अब्बूंचे ते अनपेक्षित शब्द ऐकून फिरोझचे हृदय अचानक जोराने धडधडू लागले. त्याच्या छातीत एक विचित्र दडपण निर्माण झाले. मनातल्या मनात एक आवाज उठत होता...
“नको… अजिबात नको… त्यांना आत्ताच सांगून टाक... हे शक्य नाही.”
पण तो आवाज जरी मनात घुमत होता, तरी त्या क्षणी अब्बूंच्या डोळ्यांत दिसणारी असहाय्यता त्याला शांत बसू देत नव्हती. तो काही क्षण गप्प उभा राहिला. मग हळूच पुढे येऊन अब्बूंच्या समोर बसला. त्याने स्वतःला सावरले. त्याच्या चेहऱ्यावर गंभीरता होती. त्याने ठरवले होते... अब्बू काय सांगणार आहेत ते पूर्ण ऐकायचे. तो शांतपणे म्हणाला...
“बोला अब्बू… काय मागणे आहे आपले?”
अब्बूंनी काही क्षण त्याच्याकडे पाहिले. जणू ते योग्य शब्द शोधत होते. मग त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूहळू बोलायला सुरुवात केली...
“बेटा…
आज जे काही घडलं… त्यानंतर माझ्या मनात अनेक भीती निर्माण झाल्या आहेत.”
त्यांच्या आवाजात थकवा होता.
“झीनतचे पितळ आता उघडे पडले आहे.”
फिरोझचे भुवया किंचित उंचावल्या.
अब्बू पुढे म्हणाले...
“आज नाही तर उद्या… समाजात ही गोष्ट पसरलीच जाणार. आणि आपल्या समाजात अशा गोष्टींना कधीही मान्यता नसते.”
त्यांचा आवाज आता अधिक जड झाला होता.
“झीनत नापाक आहे… ही गोष्ट बाहेर गेली, तर तिचा अपमान होईलच… पण तिच्या सोबत तिच्या भावंडांनाही लोकांच्या नजरा सहन कराव्या लागतील.”
ते डोळे मिटून काही क्षण शांत राहिले.
मग पुन्हा बोलू लागले...
“माझ्या समोर माझी आणखीन एक जवान मुलगी आहे… शमा.”
फिरोझचा श्वास जरा जड झाला. अब्बूंच्या आवाजात आता बापाची असहायता स्पष्ट होती.
“उद्या तिचे लग्न कसे होणार… कोण तिच्याशी निकाह करेल… समाज काय बोलेल…”
ते थरथरत्या आवाजात म्हणाले...
“ही चिंता आता मला झोपही लागू देत नाही, बेटा.”
त्यांनी पुन्हा फिरोझकडे पाहिले. त्या नजरेत विनंती होती… अपेक्षा होती. आणि थोडीशी भीतीही.
“फिरोझ…”
त्यांनी त्याचा हात आपल्या हातात घेतला.
“तू या घरासाठी खूप काही केले आहेस. आजही संकटाच्या वेळी तूच आमच्या सोबत उभा होतास.”
त्यांचा आवाज आता मृदू झाला.
“तू चांगला मुलगा आहेस… सच्चा आहेस… आणि आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे.”
ते थोडा क्षण थांबले.
मग जणू मनाचा सगळा धीर एकवटून त्यांनी ते शब्द उच्चारले...
“बेटा…
मला आणि अम्मीला असं वाटतं… की तू… शमाशी निकाह करावा.”
हे शब्द ऐकताच फिरोझच्या छातीवर जणू मोठा आघात झाला. त्याचा चेहरा क्षणभर निर्विकार झाला.
अब्बू पुढे बोलत होते...
“शमा चांगली मुलगी आहे. घर सांभाळणारी आहे. आणि तूही या घराला ओळखतोस… आम्हालाही ओळखतोस.”
त्यांच्या आवाजात आता विनंती स्पष्ट होती.
“जर तू तिच्याशी निकाह केला… तर या घराची इज्जत वाचेल. समाजालाही काही बोलायला जागा राहणार नाही.”
त्यांच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू तरळले.
“बेटा…
तू इतकं मोठं उपकार माझ्यावर केलंस… तर मी आयुष्यभर ऋणी राहीन.”
त्यांनी थरथरत्या आवाजात पुढे जोडले...
“मग मला खात्री वाटेल… की माझ्या मुलीचं भविष्य सुरक्षित आहे.”
ते शांतपणे म्हणाले...
“आणि मग… मीही शांतीने डोळे मिटू शकेन.”
खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. फिरोझ काहीच बोलत नव्हता. त्याच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. एका बाजूला अब्बूंची असहाय विनंती… आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या स्वतःच्या हृदयात दडलेलं एक गुपित. तो काही क्षण अब्बूकडे पाहत राहिला. त्याच्या छातीतली धडधड आता स्पष्ट ऐकू येत होती.
आता तो काय उत्तर देणार…? हीच गोष्ट त्या क्षणी सर्वात मोठा प्रश्न बनली होती. अब्बूंचे बोलणे ऐकून फिरोझ आतून बाहेरून हादरून गेला होता. त्याच्या कपाळावर घामाच्या धारा फुटल्या होत्या. छातीतली धडधड अजूनही शांत होत नव्हती. परंतु त्या क्षणी अजूनही अनेक महत्त्वाची कामे बाकी होती. बाहेर चष्मेवाले बाबा त्याची वाट पाहत होते…
अम्मीजानला बोलावून आणायचे होते… आणि घरात अजूनही भीतीचे सावट पसरलेले होते. फिरोझने स्वतःला कसाबसा सावरले. तो अब्बूकडे शांत नजरेने पाहत म्हणाला...
“अब्बू… बाहेर बाबा माझी वाट बघत आहेत. अम्मीजान तिकडे काळजी करत बसलेल्या असतील, त्यांना बोलावून आणायचे आहे. आणि बाहेर… माझी झीनत अजूनही गाढ झोपेत पडली आहे. ती जागी झाल्यावर तिची अवस्था काय होईल, हेही सांगता येत नाही. तिलाही सांभाळावे लागेल.”
तो थोडा थांबला. त्याचा आवाज आता अत्यंत संयमी झाला होता.
“अब्बू… तुम्ही इतकं मनावर घेऊ नका. असे निर्णय तडकाफडकी, भावनेच्या भरात घ्यायचे नसतात.”
त्याने आदराने मान झुकवली.
“मी तुमच्यापेक्षा लहान आहे… पण तुमची इज्जत करतो. म्हणूनच एक विनंती करतो, तुम्ही स्वतःला आधी सांभाळा.”
तो हळूच पुढे म्हणाला...
“आणि राहिली शमाच्या निकाहची गोष्ट… तर तिच्यासाठी योग्य स्थळ शोधण्यास मीही आहेच की.”
त्याने हलकेच स्मित केले.
“तेव्हा तुम्ही आता शांत झोपा. बाहेरचे सगळे मी पाहतो.”
फिरोझने अत्यंत परिपक्वतेने त्याच्यावर आलेला तो कठीण प्रसंग हाताळला. तो पटकन उठला आणि खोलीच्या बाहेर आला. खोलीबाहेर येताच त्याला जणू एखाद्या जड ओझ्यातून सुटल्या सारखे वाटले. त्याने डोळे बंद केले… काही क्षण खोल श्वास घेतले… आणि मग स्वतःला सावरत तो बाबांकडे गेला.
“बाबा… मला यायला थोडा उशीर झाला. माफ करा. पण मी अब्बूंना व्यवस्थित झोपवून आलो आहे.”
तो आदराने म्हणाला...
“आता सांगा… मला कोणती कामं करायची आहेत?”
हे बोलत असतानाच त्याची नजर सोफ्याकडे गेली... आणि तो क्षणभर थबकला. झीनत सोफ्यावर उठून बसलेली होती. ती गंभीर चेहऱ्याने त्याच्याकडेच पाहत होती. झीनत शुद्धीवर आली आहे हे पाहून फिरोझच्या मनात क्षणभर आनंदाची लहर उठली. परंतु तेवढ्यात बाबांनी बोलायला सुरुवात केली.
“फिरोझ… बेटा, तुमच्यासारखा मुलगा जर प्रत्येक घरात असेल, तर कितीतरी परिवार सुखी होतील.”
बाबांच्या आवाजात आपुलकी होती.
“बरं… ते राहू दे. आता एक काम बाकी आहे.”
ते गंभीर झाले.
“आज चंद्रोदय झाल्यावर आपण ज्या गोष्टीचे वचन दिले आहे… तो उतारा त्याच्या एरियात नेऊन ठेवायचा आहे.”
फिरोझ शांतपणे ऐकत होता.
बाबा पुढे म्हणाले...
“सुलेमानजी तर आता येऊ शकणार नाहीत. त्यामुळे बेटा… ही जबाबदारी आता तुझ्यावर आली आहे.”
“चंद्रोदय होण्यापूर्वी तू अंघोळ करून माझ्याकडे ये. मी सगळी तयारी करून ठेवतो. तुझ्या सोबत माझ्या एका शिष्याला पाठवीन.”
ते पुढे म्हणाले...
“आणखी एक… मला माझ्या ठिकाणी जाऊन झीनतसाठी आणि तुझ्यासाठी तावीज तयार करायचे आहेत.”
मग त्यांनी गंभीर आवाजात सांगितले...
“तोपर्यंत तू नूर भाभींना आणि घरातील सगळ्यांना बोलावून घे… आणि झीनतला काही दिवस घराबाहेर जाऊ देऊ नका.”
बाबांनी निरोप घेत म्हणाले...
“आम्ही निघतो… खुदा हाफिझ.”
त्यांच्या शिष्यांनी पटकन सगळे सामान पिशव्यांमध्ये भरले. तीघेही बाहेर जाण्यासाठी निघाले. फिरोझने नजरेनेच झीनतला इशारा केला. ती हळूच उठली. दोघांनी मिळून बाबांना आदराने अभिवादन केले. बाबा गाडीत बसले. गाडी वळण घेईपर्यंत फिरोझ दारातच उभा राहून पाहत राहिला. गाडी नजरेआड होताच त्याने दार बंद केले.
तो घरात वळला. आणि त्याची नजर पुन्हा झीनतवर पडली. झीनत अजूनही त्याच्याकडेच पाहत होती. तिच्या डोळ्यांत अपराधी भाव काठोकाठ भरलेले होते. ती नजर पाहताच फिरोझच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. मनात द्वंद्व सुरू झाले. आणि हळूहळू राग उफाळून वर येऊ लागला. त्याच्या मनात विचारांचे वादळ उठले.
“झीनतने आपल्या प्रेमाला हलके समजले…तिने आपल्याला धोका दिला… मी तिला माफ करू शकत नाही…”
त्याच्या मुठी आवळल्या गेल्या.
“आता सगळं संपवायचं. तिला आपल्या प्रेमाच्या बंधनातून मुक्त करायचं. ती जशी जगू इच्छिते तशी जगू दे.”
त्याचा निर्णय पक्का झाला.
“अब्बू आणि अम्मीसाठी… फक्त एक मित्र म्हणून संबंध ठेवायचे.”
फिरोझने झीनतकडे एक कठोर कटाक्ष टाकला. मग त्याने खिशातून आपला फोन काढला. त्याला अम्मीजानला फोन करून बोलवायचे होते. तो नंबर डायल करणार इतक्यात... झीनत हळूच पुढे आली. तिने त्याचा हात पकडला. त्या स्पर्शाने फिरोझचा राग अजून भडकला. त्याने जळजळत्या नजरेने तिच्याकडे पाहिले. दोघांच्या नजरा एकमेकांवर खिळल्या. फिरोझच्या नजरेत संतापाचे अंगार पेटले होते…
आणि झीनतच्या नजरेत अपराधीपणाची व्याकुळता… आणखी खूप काही. काही क्षण दोघेही एकमेकांकडे न बोलता पाहत राहिले. शेवटी फिरोझने नजर वळवली. त्याला तिची अवस्था पाहवत नव्हती. पण मनात साचलेला राग आता उसळू लागला होता. आणि अखेर...
त्याचा उद्रेक झाला…
क्रमशः
©किशोर तरवडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा