चष्मेवाले बाबा शांतपणे बोलत होते आणि त्यांचे शिष्य घरातील दारे-खिडक्यांवर बाबांनी दुआ केलेल्या राखेने काहीतरी पवित्र चिन्हे लिहीत होते. त्यांच्या हालचाली अतिशय सावध आणि नेमक्या होत्या. जणू प्रत्येक अक्षरात संरक्षणाची शक्ती दडलेली होती. सगळ्या दारे-खिडक्यांवर ते लिहून झाले, तेव्हा त्यांनी झीनतला अत्यंत काळजीपूर्वक उचलले आणि सोफ्यावर व्यवस्थित झोपवले.
त्यानंतर एका शिष्याने लहानशी बाटली उघडली. त्यात झमझमचे पवित्र पाणी होते. त्याने त्या पाण्याचे काही थेंब झीनतच्या चेहऱ्यावर हलकेच शिडकावले. दुवा केलेल्या त्या पवित्र पाण्याचा स्पर्श होताच जणू झीनतच्या शरीरातील सगळे विष उतरल्यासारखे वाटू लागले. तिच्या चेहऱ्यावर हळूहळू एक वेगळीच तरतरी उमटू लागली. काही क्षणांपूर्वी भीतीने विदीर्ण झालेला तिचा चेहरा आता शांत आणि समाधानाने उजळलेला दिसत होता.
ती जणू गाढ झोपेत गेल्यासारखी वाटत होती. संकट टळल्याची जाणीव तिच्या शांत श्वासांमध्ये स्पष्ट जाणवत होती. बाबांनी आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि हातानेच हलका इशारा करून त्यांना सगळे आवरण्यास सांगितले. घरात हळूहळू पुन्हा शांतता पसरू लागली. परंतु अब्बूची मनःस्थिती मात्र अजूनही फारच ढासळलेली होती. जे काही त्यांनी काही वेळापूर्वी पाहिले होते… जे काही त्यांच्या कानांनी ऐकले होते… त्या सगळ्याने त्यांच्या मनावर एक प्रचंड आघात झाला होता. आयुष्यभर ज्या प्रमाण-मूल्यांवर ते जगत आले होते, त्या सगळ्यांनाच जणू या घटनेने प्रश्नचिन्ह लावले होते.
“आता काय मानायचे?”
“कशावर विश्वास ठेवायचा?”
मनातील ही गोंधळलेली अवस्था त्यांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होती. तरीही त्यांनी मन घट्ट केले. ते सावकाश उठले आणि बाबांसमोर हात जोडून उभे राहिले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. ते अश्रूच त्यांच्या मनातील कृतज्ञतेची साक्ष देत होते. त्यांना चष्मेवाले बाबांचे मनापासून आभार मानायचे होते… पण शब्द मात्र त्यांच्या ओठांवर येत नव्हते. घशात काहीतरी अडकल्यासारखे झाले होते. फिरोझला मात्र सगळे समजत होते. अब्बूच्या मनात काय चालले आहे हे जणू त्याच्या मनातच उतरले होते. त्याने हलकेच पुढे येत बाबांसमोर आदराने मान झुकवली.
“बाबा… अब्बूंच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानतो. आज आपण नसतात तर… काय झाले असते ते सांगताही येत नाही.”
त्याचा आवाज भावनेने थरथरत होता.
ज्ञानी चष्मेवाले बाबा शांतपणे हे सगळे पाहत होते. त्यांना स्पष्ट जाणवत होते की सुलेमानजी आपल्या मुलीवर ओढवलेल्या या भयानक प्रसंगाने पूर्णपणे हादरले आहेत. बाबांच्या मनात काहीतरी बोलण्याची इच्छा उमटली होती… पण त्यांनी जणू स्वतःलाच आवर घातला. कदाचित हा क्षण त्यासाठी योग्य नव्हता. त्यांनी हळूच नजर फिरवली.
घरात आल्यापासून घरातील सगळ्यांची काळजी घेत असलेला फिरोझ त्यांच्या समोर उभा होता. बाबांची नजर काही क्षण त्याच्यावर स्थिरावली. मग त्यांनी मान वळवून गाढ झोपलेल्या झीनतकडे पाहिले. त्या क्षणी त्यांच्या मनात काय विचार चालले होते… हे कदाचित त्या उपरवाल्यालाच माहीत असावे. बाबांच्या त्या भेदक नजरेला नजर देताना फिरोझला थोडीशी लाज आणि संकोच जाणवत होता. जणू त्याच्या मनातल्या काही गोष्टी बाबांना कळल्या आहेत असे त्याला वाटत होते.
परंतु या क्षणी घरात परिस्थिती सांभाळण्यास त्याच्याशिवाय कोणीही सक्षम नव्हते. कुणास ठाऊक… त्या क्षणी त्याच्या मनात एक वेगळीच जबाबदारीची ताकद जागी झाली. त्याने स्वतःला सावरले. आणि तो बाबांच्या नजरेला नजर देत शांतपणे उभा राहिला. बाबा अजूनही त्यालाच निरखत होते. काही क्षणांनी त्यांच्या ओठांवर हलकेसे स्मित उमटले. मग ते आपल्या ममतामयी, शांत आवाजात बोलू लागले...
“बेटा फिरोझ…
एक काम करशील?”
फिरोझने आदराने मान हलवली.
बाबा पुढे म्हणाले...
“प्रथम सुलेमानजींना आतल्या खोलीत घेऊन जा. त्यांना थोडा विश्राम करू दे. ते खूप थकले आहेत… आणि आज जे काही घडले आहे, त्याचा त्यांच्यावर मोठा परिणाम झाला आहे.”
ते थोडा क्षण थांबले. मग पुन्हा शांतपणे म्हणाले...
“आणि शक्य असेल तर नूर भाभींनाही बोलावून घे. त्यांचीही येथे गरज लागेल.”
बाबांनी सभोवताली एक नजर टाकली.
“तोपर्यंत… मी इथली बाकीची तयारी करून घेतो.”
फिरोझने आदराने मान झुकवली.
“जी बाबा…”
तो हळूच अब्बूच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना आतल्या खोलीकडे घेऊन जाऊ लागला. आणि घरात पुन्हा एक गूढ शांतता पसरली… जणू काहीतरी अजून घडायचे बाकी आहे.
बाबांच्या सांगण्यानुसार फिरोझने त्वरित अब्बूंना आधार दिला आणि त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेला. खोलीत पोहोचताच त्याने फॅन लावला, हळुवारपणे त्यांना बिछान्यावर झोपवले. बाजूच्या टेबलावर पाण्याचा तांब्या ठेवला. तो निघणार इतक्यात... अब्बूंनी आपल्या थरथरणाऱ्या हाताने फिरोझचा हात पकडला. त्या अचानक झालेल्या स्पर्शाने फिरोझ क्षणभर थबकला. त्याच्या छातीत काहीतरी दाटून आले. तो वळून अब्बूंना पाहू लागला. त्यांच्या डोळ्यांत अजूनही अश्रू ओघळत होते.
फिरोझने हळूच त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि शांत आवाजात म्हणाला...
“अब्बू… तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळं आता व्यवस्थित झालं आहे. झीनतवरील संकट टळलं आहे. बाबांनी मला अम्मी जानला बोलवायला सांगितलं आहे. आणि अजून काही कामं असतील, तीही मी करून घेतो. मगच इथून जाईन… उद्याचा दिवस लागला तरी मी इथेच आहे.”
फिरोझच्या त्या शब्दांत मनापासूनची आपुलकी होती. अब्बूंनी त्याच्याकडे कृतज्ञतेने पाहिले. त्यांचा आवाज थरथरत होता.
“बेटा… तू अगदी फरिश्त्यासारखा या घरात आला आहेस. या परिवाराला तुझी नेहमीच साथ मिळाली आहे.”
ते क्षणभर थांबले. मग थोड्याशा कडवटपणाने पुढे म्हणाले...
“झीनतमुळेच या घराला तुझ्यासारखा मुलगा लाभला… म्हणूनच मी तिच्या अनेक गोष्टींवर पडदा टाकला. नाहीतर…”
त्यांच्या डोळ्यांत पुन्हा वेदना दाटून आल्या.
“तू पाहिलंस ना आज… काय करून ठेवलं तिने? एका परक्या तरुणा सोबत त्या घाणेरड्या ठिकाणी… अश्लील चाळे करत होती…”
अब्बूंचा आवाज तुटू लागला.
“माझी… आणि या घराण्याची सारी इज्जत मातीमध्ये मिळवली तिने…”
ते थरथरत म्हणाले...
“फिरोझ… बेटा… मला एक वचन दे. झीनतचं हे दुष्कृत्य आपल्या दोघांतच राहील.”
त्यांच्या आवाजात भीती होती.
“जर तिच्या अम्मीला याबद्दल कळलं… तर ती दु:खाने जीव देईल. माझ्याने आता काहीच होत नाहीये… मी आज आहे, उद्या नाही… माझ्यानंतर तिलाच या सगळ्यांना सांभाळायचं आहे…”
अब्बूंच्या डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते.
फिरोझच्या हृदयाला हे शब्द खूप खोलवर भिडले. त्याने ताबडतोब त्यांच्या हातावर आपला दुसरा हात ठेवला. त्याचा आवाज भावनेने भरून आला होता.
“अब्बूजी… आपली झीनत मासूम आहे. ती बेकसूर आहे. ती तिथे स्वतःच्या इच्छेने गेलेली नव्हती.”
तो थोडा थांबला.
“त्या तरुणाच्या मृतात्म्याने तिला आपल्या जाळ्यात ओढलं होतं. तिने मला सगळं सत्य सांगितलं आहे.”
फिरोझच्या डोळ्यांतही वेदना चमकत होत्या.
“तुम्ही त्या दुष्ट आत्म्याच्या शब्दांना मनाला का लावून घेत आहात? इतकी वर्षे तुम्ही झीनतला वाढवलं… तिच्यावर तुमचा विश्वास नाही का?”
त्याचा आवाज आता थोडा ठाम झाला.
“आणि एका मृतात्म्याने आपल्या दुष्ट खेळासाठी लावलेलं लांछन तुम्हाला खरं वाटतंय?”
त्याने हलकेच मान हलवली.
“नाही अब्बू… ते सगळं खोटं होतं. आणि राहिली ‘ही गोष्ट’ गुप्त ठेवण्याची… तर मी सांगतो, माझा झीनतवर पूर्ण विश्वास आहे. ती असं काहीच करणार नाही.”
हे बोलताना फिरोझचा गळा दाटून आला होता. त्याच्या मनात खूप वेदना होत्या. झीनतने त्याच्याबद्दल केलेला गैरसमज… आणि त्या गैरसमजातून तिने उचललेले ते चुकीचे पाऊल… त्या सगळ्याने अब्बूं प्रमाणेच त्याच्याही हृदयावर खोल जखम केली होती. पण या क्षणी त्याला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. या घरासाठी… आणि आपल्या प्रेमासाठी.
त्याने स्वतःला सावरले. तो उठून निघण्यास वळला. परंतु अब्बूंनी अजूनही त्याचा हात सोडला नव्हता. ते त्याच्या डोळ्यांत काहीतरी शोधत होते. जणू त्यांना एखाद्या उत्तराची… एखाद्या आश्वासनाची प्रतीक्षा होती. फिरोझने त्यांच्याकडे पाहत हलकेच विचारल्या सारखे नजरेनेच प्रश्न केला.
“काय अब्बू…?”
अब्बूंनी एक खोल श्वास घेतला. मग सावकाश त्याचा हात आपल्या हातातून सोडला. काही क्षण ते शून्यात पाहत राहिले. आणि मग हळूहळू बोलू लागले...
“बेटा… या घरावर तुझे खूप उपकार आहेत…” त्यांचा आवाज खूप शांत झाला होता.
“पण… अजून एक शेवटचा उपकार करशील?”
फिरोझचे हृदय धडधडू लागले. अब्बू पुढे म्हणाले...
“फिरोझ… तुझ्याशिवाय मी ही गोष्ट कोणालाच विचारू शकत नाही.” ते त्याच्याकडे एकटक पाहू लागले.
“बेटा… मी जे काही मागणार आहे… त्याची तुझ्यावर जबरदस्ती नाही.” त्यांनी थरथरत्या आवाजात विचारले...
“बोल… मागू का?”
अब्बूंचे ते अनपेक्षित शब्द ऐकून फिरोझच्या छातीत धडधड वाढली. काय मागणार आहेत अब्बू? हा प्रश्न त्याच्या मनात विजेसारखा चमकून गेला…
क्रमशः
©किशोर तरवडे.
©किशोर तरवडे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा