी सावली सोबत… त्याच्या पायाखालची जमीनच सरकल्या सारखी झाली. त्याचे काळीज थिजले... त्याला वाटलं...


“आपण तिच्या मागे चाललोय… तिचा पाठलाग करतोय…”


त्या विचाराने त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. मनात विचारांची वावटळ उठली. त्या विचारांनी त्याचे हृदय जळू लागले.... 


"झीनतवर जो भयंकर प्रसंग ओढवला… त्या भयंकर शक्तीचा तिला झालेला त्रास… की… तिच्या त्या एका क्षणाच्या चुकीने आपल्या प्रेमाला तडा गेला… कुठलं दुःख मोठं?


तो स्वतःलाच विचारत होता. त्याच्या मनात एक वेदनादायक प्रश्न घुमत राहिला...

“झीनतला दोष द्यावा… की तिला आपल्या मायाजालात ओढून घेणाऱ्या त्या अतृप्त आत्म्याला?”


त्या अंधाऱ्या रुळांवर चालताना… फिरोझ एका मोठ्या उत्तराच्या उंबरठ्यावर येऊन उभा होता… 


थोडं पुढे गेल्यावर, रेल्वेच्या रुळांच्या मधोमध एक अंधारलेला कोपरा दिसताच रहमानजी अचानक थांबले. त्यांनी चारही बाजूंना बारकाईने नजर फिरवली. काही क्षण ते अगदी स्थिर उभे राहिले… जणू त्या जागेचे स्पंदन ऐकत होते. दूरवरून जाणाऱ्या लोकलचा मंद आवाज… वाऱ्याने हलणाऱ्या झुडुपांचा सळसळाट… आणि मध्येच येणारी एक विचित्र शांतता… त्या सगळ्यात ती जागा अधिकच भेसूर वाटत होती. रहमानजींच्या चेहऱ्यावर एक समाधानाची छटा उमटली.


“यही हैं वह जगह... यही ठीक है…” ते हळूच पुटपुटले.


क्षणाचाही विलंब न करता त्यांनी खांद्यावरची मोठी पिशवी खाली ठेवली.  त्यातून त्यांनी एक छोटी कापडी पिशवी बाहेर काढली. ती उघडताच एक वेगळाच गंध हवेत पसरला... उकडलेल्या भाताचा…  धान्य फुलांचा… आणि वातावरणातून येणाऱ्या कच्च्या, ओलसर मातीचा. फिरोझ सावधपणे पाहत होता. रहमानजींनी अत्यंत नेमकेपणाने ते सगळं सामान रुळांच्या मध्ये मांडायला सुरुवात केली...


एकीकडे उकडलेला भात… त्याच्या शेजारी धान्यफुले… आणि थोड्या अंतरावर उकडलेली अंडी… सगळं काही एका ठराविक रचनेत मांडलं जात होतं. जणू प्रत्येक गोष्टीला एक अर्थ होता… एक नियम होता… आणि त्या नियमा पासून जरा जरी विचलन झालं… तरी काहीतरी भयंकर घडू शकतं.


फिरोझच्या छातीत धडधड वाढू लागली. वारा अचानक थोडा जोरात वाहू लागला. जमिनीवर पडलेली कोरडी पानं त्यांच्या भोवती फिरू लागली. रहमानजींनी काम पूर्ण केलं. ते हळूच उभे राहिले. आणि मग त्यांनी फिरोझकडे वळून पाहिलं. त्यांच्या डोळ्यांत आता एक वेगळीच चमक होती... वेडसर… आणि थोडीशी भयानक.


त्यांनी हाताने खुण करून फिरोझला जवळ बोलावलं. फिरोझ थोडा संकोचतच त्यांच्या जवळ गेला. क्षणभर शांतता पसरली. आणि मग… रहमानजींनी हळूहळू त्या मोठ्या पिशवीत हात घातला. फिरोझ श्वास रोखून पाहत होता. पिशवीत काहीतरी हालचाल झाली…


अचानक…


त्यांनी आतून एक तळपता सुरा बाहेर काढला. त्या सुऱ्यावर पडलेल्या फिकट चंद्रप्रकाशाची एक थंड, धारदार चमक उठली. फिरोझच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याने नकळत एक पाऊल मागे घेतलं. रहमानजींनी त्याच्याकडे पाहिलं… आणि मग ती मोठी पिशवी त्याच्या हातात दिली. त्यांचा आवाज आता पूर्णपणे कठोर झाला होता...


“सुनो…”
फिरोझने घाबरलेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं.
“जब मैं बोलूँ… तब इस थैली में से एक-एक मुर्गी निकालकर मुझे देना.”


क्षणभर वेळ थांबल्यासारखा झाला. फिरोझच्या हातातली पिशवी अचानक जड वाटू लागली. त्याला स्पष्ट जाणवत होतं... त्या पिशवीत जिवंत हालचाल होती… हलकेसे फडफडणे… कधीकधी येणारा दबलेला किणकिण आवाज… त्याच्या तळहाताला उष्णता जाणवत होती. त्याने आवंढा गिळला.
“जी…”
त्याचा आवाज जवळजवळ हरवला होता.


रहमानजींनी सुरा घट्ट पकडला… आणि खाली मांडलेल्या उताऱ्याकडे पाहत काहीतरी मंद स्वरात पुटपुटायला सुरुवात केली. त्या शब्दांचा अर्थ कळत नव्हता… पण त्यांच्या स्वरात एक विचित्र कंपन होतं… जणू ते शब्द या जगासाठी नव्हतेच. आकाशातली चंद्राची कोर आणखी फिकी होत चालली होती. वारा थंड झाला.


आणि त्या अंधाऱ्या रुळांवर… काहीतरी अदृश्य हळूहळू जवळ येत असल्याची जाणीव फिरोझच्या मनात तीव्र होत चालली होती…