अब्बूच्या त्या शब्दांनी दचकलेला फिरोझ डोळे फाडून झीनतकडे पाहू लागला. तिच्यात होत असलेल्या त्या विचित्र बदलांनी आता त्यालाही खात्री पटू लागली होती. त्या खोलीत ते पाच जण नव्हते… त्यांच्या व्यतिरिक्त अजून कुणीतरी उपस्थित होते. चष्मेवाले बाबा आता पूर्ण सावध झाले होते. त्यांची नजर झीनतवर खिळली होती. झीनत मात्र जणू स्वतःच्या शरीरातच कुठेतरी लपण्याचा असहाय प्रयत्न करत होती. तिचे हातपाय अनियंत्रितपणे थरथरत होते.
अचानक बाबांनी झपाट्याने झीनतच्या दिशेने पवित्र आयातींची फुंकर मारली. क्षणातच झीनतच्या तोंडातून एक तीव्र किंकाळी बाहेर पडली. बाबांच्या तोंडातून निघालेली ती फुंकर जणू एखादा आसूड असावा, अशा प्रकारे झीनतच्या पाठीवर एक लालसर वळ उमटल्या सारखा दिसू लागला. तो मार जरी झीनतच्या शरीरावर पडत असला, तरी वेदना मात्र तिच्या शरीरात लपलेल्या त्या दुष्ट शक्तीला होत होत्या. झीनत वाकडी तिकडी झाली... ती जमिनीवर लोळू लागली… हातपाय झाडू लागली… आणि तिच्या तोंडातून एक संतापलेली गुरगुर बाहेर पडू लागली.
ते दृश्य अब्बूंना सहन होत नव्हते. आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून त्यांचे हृदय अक्षरशः तुटत होते. क्षणभर त्यांना वाटले... इथेच डोळे कायमचे मिटून जावेत. त्यांनी वेदनेने काही क्षण डोळे बंद केले. पण बाबांचा वेग मात्र वाढत चालला होता. नगाऱ्याचा आवाज आता टोकाला पोहोचला होता.
"ढम… ढम… ढम…!"
क्षणात बाबा आपल्या जागेवरून ताडकन उठले. त्यांनी लोबान पात्रातील राख मुठीत घेतली… आणि ती झीनतच्या दिशेने जोरात फेकली. ती साधी राख नव्हती, जणू एखादा तीक्ष्ण बाण झेपावला होता. झीनतच्या तोंडातून पुन्हा एक वेदनादायी आरोळी बाहेर पडली. आणि अचानक... झीनतचा आवाज बदलला. तो तिचा आवाज राहिला नव्हता. तिच्या तोंडातून कोणीतरी दुसरेच बोलू लागले होते.
हे दृश्य पाहून अब्बू आणि फिरोझ दोघेही हादरून गेले. त्यांच्या अंगावर अक्षरशः काटा आला. पण झीनतला या भयंकर चक्रातून बाहेर काढणे अधिक महत्त्वाचे होते. म्हणून दोघेही श्वास रोखून समोर घडणाऱ्या त्या भयाण नाट्याकडे पाहत राहिले. बाबांनी पुन्हा झीनतच्या दिशेने जोरात फुंकर मारली. आणि तिच्या छातीवर लोबानची राख फेकली. यावेळी मात्र झीनतमधील तो दुष्ट आत्मा जणू वर्मी घाव बसल्यासारखा विव्हळू लागला. त्याच्या तोंडून संतापाने भरलेले शब्द बाहेर पडले...
"क्यों बुलाया है मुझे…? कौन हो तुम…? क्यों मार रहे हो मुझे…?" त्याचा आवाज गुरगुरत होता. "लेकिन तुम मेरा कुछ बिगाड़ नहीं सकते…!"
बाबांनी त्याच्याकडे रोखून पाहिले. त्यांचा आवाज आता अधिक कठोर झाला.
"तुम्हें बाहर इसलिए बुलाया है… क्योंकि तुमने एक बेकसूर को तकलीफ़ में डाला है. उसकी ज़िंदगी से खिलवाड़ करने लगे हो…" ते एक पाऊल पुढे आले.
"बोलो… कौन हो तुम? बताओ… वरना…"
इतके बोलून बाबांनी आपल्या पिशवीतून एक छोटी कुपी बाहेर काढली. त्यात ज़मज़मचे पवित्र पाणी होते. बाबांनी ते पाणी झीनतच्या अंगावर शिंपडले. त्या पाण्याचा स्पर्श होताच जणू आग पेटल्या सारखे झाले. झीनत मधील तो आत्मा जणू जळत असल्या सारखा तडफडू लागला. ती जमिनीवर गडाबडा लोळू लागली. तिच्या तोंडातून भयानक किंकाळ्या बाहेर पडू लागल्या. बाबा तिच्या अगदी जवळ उभे होते. त्यांनी पुन्हा कठोर आवाजात आज्ञा केली.
"बोल… कौन है तू? और इस मासूम लड़की के पीछे क्यों पड़ा है?"
खोलीत काही क्षण भयानक शांतता पसरली… नगाऱ्याचा आवाज मंद झाला… लोबानचा धूर हवेत घोंगावत होता… आणि झीनतच्या तोंडातून एक घोगरा, थंड आवाज बाहेर पडला...
"मैं… बताऊँगा… लेकिन सुनकर तुम सब पछताओगे…"
“वक्त मत जाया करो… और बहाने भी मत बनाओ! तुम मेरे हाथों से कहीं भी छूटकर नहीं जा सकते. जल्दी बताओ—कौन हो तुम? और इस मासूम को क्यों कैद किया है? बताओ… वरना…!”
असे दरडावत बाबांनी त्याच्यावर हात उगारला. बाबा अजून काही शस्त्र अंगावर फेकतील या भीतीने झीनतच्या तोंडून ती शक्ती जोरात ओरडली. झीनत जणू बाबां समोर शरण आली.
“नहीं… नहीं! बताता हूँ… हु… हु… बताता हूँ. मेरे नाम से क्या लेना-देना आपको?”
दुष्ट आत्मा गुरगुरत म्हणाला.
“तेरे नाम से भी लेना है… और तू कहाँ से आया है उससे भी मुझे लेना-देना है. अब जल्दी बता! नहीं बताया तो तुझे यहीं गाड़ दूँगा!”
बाबा संतापाने कडाडले.
“रुको… रुको! बताता हूँ… मैं बांद्रा टर्मिनस की पटरी से आया हूँ. सालों से वहीं बस गया हूँ…”
झीनतच्या तोंडून कुणीतरी दुसरेच बोलत होते.
समोर झीनतच्या तोंडून निघालेले हे शब्द ऐकताच अब्बू हवालदिल झाले. त्यांनी घाबरून पटकन फिरोजचा हात पकडला. त्यांच्या संपूर्ण शरीराला कंप सुटला होता. डोळ्यांत भीतीचे पाणी दाटले होते. फिरोजही समोरचे दृश्य पाहून क्षणभर स्तब्ध झाला. तरी स्वतःला सावरत त्याने अब्बूचा हात घट्ट पकडला आणि हलक्या आवाजात म्हणाला...
“अब्बू… काळजी करू नका. चष्मेवाले बाबा आपल्या झीनतला यातून सुखरूप सोडवतील. आणि… आणि… मी आहे ना… मी सगळं सांभाळून घेईन.
आत्ता आपण समोर लक्ष देऊया.”
आपल्या प्रिय झीनतच्या कुटुंबाचे रक्षण करण्याचा निश्चय करून फिरोज एकाग्रतेने पुढे पाहू लागला.
दरम्यान बाबांनी पुन्हा झीनतच्या दिशेने फुंकर मारली आणि त्यांच्या कुपीतले पवित्र पाणी तिच्यावर शिंपडले. त्या पाण्याचा स्पर्श होताच झीनत मधील तो आत्मा प्राणांतिक वेदनेने विव्हळू लागला. बाबांच्या डोळ्यांत संताप धगधगत होता. ते पुन्हा कडाडले...
“अरे! तू पटरीवरचा आहेस तर आमच्या मासूम मुलीला का त्रास देतोयस? तिचा काहीही दोष नसताना, फक्त स्वतःच्या मतलबासाठी तिला पकडलंस!
"मी तुला आज्ञा देतो, या क्षणी आमच्या मुलीला सोड आणि जिथून आला आहेस तिथे कायमचा निघून जा! पुन्हा तिला त्रास दिलास तर तुझ्याबरोबर खूप वाईट होईल… हे लक्षात ठेव!”
क्षणभर शांतता पसरली. आणि अचानक झीनतच्या तोंडून एक भेसूर हसू फुटलं...
“अरे जा… जा! मला नको शिकवूस की तुमची मुलगी मासूम आहे… तुम्हाला माहिती तरी आहे का? ही तुमची चिकणी मुलगी माझ्या घरात कशासाठी आली होती?
हाSS… हाSS… हाSSS…!”
तो दुष्ट आत्मा भेसूरपणे हसत होता. जणू बाबांची खिल्ली उडवत होता. बाबा संतापाने पुन्हा गर्जले...
“उगाच बहाणे करू नकोस! आमची मासूम मुलगी मित्राकडून उशीर झाला म्हणून फक्त पटरीवरून स्टेशनकडे येत होती. तिला माहित नव्हतं की तिथे तुझं घर आहे. आणि इतका का हसतोयस? माझ्या पवित्र शक्तींना मजाक समजलास तर समजून घे!”
त्यावर झीनतच्या तोंडून पुन्हा तोच करडा आवाज घुमला...
“खामोश…! खामोश तो आप हो जाइये! जिस लाडकी को तुम मासूम बोल रहे हो… वो आपकी आँखों में धूल झोंक रही है। मैं बताता हूँ… उस दिन मेरे घर में ये लड़की अकेली नहीं आयी थी… इसके साथ… और भी कोई था…”
हे बोलताना त्या दुष्ट आत्म्याचा आवाज छद्मी आणि धोकादायक झाला होता. खोलीत उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले…
*(झमझमचे पाणी हे मुस्लिमांसाठी जगातील सर्वात पवित्र पाणी मानले जाते, जे सौदी अरेबियातील मक्का येथील मस्जिद अल-हरम मध्ये असलेल्या ४,००० वर्ष जुन्या विहिरीतून येते. वाईट शक्ती किंवा दुष्ट आत्म्यांना घालवण्यासाठी झमझमच्या पाण्याचा वापर इस्लामिक परंपरेत अत्यंत प्रभावी मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, हे पाणी शुद्धता आणि ईश्वरीय संरक्षणाचे प्रतीक आहे.)
क्रमशः
©किशोर तरवडे
©किशोर तरवडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा