Login

विषारी स्पर्श : भाग ११.

.
सर्वप्रथम अब्बू आणि फिरोझ आत आले आणि त्यांच्या मागोमाग पांढऱ्या शुभ्र मलमली पेहराव्यात चष्मेवाले बाबा आत अवतरले. त्यांच्या मागे आणखी दोन जण होते बहुधा त्यांचे शिष्य असावेत. खोलीत प्रवेश करताच बाबांची नजर त्यांच्या रिमलेस फ्रेमच्या चष्म्यातून थेट झीनतवर रोखली गेली आणि ते क्षणभर जागच्या जागी थांबले. त्यांच्या नितळ कपाळावर एक सूक्ष्म आठी उमटली. डोळ्यांत क्षणभर हालचाल झाली… आणि पुन्हा ते शांत झाले.


झीनत मात्र त्यांच्याकडे टक लावून पाहत होती. बाबांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज जाणवत होते. खांद्यापर्यंत रुळणारे शुभ्र पांढरे केस… छातीपर्यंत झुलणारी मुलायम दाढी… गळ्यात स्फटिकांच्या विशिष्ट माळा झुलत होत्या. तसेच त्यांच्या उजव्या मनगटातही एक चकाकणारी माळ लक्ष वेधून घेत होती. बाबांनी खोलीत पाऊल टाकताच घरातील वातावरणात एक मंद, सुगंधी वास दरवळू लागला. तो सुगंध हळूहळू संपूर्ण खोलीत पसरू लागला… आणि नकळत झीनतच्या मनाला एक वेगळेच पावित्र्य जाणवू लागले.


बाबा सावकाश पावले टाकत झीनतच्या दिशेने आले. झीनत अवघडून गेली. फिरोझने क्षणाचाही विलंब न करता पुढे येऊन बाबांसाठी एक आरामखुर्ची आणली. बाबांनी हलक्या खुणेने ती खुर्ची झीनतच्या समोर, एका विशिष्ट अंतरावर ठेवायला सांगितली. फिरोझने तसेच केले. बाबा त्या खुर्चीवर स्थिरावले. त्यांच्या सोबत आलेल्या दोन्ही शिष्यांनी झीनतच्या दोन्ही बाजूंना आपली बैठक मारली. अब्बू आणि फिरोझ अजूनही उभेच होते. दोघेही बाबांच्या पुढील सूचनांची वाट पाहत होते. इतक्यात बाबांच्या चेहऱ्यावर हलके स्मित उमटले. ते अब्बूकडे पाहत शांतपणे म्हणाले... 


"सुलेमान साहब… घरातील स्त्रियांना आणि लहान मुलांना काही वेळासाठी शेजाऱ्यांकडे पाठवा. त्यानंतर आपण काम सुरू करू."


बाबांचे शब्द ऐकताच दरवाज्याच्या आडून डोकावणाऱ्या अम्मी आणि शमा अस्वस्थ झाल्या. त्यांचा नाईलाज होता. पण आपल्या प्रिय झीनतच्या इलाजासाठी त्या काहीही करायला तयार होत्या. दोघींनी पटकन बुरखा चढवला. जाण्यापूर्वी त्यांनी बाबांना आदराने अभिवादन केले. आणि मग त्या घराबाहेर निघून गेल्या. त्या बाहेर पडताच बाबांनी अब्बूंना हाताने एका बाजूला बसण्याची खूण केली. मग त्यांनी फिरोझकडे पाहत सांगितल... 


"घराच्या सगळ्या खिडक्या उघड."


फिरोझने तत्परतेने घरातील एकएक खिडकी उघडायला सुरुवात केली. थोड्याच वेळात बाहेरची थंड हवा खोलीत शिरू लागली. तोही मग येऊन अब्बूंच्या बाजूला शांतपणे बसला. खोलीत आता एक विचित्र शांतता पसरली होती. सगळ्यांचे लक्ष फक्त एका गोष्टीवर केंद्रित झाले होते...


आता पुढे चष्मेवाले बाबा काय करणार?


सगळे मनासारखे झाले असे वाटताच बाबांनी आपल्या चेल्यांकडे पाहून हलक्याच आवाजात काही सूचना दिल्या. क्षणातच त्यांच्या शिष्यांनी आपल्या बरोबर आणलेल्या पिशव्या उघडल्या आणि त्यातून विविध वस्तू बाहेर काढू लागले. काही माळा… काही विचित्र चिन्हे असलेली कापडी पट्टी… काही लहान बाटल्या… आणि काही अनोळखी वस्तू. ते सगळे सामान त्यांनी झीनतच्या समोर नीट मांडायला सुरुवात केली.


बिथरलेली झीनत ते सगळं डोळे मोठे करून पाहत होती. पण त्या सगळ्या वस्तूंमध्ये तिचे लक्ष एका वस्तूवर जाऊन खिळले... एक काळी बाहुली. ती बाहुली पाहताच तिच्या अंगावर सरसरून काटा आला. बाहुलीचे निर्जीव डोळे जणू तिच्याकडेच रोखून पाहत आहेत असा तिला भास होत होता.


इतक्यात दुसऱ्या शिष्याने लोबान पात्रात लोबान टाकून धूप पेटवला. काही क्षणांतच त्यातून उठणारा सुगंधी धूर हळूहळू खोलीत पसरू लागला. त्या धुराने संपूर्ण वातावरण एक वेगळेच गूढ रूप धारण करू लागले. बाबांनी झीनतकडे प्रेमाने पाहिले. झीनत असहायपणे त्यांच्याकडेच पाहत होती. बाबांच्या नजरेत एक विलक्षण पवित्र शांतता होती. जणू तिच्या मनातील सगळे विचार त्यांना स्पष्टपणे ऐकू येत होते. त्यांनी हळूच एक हात वर केला आणि तिला धीर देण्याच्या सुरात म्हणाले... 


"बेटा झीनत… घाबरू नकोस." त्यांचा आवाज मंद पण ठाम होता. 


"मनात त्या उपरवाल्याला आठव… बाकी सगळं मी पाहतो." ते थोडे पुढे झुकले.


"आता डोळे मिटून घे." 


बाबांचे शब्द जणू एखाद्या जादूच्या मंत्रासारखे होते. झीनतने नकळत डोळे मिटले. तिच्या ओठांवर काही अस्पष्ट पुटपुटणे सुरू झाले. कदाचित ती मनोमन प्रार्थना करत होती. बाबांनी आपल्या गळ्यातील एक पवित्र माळ हातात घेतली आणि त्यांनीही डोळे मिटले. काही क्षणांतच घरातील वातावरण लोबानच्या धुराने पूर्ण भरून गेले. बाबांच्या तोंडून पवित्र कुराणातील आयातींचा धीरगंभीर स्वर उमटू लागला. आयातींचा आवाज हळूहळू संपूर्ण खोलीत घुमू लागला.


तो आवाज जणू भिंतींना भिडून परत परत ऐकू येत होता. अचानक... एका शिष्याने आणलेला नगारा वाजू लागला.


"ढम… ढम… ढम…"


त्या आवाजा सोबतच वातावरणात एक अनोखे कंपन निर्माण झाले. क्षणात झीनतच्या आसपासचे वातावरण बदलू लागले. लोबानच्या धुरामध्ये तिच्या भोवती जणू एक धुरकट काळसर वलय तयार होत असल्याचा भास होऊ लागला. ती बसली होती त्या जागे भोवतीच्या वस्तू हलक्या थरथरू लागल्या. झीनतच्या कपाळावर घामाचे थेंब जमा होऊ लागले. तिचा श्वास वेगाने चालू लागला. हळूहळू तिचे शरीर आकसून जाऊ लागले. तिचे हात पाय ताणले जाऊ लागले.


लांब बसलेले अब्बू आणि फिरोझ हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती उमटली होती. बाबांच्या आयाती वाचण्याचा वेग वाढू लागला. नगाऱ्याचा आवाज आणखी जोरात घुमू लागला. त्या पवित्र शब्दांच्या माऱ्याने जणू झीनतच्या शरीरात लपलेली ती अपवित्र शक्ती अस्वस्थ होऊ लागली होती. झीनतचे शरीर अचानक जोरजोराने थरथरू लागले. तिचे डोके एका बाजूने दुसऱ्या बाजूला हलू लागले. जणू तिच्या शरीरात कुणीतरी दुसरेच हालचाल करत आहे असा भास होत होता.


वयस्कर अब्बूंचे धैर्य आता संपत आले होते. आपल्या मुलीच्या अंगातील हे विचित्र बदल पाहून ते व्याकुळ झाले. त्यांचे हात थरथरू लागले. त्यांनी हळूच आपला हात फिरोझच्या हातावर ठेवला. अब्बूंच्या त्या अचानक स्पर्शाने फिरोझ दचकला. त्याने वळून त्यांच्याकडे पाहिले. अब्बूंचे डोळे विस्फारलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्य यांचे विचित्र मिश्रण दिसत होते. आणि मग त्यांच्या तोंडून थरथरत्या आवाजात शब्द बाहेर पडले...


"फिरोझ… देख… देख… हाजरी आ रही है…"


त्याच क्षणी....  झीनतचे बंद डोळे अचानक जोराने उघडले… आणि तिच्या ओठांवर एक अनोळखी, भयावह हास्य उमटले…


(* हाजरी आ रही है : प्रेताचे प्रकटीकरण: याचा अर्थ असा की जी आत्मा शरीरात दडून बसली होती, ती आता समोर आली आहे आणि माध्यमाच्या (व्यक्तीच्या) द्वारे आपले म्हणणे मांडायला तयार आहे. याला बोलीभाषेत 'अंगात संचारणे' असेही म्हणतात.)