Login

विषारी स्पर्श : भाग १४.

.
झीनतच्या दुबळ्या पडलेल्या शरीरावर घुटमळणाऱ्या काळ्या वावटळीवर चष्मेवाले बाबांची तीक्ष्ण नजर होती. तो आत्मा ज्या पद्धतीने फिरत होता ते पाहून बाबांची मते क्षणाक्षणाला बदलत होती. 


अनुभवाने त्यांना माहित होते.. जर तो अतृप्त आत्मा पुन्हा  झीनत  च्या शरीरात शिरला तर मग त्याला बाहेर काढणे फार फार कठीण होणार होते. त्यामुळे बाबांची नजर एखाद्या ससाण्या सारखी त्या वावटळीवर गाडलेली होती. त्यांचा एक हात त्या आत्म्यावर रोखून होता, ज्यात लोबानचे भस्म एका भाल्या प्रमाणे तय्यार होते. श्वास रोखलेले होते. इतक्यात एक मोठा आवाज झाला... 


फट्ट !!!!! आणि घरातील ट्यूब लाईट उडाली... 


तिच्या बारीक काचा घरभर पसरल्या. बाबांनी ओळखले आत्म्याने चाल खेळली आहे. इतका वेळ  झीनत च्या शरीरावर फिरणारी ती वावटळ एका सेकंदाच्या कालावधीत गायब झाली होती.   

ज्ञानी बाबांना अतृप्त आत्म्यांचे डाव चांगलेच माहित असल्याने त्यांनी अगोदरच त्याला प्रत्युत्तर ठेवले होते. त्यांच्या दोन्ही शिष्यांनी दुसऱ्याच क्षणी चार मोठे चिराग पेटवले आणि भराभर  झीनत च्या चारी बाजूंना ठेवले. त्या चिराग मधून निघणारा पवित्र प्रकाश  झीनत च्या शरीरावर कवच बनून गेला. बाबा गंभीर होत उठले आणि त्यांनी  झीनत च्या भोवती आपल्या हातातील भस्माने वर्तुळ काढले. 


त्यांना कसेही करून  झीनत ला पुन्हा शिकार होऊ द्यायचे नव्हते. बाबांच्या तोंडून पवित्र आयतींचे धीरगंभीर स्वर निघत होते. ते तेथेच घुटमळत आपल्या दिव्य दृष्टीने तो आत्मा कोठे लपलाय त्याचा शोध घेत होते. घडणाऱ्या अनपेक्षित घटनांनी अब्बू आणि फिरोझ गारठून गेले होते. आता काय घडणार??? या विचारांनी त्या दोघांची हृदये वेगाने धाड धाड वाजत होती. बाबांनी  झीनत च्या दिशेने टाकलेले पाऊल अतिशय सावधपणाचे होते. त्यांच्यावर प्रतिहल्ला होण्याची दाट शक्यता होती. ते सावधपणे चहूकडे पाहात मागे मागे सरकू लागले होतेच 


आणि इतक्यात ते घडले... बाबांनी चपळतेने उसळी मारली. 

झीनतच्या वरच्या दिशेने एक कोळ्या सारख्या आकारावर झेपावला होता... बाबांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या दिशेने जोरात फुक मारली.... त्यासरशी मोठी किंकाळी सगळ्यांच्या कानांवर आली, आणि तो कोळ्याचा काळा आकार सुकलेल्या पाचोळ्या सारखा  झीनत च्या पायांशी पसरला. 


बाबांनी अपवित्र आत्म्याचा डाव उलटवून लागला होता. त्याला बेसावधपणे पुन्हा  झीनत च्या शरीरात बेमालूमपणे वस्ती करायची होती. परंतु बाबांनी त्याचा इरादा चूर चूर केला होता. बाबांचा संताप वाढला होता. बाबांनी  झीनत च्या पायांकडील एक चिराग आपल्या हातात उचलला आणि त्या पाचोळ्या सारख्या राखेच्या दिशेने रोखत आपल्या पहाडी आवाजात कडाडले. 


"दुष्ट !! दोजख के कीड़े !! मुझसे चालाकी कर रहे थे?? 
अब तेरा खेल खत्म हो जायेगा... तुझे अच्छेसे जाने के लिए कहा था. 
जाते जाते तुझे खाने के लिए कुछ देने का भी सोचा था... 
लेकिन तेरी बेईमानी देखकर तुझे अब कुछ नहीं मिलने वाला... 
अब निकलता है या तुझे यही जला दू??"


"माफ़ी माफ़ी !!! माफ़ी सरकार !! 
जाता हु मैं, मुझे इतना मत मारो.. 
मैंने आपके मासूम को हात भी नहीं लगाया... 
लेकिन उस नौजवान रुहको तो पटक पटक के मारा... 
थक गया हु... अब बोहोत भूक लगी है... 
बरसों से भूखा हु.. कुछ खाने को दे दो.. मैं चला जाऊंगा" ... 

आत्म्याचा मलूल आवाज घरात गुंजला. बाबांच्या तांत्रिक माराने त्याचा माज निघाला होता. 


"अब आया ना ठिकाने पर.. 
तुम्हारे जग की रीत का लिहाज करते हुए तुझे आज रात को, चार काली मुर्गी की दावत भेज देंगे, 
लेकिन फिर कभी तेरे घरसे बहार निकलना नहीं.. चल निकल अभी" ... बाबांनी त्याला आश्वासन दिले. 


सावकाश पाऊले टाकत बाबा पुन्हा आपल्या ठिकाणी येऊन बसले... आपल्या वश मध्ये आलेल्या त्या अतृप्त आत्म्याला बांधून टाकायचे होते.. त्यांनी पुन्हा डोळे मिटून आयातींचे पठण सुरु केले... पुढील काही मिनिटात घरातील वातावरणात बदल होऊ लागला... हलकासा वारा वाहू लागला...  झीनत च्या चारी बाजूंना जळणाऱ्या चिरागांच्या ज्योती फडफडू लागल्या. वातावरण काहीसे उष्ण होऊ लागले...  


त्याच्या पायांपाशी दिसत असलेला काळसर धूर हलकेच वर वर तरंगत खिडकीच्या दिशेने सरकू लागला... इतक्यात घराची उघडी खिडकी खाडकन आपटली आणि बंद झाली. तो आत्मा त्या खिडकी मधून निघून गेला होता. बाबांनी डोळे उघडले... आपले दोन्ही हात वर करून आपल्या शिष्यांना इशारा केला. ते पटकन उठले आणि त्यांनी भराभर घराच्या खिडक्या बंद केल्या आणि ते तेवणारे चिराग उचलले आणि घरातील चारी दिशांना नेवून ठेवले. 


पवित्र ज्ञानी चष्मेवाले बाबांच्या अति पवित्र शक्तींनी एक अतृप्त वादळ फारशी काही पडझड न करता निघून गेले होते.  घरातील वातावरण शिथिल झाले होते. बाबांनी सगळ्यांना आपल्या जवळ बोलावले. थरथरणाऱ्या अब्बून्ना सहारा देत फिरोझ बाबांच्या जवळ येऊन बसला. बाबा आता काय सांगणार हे ऐकायला त्या दोघांचे प्राण कानांमध्ये आले होते. बाबांच्या चेहेऱ्यावर प्रसन्न तेज पसरलेले होते. त्यांनी प्रथम  झीनतच्या शरीराकडे आपल्या हातातील उरलेली राख फेकली आणि फिरोझ आणि अब्बूकडे पहात बोलू लागले. 


"सुलेमानजी !! उपरवाल्याच्या कृपेने आपल्या मुली वरील लिंगपिसाट अतृप्त आत्म्याचे संकट टळलेले आहे. 
आता आपल्याला घाबरण्याचे काही कारण नाही. 
आपल्या घराच्या दारे खिडक्यांवर प्रतिबंधक रक्षक ठेवणार आहे. 
तेव्हा तो आत्मा पुन्हा या घरात येऊ शकणार नाही".