अम्मीचा आवाज ऐकून अब्बू आपल्या खोलीतून हळूहळू बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याची छाया होती आणि डोळ्यांत अजूनही काहीतरी दडपून ठेवलेली अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. अम्मीने त्यांच्याकडे अपेक्षेने पाहिले. तिला वाटत होते की या दोघांनी आता सगळे काही तिला सविस्तर सांगावे. इतक्या मोठ्या गोंधळानंतर तिच्या मनात असंख्य प्रश्न उसळत होते. पण फिरोझने लगेचच अब्बूकडे पाहिले आणि डोळे मोठे करत मान नकारार्थी हलवली. जाता जाता बाबांनी त्याला खास बजावून सांगितले होते...
“घरातल्या स्त्रियांना सगळ्या गोष्टी सांगू नका. भीती पसरते.”
अब्बू, झीनतवरच्या रागाच्या भरात सगळे काही उघड करतील अशी भीती फिरोझच्या मनात होती. म्हणून त्यानेच पुढाकार घेतला. तो शांतपणे अम्मीजान समोर बसला आणि हळू आवाजात बोलू लागला...
“अम्मीजान… काय सांगू… आज बाबांनी जे काही केलं ना, ते पाहून माझ्याही अंगावर काटा आला.”
अम्मी, शमा आणि छोटा तिघेही कान देऊन ऐकू लागले.
“सुरुवातीला त्यांनी संपूर्ण घरात लोबान जाळला… त्या धुराने जणू घरातलं सगळं वातावरणच बदलून गेलं. मग त्यांनी प्रत्येक कोपऱ्यात पवित्र दिवे लावले. त्यानंतर त्यांच्या धीरगंभीर आवाजात आयते वाचायला सुरुवात केली…”
फिरोझचा आवाज थोडा गंभीर झाला.
“अम्मीजान, त्या क्षणी घरात अशी एक शांतता निर्माण झाली होती की जणू काही अदृश्य शक्तीही थरथरत उभ्या आहेत असं वाटत होतं.”
अम्मीने नकळत “सुभानअल्लाह…” असे म्हणत हात छातीवर ठेवले.
फिरोझ पुढे म्हणाला...
“मग बाबांनी झीनतवर दुवांच्या फुंकऱ्या मारल्या… आणि तिच्यावर झमझमचं पाणी शिंपडलं. त्या वेळी त्यांनी इतक्या ताकदीने आयते वाचले की… जणू त्या वाईट शक्तीला घरातून बाहेर काढत होते.”
शमा आश्चर्याने म्हणाली...
“खरंच का … इतकं भयंकर होतं का?”
फिरोझने मान हलवली.
“हो… पण अल्लाच्या मेहेरबानीने आणि बाबांच्या दुवांनी सगळं शांत झालं.”
तो थोडा हसला.
“आणि माहित आहे का… घरातील प्रत्येक दार आणि खिडकीवर त्यांनी काहीतरी लिहून ठेवले आहे. म्हणाले.. यामुळे कोणतीही वाईट शक्ती पुन्हा घरात येऊ शकणार नाही.”
हे सांगताना त्याने पुन्हा एकदा अब्बूकडे पाहून डोळ्यांनी खुणावले. अब्बूने हलकेच मान हलवली. त्यांनाही समजले होते की फिरोझ परिस्थिती नीट हाताळण्याचा प्रयत्न करत आहे. अम्मीने सुटकेचा निश्वास सोडला.
“बाई बाई… उपरवाल्याचे लाख लाख शुक्रिया… आज माझ्या झीनतवरील आणि या घरावरील संकट दूर झाले.”
क्षणभर थांबून तिने काळजीने विचारले...
“अरे पण माझी झीनत कुठे आहे?”
अब्बूने थोड्या दडपलेल्या आवाजात उत्तर दिले...
“नूरजहाँ… ती तिच्या रूममध्ये आराम करतेय. तिची काळजी करू नकोस.”
पण त्यांच्या आवाजातला गढूळपणा फिरोझच्या लगेच लक्षात आला. त्याने पटकन अब्बूकडे पाहिले. त्या नजरेत एक प्रकारचा इशारा होता. अब्बूना स्वतःच थोडे लाजल्या सारखे वाटले. त्यांनी मान खाली घातली. अम्मीजान आणि शमा मात्र आनंदाने झीनतला पाहायला आत धावत गेल्या. हॉलमध्ये आता फक्त अब्बू आणि फिरोझ उरले. काही क्षण शांतता पसरली. मग फिरोझ हळू आवाजात बोलू लागला...
“अब्बू… छोटा मुँह बड़ी बात बोल रहा हूँ…”
तो थोडा थांबला.
“आपका गुस्सा मैं समझ सकता हूँ… लेकिन झीनत के दिल का भी खयाल कीजिये.”
अब्बू त्याच्याकडे पाहत राहिले.
फिरोझ पुढे म्हणाला...
“वो अभी बहुत टूट चुकी है… अगर आप भी उसे इस तरह गिराकर बोलेंगे ना… तो मैं सह नहीं पाऊँगा.”
त्याचा आवाज आता ठाम झाला होता.
“फिर मेरे लिये इस घर में आना मुश्किल हो जायेगा.”
हे ऐकताच अब्बू घाबरले. त्यांनी लगेच त्याचा हात धरला.
“नहीं बेटा… ऐसा मत कहो…”
त्यांचा आवाज मऊ झाला.
“मुझसे गलती हो गयी… अचानक गुस्सा ऊपर आ गया था.”
ते थोडे भावुक झाले.
“अब मैं उससे कुछ नहीं कहूँगा… अगर बात ही नहीं करूँगा तो गुस्सा भी बाहर नहीं आयेगा.”
फिरोझने हळूच मान हलवली. मग तो उठला.
“अब्बू… मला आता बाबांकडे निघावं लागेल.”
“का बेटा?”
“त्यांनी मला चंद्रोदयाआधी बोलावलं आहे. त्या आत्म्याला कबूल केल्या प्रमाणे उतारा नेऊन द्यायचा आहे.”
अब्बूने गंभीरपणे मान हलवली. फिरोझ थोडा पुढे झुकला आणि म्हणाला...
“पण तुम्हाला माझी कसम आहे…”
“घरात जे काही घडलं ते अम्मीला सांगू नका.”
तो थोडा थांबला.
“आणि… झीनतला टोचूनही बोलू नका.”
अब्बू शांतपणे ऐकत राहिले. फिरोझ पुढे म्हणाला...
“अम्मीने विचारलं तर सांगा… माझ्या घरून अर्जंट फोन आला होता म्हणून मी घरी गेलो.”
तो दरवाजाकडे वळला.
“बाबांकडचं काम झालं की मी तुम्हाला फोन करीन.”
अब्बूने हलकेच “ठीक आहे बेटा…” असे म्हटले.
क्षणभर दोघांच्या नजरा भिडल्या. त्या नजरेत अनेक न बोललेले भाव होते. आणि पुढच्याच क्षणी फिरोझ घराबाहेर निघून गेला. घराच्या बाहेर रात्रीचा अंधार हळूहळू दाटत होता… आणि चंद्रोदयाची वेळ जवळ येत होती.
घराच्या उंबरठ्या बाहेर पाऊल टाकताच फिरोझच्या मनात विचारांचे वादळ उसळू लागले. रात्र गडद होत चालली होती. रस्त्यांवर फारशी वर्दळ नव्हती. पिवळसर दिव्यांच्या प्रकाशात त्याची सावली लांबवर पसरत होती. तो हळूहळू चालत होता… पण मन मात्र वेगाने धावत होते.
“आज जे काही घडलं… त्यानंतर या घरातील नातेसंबंध पूर्वीसारखे राहतील का?”
त्याच्या मनात विचार उमटला.
“झीनतच्या हातून चूक झाली आहे… आणि त्या चुकीने सगळ्या घरात किती मोठा गोंधळ निर्माण केला.”
त्याने खोल श्वास घेतला.
“अब्बूंच्या मनातही आता अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यात त्यांनी माझ्या समोर एक मोठा प्रस्ताव ठेवला…”
तो थोडा थांबला.
“जर मी नकार दिला… तर त्याचा अर्थ ते काय काढतील? त्यांच्या मनात वेगवेगळे संशय निर्माण झाले तर?”
त्याने कपाळावर हात फिरवला.
“एकीकडे झीनतचं तुटलेलं मन… आणि दुसरीकडे अब्बूंची चिंता…”
त्याच्या ओठांवर हलकंसं कडवट हसू उमटलं.
“खरंच… आयुष्य किती विचित्र आहे.”
तो मनात म्हणाला...
“एक पेच सोडवायला गेलं की त्यातून आणखी नवीन पेच निर्माण होतो.”
या विचारातच चालत चालत तो चष्मेवाले बाबांच्या घराजवळ पोहोचला. दरवाज्या जवळ मंद दिवा लावलेला होता. जणू बाबा त्याचीच वाट पाहत होते. तो आत शिरला. बाबा अंगणात चटईवर बसले होते. त्यांच्या भोवती धूपाचा मंद सुगंध दरवळत होता.
त्यांनी फिरोझकडे पाहिले आणि शांतपणे म्हणाले....
“आलास बेटा?”
“हो बाबा…”
“मी तुझीच वाट पाहत होतो.”
बाबांनी हाताने समोर बसायला सांगितले.
फिरोझ बसला.
इतक्यात बाबांच्या एका शिष्याने येऊन त्याच्या समोर रुहअफजाचा मोठा ग्लास ठेवला. फिरोझला खरोखरच खूप तहान लागली होती. त्याने पटकन ग्लास हातात घेतला आणि तोंडाला लावला. पहिलाच घोट घेताच त्याच्या चेहऱ्यावर समाधान उमटले.
“अहाहा…”
तो मनात म्हणाला...
“जणू अमृतच आहे.”
संपूर्ण ग्लास त्याने एका दमात रिकामा केला. त्या थंडगार सरबताने त्याचा सारा थकवा दूर झाला. मनात थोडी तरतरी आली. इतक्यात बाबा पुन्हा त्याच्याकडे आले. त्यांनी शांत आवाजात विचारले...
“बेटा… तू अंघोळ केलीस का?”
फिरोझ थोडा दचकला.
“अरे देवा…!”
तो लाजल्या सारखा म्हणाला...
“बाबा… क्षमा असावी. घरात इतकी गडबड झाली की ते माझ्या लक्षातच राहिलं नाही.”
तो थोडा अस्वस्थ झाला.
“आता काय करावं?”
बाबा हलकेच हसले.
“काही हरकत नाही बेटा.”
त्यांनी हाताने आतल्या खोलीकडे इशारा केला.
“तू आत जाऊन हातपाय धुऊन ये. शुद्धी महत्त्वाची असते.”
मग त्यांनी थोड्या गंभीर आवाजात सांगितले...
“आणि माझ्या माणसा बरोबर लगेच निघा.”
“का बाबा?”
“कारण वेळ फार कमी आहे.”
बाबांनी आकाशाकडे पाहिले.
“आज चंद्राची कोर दिसायला जास्त वेळ लागणार नाही.”
फिरोझ लक्षपूर्वक ऐकत होता. बाबा पुढे म्हणाले...
“तुम्हाला बांद्रा पूर्वेला जावं लागेल. तिथे रेल्वे पटरी कडून आत एक जुना रस्ता जातो.”
त्यांचा आवाज आता अधिक गंभीर झाला.
“चंद्राची कोर आकाशात दिसू लागली की त्या पटरी वरून थोडं आत चालत जा.”
“आणि?”
“जिथे एखादा अंधारलेला आडोसा दिसेल… तिथे हा उतारा ठेवून द्या.”
फिरोझने विचारले...
“आणि मग?”
बाबांनी त्याच्याकडे रोखून पाहिले.
“मागे वळून पाहायचं नाही.”
“काहीही झालं… तरी नाही.”
फिरोझच्या अंगावर काटा आला. इतक्यात बाबांचा एक शिष्य बाहेर आला.
“या साहेब…” तो म्हणाला.
फिरोझ उठला आणि त्याच्या सोबत आत गेला. आतल्या न्हाणीघरात पाण्याची मोठी बादली भरलेली होती. फिरोझने घाईघाईत हातपाय धुतले… चेहऱ्यावर पाणी मारले… आणि डोक्यावरूनही थोडे पाणी फिरवले. त्या थंड पाण्याने त्याला ताजेतवाने वाटले. शिष्याने त्याला छोटा टॉवेल दिला. फिरोझने हातपाय पुसले आणि बाहेर आला.
तो पुन्हा चटईवर बसला. अंगणात आता वातावरण आणखी गंभीर झाले होते. काही क्षणांनी आतल्या खोलीतून एक उग्र चेहऱ्याचा, उंच बांध्याचा माणूस बाहेर आला. त्याच्या डोळ्यांत विचित्र चमक होती. त्याच्या हातात एक मोठी जाड कापडी पिशवी होती. पिशवी थोडी हलत होती…
जणू आत काहीतरी जिवंत आहे. फिरोझचे डोळे विस्फारले. तो थोडा घाबरला.
“बाबा… यात काय आहे?”
इतक्यात बाबा त्याच्या जवळ आले. त्यांच्या आवाजात नेहमी सारखीच शांतता होती.
“बेटा… घाबरू नकोस.”
ते म्हणाले...
“ही त्या उताऱ्याची तयारी आहे.”
फिरोझ अजूनही त्या पिशवीकडे पाहत होता.
“पण… यात काहीतरी हलतंय…”
बाबांनी हलकेच स्मित केले.
“हो…”
“कारण काही शक्तींना शांत करण्यासाठी जिवंत बळी नसतो… पण जिवंत प्रतीक लागते.”
फिरोझच्या अंगावर पुन्हा काटा आला.
बाबा पुढे म्हणाले...
“आजची रात्र महत्त्वाची आहे.”
“जर हा उतारा योग्य रीतीने ठेवला गेला… तर झीनत वरील संकट कायमचं दूर होईल.”
त्यांनी फिरोझच्या खांद्यावर हात ठेवला.
“पण लक्षात ठेव…”
“धैर्य गमावायचं नाही.”
आणि त्या क्षणी अंगणातील दिव्याची ज्योत अचानक थोडी हलली… जणू ती ज्योत येणाऱ्या प्रसंगाची एक गूढ चाहूल देत होती.
क्रमशः
©किशोर तरवडे
©किशोर तरवडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा