Login

एका घरात दिवा उशिरा लागला…

आई आणी मुलांची भेट...

एका घरात दिवा उशिरा लागला…


गावाच्या शेवटी एक छोटंसं कौलारू घर होतं. त्या घरात सीता काकू एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा अमोल शहरात नोकरी करत होता. कामामुळे तो फारसा घरी येऊ शकत नव्हता. कधी तरी येत होता.. तेव्हा सीता काकूला खूप आनंद होत होता.

गावात रोज एकच सवय होती, संध्याकाळ झाली की सीता काकूंच्या घरातला दिवा सगळ्यात आधी लागायचा. देवघरात दिवा लागला की जणू त्या घराला जीव यायचा. त्याला छान पण वाटायचे. त्यांचा अमोलजवळ आहे असे वाटायचे.

पण त्या दिवशी काहीतरी वेगळं होतं… कारण अमोल घरी येणार होता. सीता काकू त्यांची वाट बघत होती. त्यांनी मनात काही तरी ठरवले होते.

संध्याकाळ झाली… अंधार पडला… तरी त्या घरात दिवा लागला नाही.

शेजारचे लोक खिडकीकडे पाहत होते. सीता काकूला हाक मारत होते.

“आज सीता काकूंच्या घरात दिवा का नाही लागला?”
एकमेकांत कुजबुज सुरू झाली. त्यांना काहीच समजतं नवजते.

थोड्या वेळाने गावात एक गाडी येऊन थांबली. त्यातून अमोल उतरला. त्याने घराचं दार उघडलं. घर पूर्ण अंधारात होतं.

“आई…!” त्याने हाक मारली.

सीता काकू आत बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. अमोल येतो की नाही, त्या विचार करत होत्या.

अमोल जवळ गेला आणि म्हणाला,
“आई, अंधारात का बसली आहेस? दिवा का नाही लावला?”

सीता काकू हळू आवाजात म्हणाल्या,
“तू येणार आहेस असं म्हणाला होतास… म्हणून वाट बघत होते. वाटलं… तू आलास की आपण दोघं मिळून दिवा लावू.”

अमोल काही क्षण शांत राहिला. त्याला जाणवलं, आईला फक्त दिव्याची नाही, तर त्याच्या सहवासाची वाट होती. चल आपण सोबत दिवा लावू, तो म्हणाला.

"आता तू आला आहे तर, तूच लाव," सीता म्हणाल्या

त्याने देवघरात जाऊन दिवा लावला. देवाजवळ हात जोडले. बाहेर पण दिवा लावला..

क्षणात घर उजळून निघालं… पण त्या प्रकाशापेक्षा जास्त उजळलं होतं आईचं हसू.

त्या घरात दिवा उशिरा लागला होता…
पण त्या दिव्याने आईच्या मनातला अंधार दूर केला होता.

कधी कधी दिवा उशिरा लागतो…
कारण कोणीतरी आपल्या माणसाची वाट बघत असतं.
तो माणूस आल्यावर घर उजळून जाते...