एकतर्फी मदत पुरे
विषय - मुखवट्यामागची नाती
लघुकथा लेखन स्पर्धा एप्रिल 2026
विषय - मुखवट्यामागची नाती
लघुकथा लेखन स्पर्धा एप्रिल 2026
©️®️शिल्पा सुतार
आशा सुपर मार्केट मधे होती. ती लिस्ट बघत होती. किराणा घेवून झाला. तिने बिल केलं. ती बाहेर येवून उभी राहिली. बाजूच्या गाडीवरून थोडी भाजी ही घेतली. सहा वाजले नितीन अजून का आले नाहीत? तो ऑफिस हून निघाला होता. तिला घ्यायला येणार होता.
ते नेहमी अस करत होते. संध्याकाळी आशा बाजारात यायची. किराणा, भाजी घ्यायची. नितीन ऑफिस हून आला की तिला घेवून घरी यायचा. घरचे मोठे असल्याने त्यांच्यावर जबाबदारी होती. नितीन मोठ्या पोस्ट वर होता. पगार भरपूर होता. स्वभावाने ही चांगला होता. आशा ही समजूतदार होती तिने तिची जबाबदारी नीट सांभाळली होती.
तिने नितीनला फोन लावला
"आलो पाच मिनिट, तुझी भाजी घेवून झाली का?" त्याने विचारलं. उगीच परत उभं रहायला नको.
" हो मी सुपर मार्केट जवळ उभी आहे. " तिने सांगितलं.
थोड्या वेळाने नितीन आला. ते घरी निघाले. त्याने ऐटीएम जवळ गाडी थांबवली.
"काय हो आता काय? पटकन घरी चला ना. माझ सगळं काम पडलं आहे." आशाच्या कपाळावर आठ्या होत्या.
" थांब जरा, आईने पैसे आणायला सांगितले आहेत. " नितीन आत गेला. आशाला खूप राग येत होता. आमचे पैसे काय झाडाला उगवतात का? सासुबाई यांना डायरेक्ट पैसे आणायला सांगून देतात. हे ही ऐकतात. सारखं हे हव ते हव. त्या तर त्या... तुषार भाऊजी, लीना ताई ही खूप त्रास देतात. जावू दे पण यांना बोलणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी.
नितीन पाच मिनिटांत बाहेर आला.
" किती बॅलन्स आहे? तुम्ही सारखे अकाऊंट मधून पैसे का काढत असतात? जरा सेविंग हवं. " ती म्हणाली. तेच नितीनला आवडलं नाही. तो तिच्याकडे रागाने बघत होता.
" तू अस का विचारतेस आशा? तुला कसली कमी आहे का? सांग ना. नसत्या चौकश्या करत जावू नकोस." नितीन तुटक पणे म्हणाला.
" म्हणजे काय? माझा काही हक्क नाही का? मी तुमची पत्नी आहे. तुम्ही मला कधीच काहीच सांगत नाही. हे अस बर आहे का? मीनु मोठी होते आहे. तिची शाळा, ट्यूशनचा खर्च असेल. पुढे जावून लग्न करावं लागेल. थोडी बचत हवी. अस सगळं घरच्यांवर उडवलं तर कस होईल? मला ही मीनु साठी थोड सोनं घेवून ठेवायचं होतं. माझी वेळ आली की तुम्ही जमत नाही सांगतात. " आज आशाला खूप राग आला होता. यांना समजत कस नाही? बाहेर आहोत तर बोलून घेवू ती विचार करत होती.
" काय बोलतेस काही भान आहे का आशा? मीनु आताशी पाचवीत आहे. आता पासून काळजी करू नकोस. तिच्यासाठी मी खंबीर आहे. मी बघेल. आई बद्दल बोलतांना तोंड सांभाळून बोलत जा. नाहीतर तुला सरळ करायला मला पाच मिनिट ही लागणार नाही." नितीन चिडला.
"राहील. नेहमी प्रमाणे नका ऐकून घेवू. नाहीतरी मला त्या घरी महत्व आहे का? सगळं तुमचं आणि तुमच्या आई, बहीण, भावाचं आहे. त्यांना त्यांचा संसार आहे तरी त्यांना सगळं कमी पडत. हक्काचा भाऊ आहे मदतीला. तुमच्या अश्या स्वभावाने तुम्हाला तीन चार घर बघावे लागतात. ते स्वार्थी आहेत. जेव्हा ठेच लागेल तेव्हा समजेल. मी म्हणते ते खर आहे. जो पर्यंत तुम्ही पैसे देतात तो पर्यंत सगळी नाती आहेत. एकदा नकार देवून बघा कोणीही तुमच्या मदतीला येणार नाही. " आशा बडबड करत होती.
"माझे बहीण, भाऊ असे नाही. आई ही खूप सांभाळुन घेते. " नितीन म्हणाला.
" सासुबाई काय सांभाळून घेतात? सगळ तुमच्या कडून घेवून त्या दोघांना देतात. तुमचे डोळे कधी उघडणार आहेत समजत नाही. "
" खूप बोललीस आशा. पंधरा हजार काढले तर एवढ काय झालं? मी कमवतो मी काहीही करेन. " नितीन म्हणाला.
" बापरे पंधरा हजार? ते का लागत आहेत. तुम्ही विचारल का? त्या मागतात तुम्ही देतात. तुम्ही अस का करत आहात? "
त्यांच खूप भांडण झालं. पोटतिडकीने आशा सांगत होती. नेहमी प्रमाणे नितीनने ऐकलं नाही. ते घरी आले. नितीन आई जवळ बसला.
" घे आई दहा हजार रुपये. का लागता आहेत? " त्याने विचारलं.
" तुषारने तीन हजार मागितले. थोडे लीनाला लागत होते. थोडे मी ठेवते. " रेखा ताई म्हणाल्या.
" ठीक आहे."
आशा स्वयंपाक करत होती. त्याने तिच्याकडे पाच दिले. तिने ते कपाटात ठेवले. एवढ बोलल्याने निदान पाच हजार तरी वाचले.
तुषार येवून पैसे घेवुन गेला. लीना ही आली होती. ती पुढे बोलत बसली होती.
आशाची चिडचिड होत होती. पण कोणाला सांगणार? आपलंच नाणं खोट निघालं. तुषार भाऊजी मजा करतात. लग्नाला दोन वर्ष झाले. आरामात सेपरेट रहातात. इथून पैसे नेतात. हॉटेल मधे जेवतात. पिक्चर शॉपिंग सगळं करतात. आता मागच्या महिन्यात त्यांनी मोटरसायकल घेतली. त्यांच्या बायकोला कुठलीच जबाबदारी नाही. कारण तिचा नवरा तिच्या बाजूने आहे. माझा पिट्टा पडतो. माझा नवरा ही माझ ऐकत नाही. काय करू समजत नाही.
लीना ताई ही तसच करतात. घरच चांगलं आहे तरी सगळं इथून नेतात. पैसे ही नेहमी मागतात. माझ्या साड्या, दागिने वापरतात. त्या उगीच इतक्या जवळ रहातात.
तिचा स्वयंपाक झाला. तिने मीनुला वाढून दिलं. बाकीच्यांचे ताट केले. मीनुने आवाज दिला. नितीन, रेखा ताई जेवायला आले.
"आई भाजी तिखट नाही ना? लोणच देवू का?"
" भाजी छान झाली आहे. तू पोळी घे. आशा त्याला वाढ." रेखाताई म्हणाल्या.
एकमेकाना आग्रह सुरू होता.
आशा कोणाशी बोलली नाही. रागात तीच जेवण झालं. माझा तिळपापड होतो. यांना फरक पडत नाही. जेवण झालं. आवरून ती, मीनु झोपल्या होत्या. नितीन आत आला. तिच्याकडे बघत तो काॅटच्या दुसर्या बाजूला झोपला. आशा... त्याने आवाज दिला तिने लक्ष दिलं नाही.
"राग सोड आशा. तुला ही हव ते मागवून घेत जा."
तिने उत्तर दिले नाही. त्यांच्यात अबोला होता.
दोन तीन दिवस असे गेले. नितीन कंटाळला होता. आज नितीन लवकर घरी आला. "आई आशा कुठे आहे?"
" मीनुला ट्यूशनला घेवून गेली आहे."
नितीन तिकडे गेला. दोघ समोरच्या बागेत बसले होते.
"बोल आशा तू अजूनही नाराज आहेस का? काय प्रॉब्लेम आहे? अस का वागतेस." तो विचारत होता.
" मला या विषयावर काही बोलायच नाही. तुम्ही ऐकत नाही. उगीच चिडचिड करून मला मात्र त्रास होतो. काहीही करा मला सांगू नका. मी नाराज आहे तर असू देत तुम्हाला काय फरक पडतो." आशा म्हणाली.
" मनमोकळ बोल. मी तुझ ऐकतो. "
" नको तुम्ही चिडतात. मला तुमचा राग सहन होत नाही. " ती म्हणाली.
" मी काही म्हणणार नाही. मला तुझ्या शिवाय करमत नाही. पण मला हे समजत नाही की मी कोणाच काही करायच नाही का? ते ही आपल्या घरचे आहेत ना? अस का? " नितीन विचारत होता.
" करा ना पण थोडे डोळे उघडे ठेवा. घरचे गैरफायदा घेतात. आपल्याला वापरुन घेतात ते तुम्हाला समजत नाही का? तुषार भाऊजी त्यांचा पगार ही वापरतात. वरचेवर पैसे ही मागतात. कधीच घरी मदत करत नाही. त्यांच्या बायकोला कोणतीच जबाबदारी नाही. लीना ताई स्वार्थी आहेत. पैसे, सामान, तयार फराळ, भाज्या इथून नेतात. आई ही सगळं त्यांना देतात. तुमच्या पाठीवर तुमच्या बद्दल बोलतात. मला, मीनुला पाण्यात बघतात. म्हणजे आपण सगळ्यांच करायचं. बोलणे ही खायचे. मला ते सहन होत नाही. तुम्ही ही माझ ऐकत नाही त्याच जास्त वाईट वाटत. काहीही करा. नुकसान झाल्यावर मला सांगू नका. तुमच्या पुढे ही मी हात टेकवले. मला आपलं भविष्य काही खर वाटत नाही. जे सुरू आहे ते ठीक आहे म्हणून चालायचं. " आशा म्हणाली.
" तू चिडू नकोस आशा. "
" मग काय करू? "
" बर तू म्हणते ते करू."
" म्हणजे?"
" एक दोन दिवस दे. बघू माझ्या घरचे माझं ऐकतात की तू म्हणतेस तसे स्वार्थी आहेत. "
"माझं बरोबर असेल तर यापुढे सगळा व्यवहार मी बघेन." आशा म्हणाली. तिला नितीन तोंडघशी पडेल याची खात्री होती.
" चालेल मी बरोबर असेल तर तू मधे मधे बोलायच नाही आशा." नितीन म्हणाला.
"हो चालेल." तिला माहिती होत तीच जिंकणार. यांनी यांच्या घरच्यांना अजून ओळखलं नाही. त्यांचे सगळे रंग मी बघून चुकली आहे.
मीनु क्लास हून आली. ते घरी आले. तुषार आलेला होता. तो रेखाताईंशी काहीतरी बोलत होता.
"नितीन इकडे ये. याने घर बघितल आहे. डाऊन पेमेंट साठी मदत कर. "
" किती हवे? " नितीन त्यांच्यात बसत म्हणाला.
"वीस लाख."
" एवढे?"
"हो."
"तुला ही चांगला पगार आहे? तुझ किती सेविंग आहे त्यातून भर." नितीन म्हणाला.
" माझ काहीच सेविंग नाही दादा. तू मदत कर. " तुषार म्हणाला.
" मला दोन महिने झाले पगार झाला नाही. सगळा इन्कम टॅक्स कापला गेला. मीनुची फी भरायची आहे. मला तुला मदत करायला जमणार नाही. आधीचे पैसे परत कर तुषार ." नितीन म्हणाला.
" कोणते पैसे."
"दर महिन्यात नेतो ते."
" एवढा छोटा हिशोब बघतोस का दादा. आई तू तरी काही बोल."
" तो देईल पैसे. " रेखाताई म्हणाल्या.
" नाही आई माझ्याकडे नाही. तू मला पंचवीस हजार रुपये दे तुषार. "
तो नाही म्हणाला निघून गेला.
इतके वर्ष न बोलता नितीन मदत करत होता. पहिल्यांदा त्याने पैसे मागितले. तुषारने हात वरती केले.
लीना आली." आई काय भाजी केली आहे. मी थोडी नेते."
"माहिती नाही. आशा आत स्वयंपाक करते आहे. "
" नितीन दादा, मला दहा हजार रुपये लागत आहेत. उद्या परत करते."
ती परत देणार नाही सगळ्यांना माहिती होती.
"बर झाल तु आलीस लीना. मला पंचवीस हजार रुपये लागत होते." नितीन म्हणाला.
" का दादा? "
"मीनुची फी भरायला. माझा पगार झाला नाही. "
" माझ्या कडे नाही. मी यांच्याकडे कसे मागू? " लीना म्हणाली.
" जसे माझ्याकडे नेहमी मागतेस तसे माग मला दे. मी इतके दिवस तुला मदत करत होतो. बघ काही ऐडजेस्ट होतात का ते? "
ती ही निघून गेली.
" आई तू तरी दे." नितीन आईशी बोलत होता.
"मी कुठून आणू? "
" तुझ पेंशन येत ना? " त्याचे वडील मोठ्या पोस्ट वर होते ते वारल्यावर अर्ध पेंशन रेखा ताईंना मिळत होतं.
" हो. "
" मग दे पंचवीस हजार. "
" नाही ते पैसे मला ट्रीपला भरायचे. " रेखा ताई म्हणाल्या.
"ट्रीप महत्वाची की मीनुची ट्यूशन? तुझा बॅलन्स तर खूप आहे आई. "
" तुमच तुम्ही बघा." रेखाताई म्हणाल्या.
"मी अस केल असत तर? तू म्हणतेस तेव्हा मी पैसे आणून देतो. तू त्याच काय करतेस ते ही विचारत नाही आई. हे बर आहे का? " नितीन बोलत होता.
"मला काही सांगू नकोस. " रेखाताई म्हणाल्या.
"आई, आशाचे कपाटातले दागिने दे ते मोडतो. आशा इकडे ये. तुझ काय काय होत ते बघ. यापुढे तुझ्या कडे राहू दे. "
तिने मोठ मंगळसूत्र, झुमके, नेकलेस बांगड्या ताब्यात घेतले.
"अजून काही होत का? "
" हो पाटल्या, ठुशी."
"त्या कुठे आहेत?"
"लीना कडे. "
"फोन लाव. "
" लीना आशाच्या पटल्या ठुशी घेवून ये. " रेखाताई फोन वर बोलत होत्या.
" साड्या ही. " आशा मागून म्हणाली. खूप वर्ष झाले ती त्रास सहन करत होती आता चान्स आहे तर माझ्या वस्तू परत मिळवून घेते.
लगेच लीना आली. दागिने साड्या देवून गेली.
रात्री नितीन रूम मधे आला. आशा हसत होती. तो तिच्याकडे बघत होता.
" द्या तुमचा व्यवहार माझ्याकडे. मी जिंकली आहे."
त्याने त्याचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, तिजोरीच्या चाव्या तिच्याकडे दिल्या."यापुढे तू म्हणशील ते होईल. मला पॉकेट मनी देत जा फक्त. मला एकवेळ बाहेर चहा घ्यावा लागतो. " नितीन म्हणाला.
" अहो, आपला खरच पगार झाला नाही का? "
" हो. " तो म्हणाला.
ती उठली तिने पर्स मधून थोडे पैसे काढले. त्याला दिले.
" किती आहेत? " त्याने मोजले पंधरा हजार होते.
"हे घ्या. अजून लागले तर उद्या मी बघते कोणी देत का. नाहीतर माझा नेकलेस मोडा."
" असू दे आशा. शांत हो पगार झाला आहे. मी मुद्दाम सांगितल. आपण घर ही घेणार आहोत. इन्व्हेस्टमेंट ही वाढवून घेवू. फालतू खर्च नको."
तिला बर वाटत होत. घरच्यांचे खोटे मुखवटे उतरले ते बर झालं.
आज रविवार होता. रेखाताई फोन वर बोलत होत्या. "नितीन अरे लीना मार्केट मधे आहे तिला पाच हजार रुपये पाठव बर. "
" दे आई तुझा फोन. "
" माझा का? " रेखाताई शॉक होत्या.
" तुझ्या अकाऊंट वरून पाठवतो. "
"नाही, अजिबात नाही. मला जमणार नाही."
" तुझ्याच लाडक्या लेकीला पाठवायचे आहेत ना आई? माझ्याकडे पैसे नसतात. सगळे पैसे आता आशाकडे असतात. ती नाही म्हणते. यापुढे तुषार, लीनाला तू मदत करत जा."
" आशा देत नाही तू बर ऐकून घेतो."
" मग तू ही असच करत होती. बाबांचा पैसा सांभाळून होतीस. कधी कोणाला काही दिल नाही. मी माझा व्यवहार माझ्या बायकोकडे दिला तर काय झालं? आम्ही घर घेतलं तिकडे आम्हाला पैसे लागतात." नितीन म्हणाला.
तुषारला त्याने फोन केला. संध्याकाळी तुषार, लीना आले.
"आईला तुमच्या कडे घेवून जा. तुझ्या ही बायकोला काही काम करू दे. आई आता सहा महिने तिकडे, सहा महिने इकडे राहील. लीना तू ही जबाबदारी घेणार का? "
"नाही दादा. "
" माहिती होत तू अस करशील."
"मी तुषार कडे जाणार नाही." रेखाताई म्हणाल्या.
" मग इथे ऐकटी रहा आई. मी तिला फक्त सहा महिने बघेल. आम्ही घर घेतलं तिकडे शिफ्ट होतो आहोत. "
" वहिनीने कान भरले ना. इतके दिवस हा चांगला होता." लीना म्हणाली.
" नाही मी डोळ्यावरची पट्टी काढली. मला गरज होती तेव्हा कोणी मदत केली नाही. आता ज्याने त्याने आप आपलं बघा." नितीन म्हणाला.
आशा ऐकत होती तिला बर वाटलं. हे असे असतात मुखवट्या मागचे नाते. त्यांना पैसा गोड लागतो. लवकर समजल तर बर नाहीतर यांच्या मुळे आपण पूर्ण पोखरून जातो.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
