Login

विषारी स्पर्श : भाग १०.

.
इम्रानचे नाव ऐकून फिरोझ चपापला होता.. झीनत पुढे काय सांगते ते ऐकण्यासाठी तो सावरून बसला... पण त्याच्या मनात भयंकर अस्वस्थता पसरली.. त्याचा चेहेरा बदलला...  

फिरोझच्या चेहेऱ्यावरील भाव पाहून झीनतच्या अंगावर पुन्हा काटा आला.

"इम्रान?? तो कसा काय येऊ शकेल?? तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल?... बरं पुढे सांग काय बोलला इम्रान?" ... फिरोझ प्रचंड ताणात बोलला. 


"तो काही बोलला नाही… पण त्याची नजर… ती खूप विचित्र होती. जणू ती नजर मला खेचत होती…"
तिने डोळे घट्ट मिटले.


"मला स्वतःलाच समजत नव्हतं… पण मी त्याच्या मागे मागे चालत गेले. जणू माझ्या पायांवर माझंच नियंत्रण नव्हतं."


फिरोझ आता पूर्ण लक्ष देऊन ऐकत होता. त्याच्या चेहेऱ्यावरील रंग उतरला होता. 


"तो स्टेशनकडे गेला… मीही त्याच्या मागे गेले…"
झीनतचा आवाज आता पुन्हा थरथरू लागला.


"प्लॅटफॉर्मवर पोहोचल्यावर… सगळं खूप विचित्र वाटायला लागलं. गर्दी होती… आवाज होता… पण तरीही मला सगळं धूसर दिसत होतं."

ती घाबरलेल्या स्वरात म्हणाली... 


"आणि मग… अचानक… जणू कोणीतरी माझ्या डोक्यावर हात ठेवला… एक विचित्र भारावलेपण…"


"कसला भारावलेपण?" फिरोझने विचारले.


"जणू… जादूच… कोणीतरी मला आपल्या ताब्यात घेतलंय असा भास होत होता. त्या क्षणी माझं भानच हरपलं होतं."


झीनतचे हात आता थरथरत होते.


"त्या क्षणाची कमजोरी… आणि त्यानंतर…"


ती अचानक गप्प झाली. खोलीत काही क्षण भयानक शांतता पसरली.


फिरोझने काळजीने विचारले, पण त्याचा आवाज मोठा झाला होता. 

"आणि त्यानंतर…?"


त्याच्या आवाजाने झीनत घाबरली... तिने डोळे उघडले. तिच्या नजरेत आता स्पष्ट भीती होती.


"त्याच्यानंतर जे घडलं… ते इतकं भयानक होतं की… मला अजूनही विश्वास बसत नाही…"


ती हळूहळू सगळा प्रसंग सांगू लागली... रेल्वेच्या पटरी वरून पुढे त्या अंधाऱ्या आडोशाला घडलेला तो भयानक काटेरी अनुभव… अंधार, थंडगार वारा… आणि अचानक आपल्या बरोबर झालेले अमंगळ कृत्य…


ती सांगत होती… आणि सांगताना तिच्या अंगाला अक्षरशः घाम फुटला होता. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. 


"मी कशीबशी तेथून बाहेर पडले… पण घरी येईपर्यंत मला सतत असं वाटत होतं की… कुणीतरी माझ्या मागे आहे…"


तिने भीतीने आजूबाजूला पाहिले.


"आणि काल रात्री… ते… माझ्या खोलीत आलं…"


हे ऐकताच फिरोझच्या चेहऱ्यावरची गंभीरता आणखी वाढली. झीनतचे डोळे पाण्याने भरले.


"फिरोझ… मला वाटतं ते अजूनही माझ्या मागे लागलंय…" ती पुटपुटली.
"ते मला सोडणार नाही…"


फिरोझ काही क्षण शांत राहिला. त्याने झीनतकडे पाहिले... तिच्या चेहऱ्यावरची भीती खरी होती. फिरोज मात्र निश्चल बसून ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर राग… संताप… आणि काळजी या तिन्ही भावना एकत्र दिसत होत्या. झीनतच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू आले. तिच्या मनात भीतीने एक विचार उठला...


“हे सगळं ऐकून फिरोज आपल्याला सोडून जाईल…”


त्या विचाराने ती एकदम घाबरली. तिने पटकन फिरोजचा हात घट्ट पकडला.


"फिरोज… मी खूप वाईट आहे ना?"
तिचा आवाज थरथरत होता.


"मनात तुझं प्रेम असताना… मी दुसऱ्या माणसा सोबत गेले…"
ती थांबली.


डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. 


"पण खरंच सांगते… माझं मन तयार नव्हतं… पण हे शरीर… या शरीराचे उत्सव मला वारंवार मला भूल घालत होते.. आणि शेवटी इम्रानच्या डोळ्यांनी मला त्याच्या चकव्यात ओढून घेतले…"


तिने दोन्ही हातांनी चेहरा झाकला.


"फिरोझ मला माफ कर.. मी रस्ता भरकटले... पण मला तू हवा आहेस.. प्लिज मला सोडून जाऊ नकोस …"
ती रडत म्हणाली... फिरोझ एकदम गोठला होता... त्याने आपल्या हातच्या मुठी आवळून घेतल्या होत्या. 


"फिरोज… तू बोलत का नाहीस? तू तू मला सोडून जाणार नाहीस ना?"
तिने त्याचा हात अजून घट्ट पकडला.


"प्लीज… असं करू नकोस… माझे खरंच तुझ्यावर प्रेम आहे."
तिचा आवाज तुटत होता.


"पण हे माझे मन...  मला सतत छळतंय… कधी कधी वाटतं… हे जीवनच नकोसं झालंय…"
ती निराशपणे म्हणाली... 


"कधी कधी वाटतं… या सगळ्याचा शेवट करावा… पण मग माझ्या परिवाराचा विचार येतो…"


तिने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले.


"आता तूच सांग… मी काय करू?"
ती थरथरत म्हणाली... 


"पण… प्लीज… तू मला सोडून जाऊ नकोस…
किमान या क्षणी तरी…"
झीनत रडत होती.


फिरोज मात्र निश्चल बसून सगळं ऐकत होता. त्याला स्वतःलाच समजत नव्हतं की कसं प्रतिक्रिया द्यावी. तो काही बोलणार इतक्यात...  खोलीच्या दरवाज्या जवळ आवाज झाला. फिरोझने पटकन दार उघडले... दारात अब्बू आले होते.. त्यांनी झीनतकडे एक नजर टाकली. मग फिरोजकडे पाहत गंभीर आवाजात म्हणाले...


"सगळे तयार राहा… चष्मेवाले बाबा येत आहेत."


त्या शब्दांनी घरात एक गूढ शांतता पसरली... आणि झीनतच्या अंगावर पुन्हा एकदा थंड शहारा उठला…


चष्मेवाले बाबा येत आहेत हे ऐकताच झीनतने आपल्या भावनांना तात्पुरते हृदयाच्या तळाशी दाबून टाकले. तिने घाईघाईने डोळ्यांतील अश्रू पुसले आणि चेहरा शक्य तितका सावरून बसण्याचा प्रयत्न केला. फिरोझ मात्र आज्ञाधारक मुला सारखा उठून उभा राहिला आणि अब्बूंच्या मागोमाग बाहेर निघून गेला.


झीनतच्या मनात मात्र प्रचंड घालमेल सुरू झाली होती. तिने बरेच ऐकले होते... हे बाबा शरीरात शिरलेल्या आत्म्याला बोलते करतात… त्याला बाहेर काढतात… आणि त्याच्याकडून सत्यही उघड करून घेतात. हा विचार मनात येताच तिच्या छातीत धडधड वाढली.

"आपल्या बरोबर असं काही झालं तर…? मग काय होईल?"

"आपण तिकडे का गेलो होतो… ते जर सगळ्यां समोर उघड झालं तर? आपण आपल्या देहाची भूक भागवण्यासाठी गेलो होतो हे जर अम्मी अब्बूंना कळलं तर…? छोटी बहीण काय विचार करेल?" 

या विचारांनी तिच्या अंगावर शहारा आला.

"नाही… नाही… मी काहीच सांगणार नाही…मी म्हणेन... मला काहीच आठवत नाही… सगळं आपोआप झालं… कुणीतरी मला घेऊन गेलं…

मी खोटं बोलेन… पण अब्बूंना यातलं काहीच कळता कामा नये…"

या विचारांच्या गोंधळाने झीनत अक्षरशः थरथर कापू लागली होती. इतक्यात दरवाज्यात हालचाल झाली.