झीनतच्या तोंडून तिच्यात शिरलेल्या त्या दुष्ट आत्म्याचे शब्द बाहेर पडताच अब्बूंच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले. त्यांच्या डोळ्यांत भीती, संभ्रम आणि वेदना एकत्र दाटल्या. फिरोजच्या मनातही अचानक शंकांचे वादळ उठले. तो आत्मा पुढे काय बोलणार आहे याची एक धूसर कल्पना त्याला येऊ लागली होती. आणि ती कल्पनाच त्याच्या अंगावर काटा आणत होती.
“जर आपल्या मनात जे येतंय… तेच जर त्या आत्म्याने उघडपणे सांगितलं… तर अब्बूंवर फार मोठा आघात होईल…”
हा विचार मनात येताच फिरोज आतून कासावीस झाला.
“नाही… नाही…!”
त्याच्या मनात विचारांची धडपड सुरू झाली.
“झीनत इम्रानच्या मागे त्या जागी प्रणयासाठी गेली होती… हे असं उघड होऊ नये… कदापि नको!”
जर तेच सत्य बाहेर आलं तर… आज इथे आलेले चष्मेवाले बाबा… अब्बूंची त्यांच्याशी असलेली मैत्री… या घराची इज्जत… सगळ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहील. आणि उद्या ही गोष्ट समाजात कर्णोपकर्णी झाली तर? या कुटुंबावर संकट कोसळेल. जवान मुलीच्या लग्नाचा प्रश्न निर्माण होईल… आणि समाजात मान असलेले अब्बू पूर्णपणे कोलमडून जातील. फिरोजचे मन या विचारांनी व्याकुळ झाले. त्याने नकळत अब्बूंच्या हातांवर आपला हात ठेवला आणि त्यांच्या कानाजवळ हलक्या आवाजात म्हणाला...
“अब्बू… घाबरू नका… ये शैतान सरासर झूठ बोल रहा है। इसको किसी भी तरह हमारी झीनत को बदनाम करना है… ताकि खुद को सही साबित कर सके.”
फिरोजला अजून काही बोलायचं होतं. पण तेवढ्यात झीनतच्या तोंडून तो आत्मा पुन्हा भीषण आवाजात ओरडू लागला.
“सुनो…! उस दिन… ये खूबसूरत लड़की अकेली नहीं आयी थी मेरे घर में…”
घरात क्षणात शांतता पसरली. सगळ्यांचे कान त्या आवाजाकडे लागले.
“इसके साथ… एक नौजवान रूह भी थी…” त्या आवाजात विकृत आनंद मिसळला होता.
“जैसे ही वो दोनों पटरी के पास आये… उस नौजवान ने तुम्हारी इस मासूम को अपनी बाहों में कस लिया…”
तो आत्मा भेसूरपणे हसू लागला.
“और फिर… दोनों ऐसे लिपटे जैसे मियाँ बीवी हों…”
घरात उभ्या प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले.
“वो लड़की… जिसे तुम मासूम कहते हो…” आवाज आता आणखी गलिच्छ झाला.
“वो खुद को उस नौजवान के हवाले करने लगी… मेरे सामने…”
तो आत्मा अचानक गुरगुरला.
“मैं भी बरसों से जिस्म की आग में जल रहा था… उसकी खुशबू… उसका जिस्म…” तो क्षणभर थांबला.
“बस… मेरी नज़र उसपर टिक गयी.” तो पुढे विकृतपणे हसत म्हणाला...
“जो नौजवान उसके साथ था… उसे मैंने ऐसी लात मारी कि वो छटपटाने लगा…”
फिरोजच्या डोळ्यांत संताप जळू लागला. पण आत्मा अजून बोलत होता.
“और फिर… मैंने इस लड़की को वही रोक लिया…” तो आवाज आता दर्पाने भरला होता.
“अब ये मेरी कनीज़ है… इसपर तुम्हारा कोई हक नहीं है।”
भेसूर हसत तो पुढे म्हणाला...
“अगर मैं बीच में नहीं आता… तो भी तुम्हारी ये लाडली उस नौजवान रुहकी शिकार होती…”
त्या दुष्ट आत्म्याचे हास्य खोलीत घुमू लागले. इतका वेळ तो अपवित्र आत्मा झीनतच्याच तोंडून तिच्या अब्रूचे लचके तोडत होता. आणि झीनतचे अब्बू असहायपणे उभे होते. त्यांनी दोन्ही हात कानांवर ठेवले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. ते नकारार्थी मान हलवत पुटपुटत होते...
“नाही… नाही…! माझी झीनत असं काही करू शकत नाही… हे सगळं खोटं आहे… खोटं आहे…”
फिरोजचं हृदय मात्र आतून जळून खाक होत होतं. त्याचा चेहरा कठोर झाला. संतापाने त्याच्या नाकपुड्या फुलल्या. त्याच्या छातीतला गरम श्वास वेगाने बाहेर पडत होता. सहन होत नसतानाही त्याने स्वतःला आवरले. कारण त्याला अजून ऐकायचं होतं... तो आत्मा आणखी काय उघड करणार आहे? दरम्यान चष्मेवाले बाबा मात्र अजिबात विचलित झाले नव्हते. उलट त्यांचा चेहरा आणखी उग्र झाला. त्यांनी एकदम लोबानची राख आणि झमझमचे पाणी झीनतवर फेकले. आणि डोळे मिटून पवित्र आयातींचे उच्चार सुरू केले.
तो त्यांचा हुकमी वार होता. त्यांच्या धीरगंभीर आवाजाने संपूर्ण वातावरण बदलू लागले. झीनतच्या शरीरातील आत्मा वेड्यासारखा तडफडू लागला. तिचे हातपाय झटके देऊ लागले. काही क्षणात झीनतचे शरीर पूर्ण मलूल झाले. जणू त्या पवित्र आयातींच्या शक्तीने तिच्यातील सगळ्या दुष्ट शक्तींचा नाश झाला होता. बाबांना अंतःप्रेरणेने ते जाणवले. त्यांनी सावकाश डोळे उघडले.
त्यांचे डोळे मोठे झाले. पुन्हा त्यांनी लोबानची राख झीनतच्या शरीरावर टाकली. झीनतचे शरीर फक्त हलकेसे थरथरले. बाबांच्या चेहऱ्यावर विजयाचे तेज पसरले. त्यांनी मान वळवून अब्बूकडे पाहिले... जणू सांगत होते… आत्मा आता आपल्या ताब्यात आहे. बाबा कडक आवाजात गर्जले...
“दुष्टा! नीच अधमा! तुझ्याकडून आणखी काय अपेक्षा असणार? तू वासनांचा गुलाम आहेस… म्हणून अजून तडफडतोयस. पण खबरदार! आमच्या मुलीकडे पुन्हा वाईट नजरेने पाहिलंस तर तुला राख करून टाकेन!
"चल... जिथून आलास तिथे निघून जा!”
बाबांच्या आवाजाने तो आत्मा हादरला. झीनतच्या शरीराची पुन्हा हालचाल झाली. तिच्या भोवती हवेत एक गोल वावटळ तयार होऊ लागली. घरातील दिव्यांचा प्रकाश हलू लागला. काळपट धुरकट सावली हवेत उमटली. हळूहळू एक हिरवट-काळा आकार झीनतच्या शरीरातून बाहेर येऊ लागला. काही क्षणात त्या मलूल शरीरावर एक उंच, विकृत छाया डोलताना दिसू लागली.
बाबांची तेजस्वी नजर त्या आकारावर खिळली होती. त्यांनी मनात ओळखले... हा साधा आत्मा नव्हता. तो एका वासनेने पछाडलेल्या तरुणाचा अतृप्त आत्मा होता. बाबा शांत उभे राहिले. कारण त्यांना माहित होते. जाताना हा आत्मा काहीतरी मागणार. अमानवी जगाची तीच रीत होती. तो आत्मा झीनत भोवती घुटमळत होता. त्याला नव्याने मिळालेला देह सोडायचा नव्हता. बाबांनी पुन्हा हात उगारला.
“थांबला का आहेस? तुझ्या मनातला मोह तुझा नाश करेल. बोल... आणखी काय हवं आहे तुला?”
हे ऐकताच ती धुरकट आकृती गोल गोल फिरू लागली. क्षणात ती वावटळ बनली. आणि झीनतच्या शरीरा भोवती फेर धरून फिरू लागली. त्या वासनांध, अतृप्त आत्म्याला झीनतच्या देहाचा मोह सुटत नव्हता. घरातील सगळे श्वास रोखून ते दृश्य पाहत होते… हवेत एक भयानक ताण पसरला होता.
क्रमशः
किशोर तरवडे
किशोर तरवडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा