Login

एकतर्फी प्रेम...

क्षणभराचा मोह



एकतर्फी प्रेम, जीव घेऊ हि शकत आणि जीव देऊ हि शकत. किती विचित्र असत ना हे प्रेम..दोन्ही कडून असेल तर अमाप असत... पण एकतर्फी असेल तर.... काय काय घडू शकत... कल्पना न केलेली बरी. तो होणारा त्रास त्या व्यक्तीची आठवण.. अगदी जीवन नको वाटत... अश्या वेळेस कुणी सावरणारा भेटला तर ठीक.. नाहीतर जीवन नरक बनून जातं.....मग नको ती पाऊले उचलली जातात.

"आई, मी क्लासला जाते…”

मोहिनीने ओढणी नीट करत आपल्या आईला आवाज दिला.

“हो, लवकर ये गं… आणि उन्हात जास्त फिरू नकोस…” आईने काळजीने सांगितलं.तिला होकार देऊन ती बाहेर पडली.

तिची बारावीची परीक्षा संपली होती. निकाल येईपर्यंत वेळ वाया जाऊ नये म्हणून मोहिनीने कॉम्प्युटर क्लास लावला होता. सकाळी १० ते ११ क्लास… आणि मग घर.. घरी येऊन आईला कामात मदत करायची... हा तिचा रोजचा नियम झालेला जणू.....
साधं सरळ आयुष्य होत तिचं..ती दिसायला नावाप्रमाणेच सगळ्यांना मोहून घेणारी.. घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे राहणीमान साधे. पण त्यातही ती उठून दिसायची. त्यामुळे कुणाला हि सहज आवडून जायची.साधे कपडे असायचे पण तिचं हसणं अगदी मन जिंकणारं होत...

क्लासमधून परतताना… कुणीतरी तिला रोज बघत असे, तिच्याही नकळत...

तो होता कार्तिक देशमुख.. तसा तर तो हि दिसायला चांगला होता.त्याच्याकडे पाहून त्याच्या घरची श्रीमंती अगदी उठून दिसायची.. सगळं आयत मिळालं म्हणून बडे बाप कि बिघडी औलाद, हेच तो सिद्ध करत होता.

“भाई, ती रोज ह्याच वेळी येते…” त्याचा मित्र हसत म्हणाला.

कार्तिक तिच्याकडे बघतच राहिला…

“यार… काय दिसते ना…मला खूपच आवडते ती ”

तो त्याच्या मित्राला म्हणाला,

" अरे, मग भावा विचार कसला करतोस? विचारून टाक तिला.. "


. श्रीमंती, स्टाइल, आणि बरोबर टपोरी मित्रांची टोळी. दिसायला स्मार्ट, पण वागणं बेजबाबदार होत त्याच..म्हणूनच त्याच्या त्या टपोरी मित्रांच्या सांगण्यावरून त्याने तिला प्रपोज करायच ठरवलं. एका दिवशी भर उन्हात मोहिनी रस्त्यावरून चालत होती. अचानक तिच्या समोर कार्तिक उभा राहिला.

“ए… ऐक ना…” तो म्हणाला.

कोणत्याही मुलाशी न बोलणारी मोहिनी घाबरली.

“काय आहे…?”

“मला तू खूप आवडतेस… आय लव्ह यू…”

क्षणभर तिचं डोकंच फिरलं. ध्यानी मनी नसताना हे अचानक घडलं.... मोहिनी अगदी घाबरून गेली.

तिला तनुचं बोलणं आठवलं,त्या मुलांनी एका मुलीला किती न कसा त्रास दिला. कंटाळून तिने आत्महत्या केली. ती म्हणाली होती,

“अशा मुलांपासून लांब राहा… ते वेडे असतात…”

ते आठवून तिच्या अंगावर काटा आला.

ती थोडी मागे सरकली…
“नाही… मला नाही आवडत हे...'

ते ऐकून कार्तिक थबकला.

“काय…? पुन्हा सांग…”

भीतीने तिचं हृदय जोरात धडधडत होतं. पण तरीही तिने धीर करून नकार द्यायचं ठरवलं.

“मी नाही म्हणतेय… मला interest नाही…”

ती तिथून पटकन निघून गेली.


कार्तिक मित्रांसमोर बढाया मारत बसला होता

“ती मला नकार देणारच नाही…”

पण…

मोहिनीने स्पष्ट “नाही” म्हटलं.
मनाचा हिय्या करुन तिने नकार दिला
क्षणभर कार्तिकला काहीच समजलं नाही. ती तिथून निघून गेली… तो फक्त बघत बसला. ती निघून गेली त्या दिशेने...... आता तो एकदम देवदास झाला होता. आणि त्याच्या अहंकाराला मोठा धक्का बसला.

तो लगेच मित्रांसोबत दारूच्या अड्ड्यावर गेला. मित्रांनी त्याला समजावलं नाही, उलट अजून भडकवलं,
कारण त्याचे मित्र फक्त खाण्या पिण्यापूर्ती होते. त्यांना काही पडलं नव्हतं ह्याच. कार्तिकही दारूच्या नशेत होता. काही समजत नव्हतं त्याला. फक्त झालेला अपमान समोर येत होता त्याच्या.

“तुला नकार दिला तिने ? मग दाखव तिला मर्दानगी …”

नशेत, रागात, आणि दुखावलेल्या अहंकारात कार्तिक अंध झाला होता…तो रागात असताना त्याच्या एका मित्राने त्याला ऍसिड आणून दिलं…

आणि कार्तिक विचार न करता मोहिनीच्या मागे गेला…

ती त्याला पाहून आधीच घाबरली होती…

क्षणाचाही विचार न करता त्याने पूर्ण ऍसिड तिच्या चेहऱ्यावर फेकलं…

क्षणात तिचं आयुष्य बदललं…

ती वेदनेने तडफडत होती… लोकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं… पण खूप उशीर झाला होता…

मोहिनी… निष्पाप असूनही तिचा जीव गेला…

कार्तिकला पोलिसांनी अटक केली. त्याला शिक्षा झाली…

पण…
काय उपयोग?

एकाचा प्रेमाच्या नावाखाली जीव घेतला गेला …
आणि दुसऱ्याने खोट्या अहंकारासाठी स्वतःचं आयुष्य बरबाद केल
.


प्रेम म्हणजे मालकी नाही…
प्रेम म्हणजे समजून घेणं, आदर देणं…

आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्याच्या “नाही” ला स्वीकारणंही तेवढंच महत्वाचं आहे…

समाप्त
.

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →