फिरोझने झीनतचा हात झटकन आपल्या हातातून सोडवून घेतला. त्याच्या डोळ्यांत संतापाची ज्वाला पेटली होती. तो जणू आतापर्यंत साचलेले सगळे दुःख, राग आणि वेदना एका क्षणात बाहेर फेकत होता.
“झीनत…!” तो जवळजवळ ओरडलाच.
“आज माझ्यावर भयंकर आघात झालाय. माझ्या हृदयाची अक्षरशः शकले झाली आहेत. माझं मन सुन्न झालंय… रिकामं झालंय.”
त्याने छातीवर हात ठेवला.
“या मनाने सहन तरी किती करायचं? आणि का सहन करायचं?”
त्याचा आवाज आता कडवट झाला..
“तू… तू मोहाला बळी पडून माझ्या विश्वासालाच फसवलंस.”
तो थरथरत म्हणाला...
“तुझ्यावर किती विश्वास होता मला… त्या विश्वासामुळे मला तुझा अभिमान वाटायचा. पण तो विश्वास एवढ्या डळमळीत पायावर उभा आहे, हे मला माहीतच नव्हतं.”
तो कटाक्ष टाकत म्हणाला...
“आता तू म्हणशील… ‘शेवटी माणसाचं मन आहे… कधीतरी मोहाला बळी पडणारच.’”
त्याने जोरात मान हलवली.
“पण मी म्हणतो...का? का?? का??”
त्याचा आवाज वेदनेने भरला.
“जर एखादं मन खरं असेल… त्यात खरं प्रेम असेल… तर त्या मनाला बाहेरच्या रोषणाईचा मोह होणारच नाही.”
तो पुढे म्हणाला...
“आणि जर त्या मनात प्रेमाचा फक्त दिखावा असेल… तर ते मन कधीच एका व्यक्तीचं होऊ शकत नाही.”
फिरोझच्या मनातली सगळी सल आता शब्दांच्या रूपाने बाहेर पडत होती. त्याच्या प्रत्येक वाक्याचा बाण झीनतच्या हृदयात घुसत होता. झीनत शांत उभी होती. तिच्या डोळ्यांत अश्रू होते… पण ती रडत नव्हती. तिला माहीत होते,
चूक तिच्याकडून झाली होती. तिला सगळं सांगायचं होतं. पण घटनांची साखळी अशी गुंतत गेली होती की तिला काहीच सांगता आलं नव्हतं. आता अश्रूंनी स्वतःची सफाई देणं तिला योग्य वाटत नव्हतं.
हळूहळू तिच्या मनातल्या भावना दगडासारख्या कठीण होऊ लागल्या. अश्रू जणू गोठून गेले. एक क्षण असा आला... की ती आतून पूर्ण रिकामी झाली. तिच्या मनात एक विचार उमटला...
“झीनत… तुझ्या प्रेमाच्या फुलदाणीला तडा गेला आहे.”
“आता कोणतंही रसायन तिला पुन्हा जोडू शकणार नाही.”
“त्या फुलदाणीत सजवलेली रजनीगंधा आता विखुरणार… कोमेजणार… काळवंडणार… आणि शेवटी नामशेष होणार.”
“तुझ्या रजनीगंधाचा सुगंधच हरवून गेला आहे.”
“प्रत्येक रात्री चंद्र आपली सफर संपवतो… पण तुझी सफर कधी संपणार?”
तिच्या मनात एक प्रश्न घुमू लागला...
“त्या क्षणी… तू तू होतीस का?”
या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडेही नव्हतं. तिने डोळे मिटले. एक खोल श्वास घेतला. आणि शांतपणे बोलू लागली...
“फिरोझ…”
तिचा आवाज खूप हलका होता.
“मला माफ कर.”
ती थोडा वेळ थांबली.
“या क्षणी मी फक्त एवढंच बोलू शकते.”
तिने त्याच्याकडे कृतज्ञतेने पाहिले.
“तू माझ्या परिवाराला एका फुलासारखं जपलं आहेस. आज जे काही झालं… त्या सगळ्यात तू आमच्या पाठीशी उभा होतास.”
तिच्या डोळ्यांत पुन्हा ओल आली.
“त्यासाठी मी तुझी ऋणी आहे… आणि आयुष्यभर राहीन.”
ती पुढे म्हणाली...
“मी तुझा विश्वास गमावला आहे… हे मी मान्य करते.”
तिने मान खाली घातली.
“मला माफ कर.”
इतकं बोलून झीनत अचानक वळली. ती वेगाने आतल्या खोलीत गेली. आणि दरवाजा बंद करून घेतला. फिरोझ तिथेच उभा राहिला.त्याचे मन पूर्ण सुन्न झाले होते. त्याच्या मनात एक वेदनादायक विचार आला...
“आपण झीनतला असं बोलायला नको होतं…”
तो स्वतःशीच म्हणाला...
“पण जर या क्षणी तिला हे ऐकवलं नाही… तिला आपल्या चुकांची जाणीव करून दिली नाही… तर भविष्यात पुन्हा असं काही झालं तर?”
त्याने डोळे मिटले.
“मग आपण स्वतःलाच कधीच माफ करू शकणार नाही.”
त्याच्या मनात दुसरा आवाजही उठत होता....
“आत जा… तिला मिठीत घे… तिची सांत्वना कर… ती किती भयंकर प्रसंगातून वाचून आली आहे…”
पण वेळ फार कमी होता. त्याला अजून अनेक कामं करायची होती. त्याने स्वतःला समजावलं....
“ही सगळी कामं झाली की… मी झीनतशी एकांतात बोलणार. तिचंही सगळं ऐकून घेणार… आणि तिला पुन्हा आपल्या प्रेमाच्या बंधनात घट्ट बांधून ठेवणार.”
मन मात्र अजूनही झीनतकडे खेचलं जात होतं. त्याने मोबाईल काढला. आणि अम्मीजानचा नंबर डायल केला. पहिल्याच रिंगला फोन उचलला गेला.
“बेटा… सब खैरियत है ना?” अम्मीचा घाबरलेला आवाज ऐकू आला.
“आपली झीनत… अब्बू… तू… सगळे ठीक आहेत ना? सांग लवकर… मला खूप अस्वस्थ वाटतंय.”
त्यांच्या आवाजात धाप लागली होती. फिरोझ शांतपणे म्हणाला...
“हो अम्मीजान… अल्लाच्या दयेने सगळं ठीक झालं आहे. चष्मेवाले बाबांनी झीनतवरील संकट दूर केलं आहे.”
“अल्लाहचा लाख लाख शुक्र आहे…” अम्मीच्या तोंडून आपोआप निघाले.
फिरोझ पुढे म्हणाला...
“बाबांनी तुम्हा सगळ्यांना घरी बोलावलं आहे. तुम्ही लगेच या.”
तो विचारू लागला...
“मी येऊ का तुम्हाला घ्यायला?”
“नको बेटा… आम्ही येतो लगेच. पण झीनत कशी आहे? आणि अब्बूंना त्यांच्या खोलीत आराम करायला पाठवलं आहे ना?”
“हो अम्मी… तुम्ही काळजी करू नका.”
इतकं बोलून अम्मीने फोन ठेवला. फिरोझने सुटकेचा श्वास टाकला. त्याला आठवलं....
“चंद्रोदयापूर्वी बाबांकडे जायचं आहे.”
त्याने घड्याळ पाहिले. अम्मी येईपर्यंत त्याने हॉलमधला पसारा आवरला. मग तो सोफ्यावर बसून विचारात गढून गेला. अब्बूंनी त्याला एका मोठ्या दुविधेत टाकलं होतं. तो विचार करत होता...
“हे सगळं झीनतमुळेच झालं…”
झीनतचं आजचं वागणं पाहूनच अब्बूंच्या मनात शमाच्या निकाहचा विचार आला होता. तो पुन्हा अस्वस्थ झाला. थोड्या वेळापूर्वी त्याला झीनतच्या खोलीत जावंसं वाटत होतं. पण आता पुन्हा त्याचा मूड बिघडला. डोकं भणभणू लागलं.
इतक्यात...
टिंग टॉंग!
दाराची बेल वाजली.
फिरोझने पटकन दरवाजा उघडला. अम्मी, शमा आणि छोटा आत आले. आत येताच अम्मीने फिरोझचा हात धरला. त्याला सोफ्यावर बसवलं. आणि काळजीने विचारू लागली...
“फिरोझ… मला सगळं सांग. काय काय झालं? बाबांनी झीनतच्या अंगातील भूत कसं बाहेर काढलं?”
शमा आणि छोटाही उत्सुकतेने कान देऊन बसले होते. फिरोझने एक दीर्घ श्वास घेतला… आणि सगळा प्रसंग सांगायला सुरुवात केली.
***********
दरवाजा आतून बंद करताच झीनत काही क्षण तशीच उभी राहिली. बाहेरच्या खोलीत अजूनही हलक्या आवाजात फिरोझचे पावले ऐकू येत होती. त्या प्रत्येक आवाजाने तिच्या मनात वेदनेची लाट उठत होती. तिने हळूच दरवाजाला पाठ टेकवली. आणि पुढच्याच क्षणी तिचे गुडघे जणू साथ सोडून बसले. ती हळूहळू खाली घसरली. थंड जमिनीवर बसताच तिच्या छातीत साचलेले भावनांचे ओझे अचानक उसळले.
परंतु… आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या डोळ्यांतून अश्रूही बाहेर येत नव्हते. ती दोन्ही हातांनी चेहरा झाकून बसली. काही क्षण ती तशीच निश्चल राहिली. मग हळूहळू तिच्या ओठांवरून एक कुजबुज बाहेर पडली....
“या अल्लाह…”
तिचा आवाज थरथरत होता.
“मी काय करून बसले…”
तिने डोळे घट्ट मिटले.
फिरोझचे शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते...
“तू मोहाला बळी पडून माझ्या विश्वासालाच फसवलंस…”
त्या प्रत्येक शब्दाने तिच्या हृदयावर जखम केली होती. तिने कपाळावर हात ठेवला.
“फिरोझ… तुला सत्य कळलं होते की मी तिथे स्वतःच्या इच्छेने गेले नव्हते… त्या दुष्ट आत्म्याने माझ्या मनावर ताबा घेतला होता…”
तिचा आवाज तुटला.
“तरीही तू मलाच दोष दिलास?”
तिच्या डोळ्यांत आता अश्रू दाटू लागले. पण ती रडली नाही. ती उठली. खोलीत काही पावले चालली. टेबलावर ठेवलेला आरसा तिच्या नजरेस पडला. ती थबकली. आरशात स्वतःकडे पाहताच तिच्या मनात एक वेदनादायक विचार उमटला...
“ही… हीच ती झीनत आहे का… ज्यावर फिरोझ इतकं प्रेम करत होता?”
तिने आरशाकडे हात लावला.
“आज त्याच्या नजरेत मी काय झालेय?”
तिच्या ओठांवर कडवट हसू उमटलं.
“एक विश्वासघातकी मुलगी…”
तिने डोळे मिटले. तिच्या मनात जुन्या आठवणी उभ्या राहू लागल्या... फिरोझ सोबतचे छोटे छोटे क्षण… त्याच्या नजरेत दिसणारी आपुलकी… त्याने दिलेला विश्वास… ती कुजबुजली...
“फिरोझ… तू म्हणालास ना… खरं प्रेम असेल तर बाहेरच्या रोषणाईचा मोह होत नाही…”
तिचा आवाज आता पूर्णपणे तुटला होता.
“पण तुला कसं सांगू… त्या क्षणी माझं मन माझं राहिलंच नव्हतं…”
आता मात्र तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती पलंगावर बसली. दोन्ही हातांनी चेहरा झाकून रडू लागली. बराच वेळ ती तशीच रडत राहिली. रडता रडता तिचा आवाज मंद होत गेला. काही वेळाने ती शांत झाली. तिने हळूच डोळे पुसले. आणि खिडकीकडे पाहू लागली. रात्रीचा अंधार हळूहळू गडद होत होता. आकाशात ढगांच्या मागे चंद्र दडलेला होता. तिने मन हलकेच कुजबुजले...
“प्रत्येक रात्री चंद्र आपली सफर पूर्ण करतो…”
“पण माझी सफर?”
ती क्षणभर विचारात पडली. मग स्वतःशीच म्हणाली...
“जर फिरोझने मला कधीच माफ केलं नाही… तरी मी त्याच्यावरच प्रेम करणार.”
तिच्या डोळ्यांत आता एक शांत निर्धार दिसत होता.
“कारण माझं प्रेम खोटं नाही.”
ती हळूच उठली.
“या अल्लाह…”
ती आकाशाकडे पाहत पुटपुटली
“जर माझं मन खरं असेल… तर फिरोझच्या मनातला राग दूर कर.”
“त्याला सत्य कळू दे…”
“आणि जर माझी शिक्षा ठरलेली असेल… तर तीही मी स्वीकारते.”
ती नमाजच्या चटईवर बसली. डोळ्यांतून अजूनही अश्रू वाहत होते. पण त्या अश्रूंमध्ये आता फक्त वेदना नव्हती…
प्रायश्चित्तही होतं.
क्रमशः
©किशोर तरवडे
©किशोर तरवडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा