फिरोजने पुन्हा एकदा मागे वळून पाहिले. पण झीनतने आपली मान वर केली नाही. तिच्या मनात त्या क्षणी आशा आणि निराशेचा लपंडाव सुरू झाला होता. आपल्या एका फोनवर फिरोज सगळे काम सोडून लगेच घरी आला होता. त्या विचाराने तिच्या मनात आशेची एक कोवळी कळी उमलली होती. काल रात्री जे काही घडले होते ते सर्व त्याला खरं खरं सांगून मन हलकं करायचं होतं. त्याने आपल्याला दोष दिला असता… आपल्यावर रागावला असता… तरी ते तिला मान्य होतं.
पण त्याच वेळी मनाच्या एखाद्या अदृश्य कोपऱ्यात एक क्रूर भीती जन्म घेत होती.
“जर फिरोजने आपल्याला सोडून दिलं तर…?”
हा विचार मनात येताच तिचा जीव कासावीस होऊ लागला. ती व्याकुळ नजरेने अब्बूच्या खोलीकडे पाहत बसली होती. फिरोज आत गेला होता… पण अजून बाहेर येत नव्हता. प्रत्येक क्षण तिच्यासाठी जणू युगा सारखा वाटत होता. काही वेळाने अब्बूच्या खोलीचे दार उघडले. फिरोज बाहेर आला. तो सरळ येऊन झीनतच्या बाजूला बसला. झीनतने सावधपणे त्याच्या डोळ्यात पाहिले. तिला तिथे एकच गोष्ट शोधायची होती.
विश्वास.
असा विश्वास… जो तिच्या मनातील सगळ्या भावनांना समजून घेईल. काही क्षण दोघेही शांत बसले. घरात सुद्धा कुणीच बोलत नव्हते. इतक्या दिवसांनी फिरोजला इतक्या जवळ पाहून झीनतच्या मनात एकच तीव्र इच्छा निर्माण झाली... त्याच्या गळ्यात पडून रडावं… आपण केलेल्या चुकीची शिक्षा त्याच्याकडे मागावी… त्याने रागाने आपल्या गालावर दोन थपडा माराव्यात… पण नंतर मात्र आपल्या भावना समजून घ्याव्यात… आणि आपल्याला आधार द्यावा… झीनत आपल्या विचारात हरवून गेली...
"झीनत… ए झीनत…! काय विचार करतेयस? तुला काहीतरी सांगायचं होतं ना मला?" ... फिरोजने हलकेच तिच्या खांद्याला स्पर्श करत विचारले.
त्याच्या स्पर्शाने झीनत एकदम दचकली. ती घाबरून मागे सरकली. तिच्या तोंडून अस्फुट किंकाळी निघाली... क्षणभर तिच्या डोळ्यांत प्रचंड भीती दाटून आली. समोर बसलेला फिरोज तिला क्षणभर अनोळखी भासला. तिची नजर भिरभिरू लागली. फिरोजच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. तो उठून उभा राहिला... त्याने सावकाश तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले.
"झीनत… शांत हो… मी आहे इथे."
त्याचा आवाज अतिशय मृदू आणि आश्वासक होता. तिच्या डोळ्यात फिरोझची ओळख दिसू लागली... झीनतचे डोळे पाणावले. क्षणात ती त्याच्या जवळ सरकली. फिरोजने तिला हलकेच आपल्या कुशीत घेतले. त्याचा आश्वासक स्पर्श मिळताच झीनतच्या भावनांचा बांध फुटला. ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून मोठ्याने रडू लागली.
रात्री घडलेल्या भयानक प्रसंगा पासून ते आताच्या क्षणापर्यंत ती एका असुरक्षित भीतीत जगत होती. फिरोजच्या स्पर्शाने मात्र तिला प्रथमच सुरक्षित वाटू लागले. फिरोज तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. झीनतच्या रडण्याचा आवाज ऐकून अम्मी आणि शमा बाहेर आल्या. फिरोजने त्यांच्याकडे पाहून हलक्या हाताने इशारा केला.
"कृपया तुम्ही दोघी आत जा… थोडा वेळ आम्हाला एकटे राहू द्या."
त्या दोघींनी शांतपणे मान हलवली आणि आत निघून गेल्या.
बराच वेळ झीनत रडत होती. हळूहळू तिचे रडणे ओसरले. ती फिरोज पासून थोडी बाजूला झाली. तरीही तिचे डोळे अजून ओले होते. फिरोजने घसा खाकरला. त्याने पुन्हा तिचा हात हातात घेतला.
"झीनत… अब्बूने काय सांगितलं याचा तू जास्त विचार करू नकोस. घरच्यांना तुझी खूप काळजी आहे… हे आपण सगळे जाणतो."
तो थोडा थांबला. मग पुढे म्हणाला...
"पण तुझ्या मनात जे काही आहे… ते तू मला सांग. असे काय घडले आहे. तू काळजी करू नकोस कोणी आता येथे येणार नाहीये. मी सगळ्यांना सांगितलं आहे… जोपर्यंत मी बोलावत नाही तोपर्यंत कुणी बाहेर येणार नाही."
त्याने दरवाजा लावून घेतला... पुन्हा तिच्या बाजूला येऊन बसत तिच्या डोळ्यांत पाहत विचारले...
"झीनत… मी तुझ्या बरोबर आहे," फिरोझने शांत पण ठाम आवाजात सांगितले.
"म्हणून आता तू कसलीच भीती बाळगू नकोस. जे घडलं… ते सगळं मला सांग."
फिरोझच्या त्या शब्दांनी झीनतच्या मनात जणू एखाद्या अंधाऱ्या खोलीत दिवा लागावा तसा उजेड पसरला. इतक्या वेळ तिच्या छातीत साठून राहिलेला भीतीचा आणि अपराधीपणाचा भार अचानक हलका व्हावा असे तिला वाटू लागले. ती काही क्षण शांत बसून राहिली. ओठ हलत होते, पण शब्द बाहेर येत नव्हते. फिरोझने हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला.
"आराम से बोल… घाई नाही. मी ऐकतोय."
झीनतने खोल श्वास घेतला. तिच्या डोळ्यांत पुन्हा पाणी दाटून आले. आवाज थरथरत होता.
"फिरोझ… माझ्याकडून खूप मोठी चूक झाली…"
"चूक वूक काही नाही. आधी काय झालं ते सविस्तर सांग," फिरोझने शांतपणे तिला धीर दिला.
झीनतने मान खाली घातली आणि हळूहळू बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला शब्द जणू तिच्या घशात अडकून बसले होते. घटना सांगताना तिचा आवाज अडखळत होता. पण थोड्या वेळाने ती स्वतःला सावरू लागली.
"त्या दिवशी… आपल्यामध्ये जो अबोला झाला होता ना… त्यानंतर मला खूप एकटं वाटायला लागलं. घरात सगळे असतात… पण तरीही मन कुठेतरी रिकामं झाल्या सारखं…"
ती थांबली. हात एकमेकांत घट्ट गुंतले होते.
"मग… कुणीतरी सांगितलं की… तू अजून कुणाबरोबर फिरतोयस…"
हे बोलताना तिचा आवाज अगदी मंद झाला. फिरोझने काही क्षण काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तो फक्त शांतपणे तिच्याकडे पाहत होता.
"त्या विचाराने माझं डोकंच फिरलं. राग… दुःख… निराशा… सगळं एकदम मनात दाटून आलं. म्हणून मी घराबाहेर पडले. काही कळत नव्हतं… कुठे चाललेय तेही…"
ती पुढे म्हणाली...
"मी कट्ट्यावर जाऊन बसले. तिथे… मला इम्रान दिसला."
हे नाव उच्चारताच फिरोझचे डोळे मोठे झाले...
क्रमशः
©किशोर तरवडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा