Login

एक रुपया भाग 1

गोष्ट एका रुपयाची
"तू आणि व्यवसाय करणार?" मोहित आपल्या बायकोवर हसत सुटला.
"तुला घरची कामं तरी नीट जमतात का ग? भाजीत मीठ कमी पडतं तर कधी जास्त पडतं. आमटी पातळ झाली की पुढच्या वेळी ती नेमकी घट्ट होते. तुझा रोजचा चहा तरी एका चवीचा असतो का?"

मुलाचं बोलणं ऐकून वीणा ताई हसायला लागल्या. "तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. घरची कामं करायला म्हणून गरीबा घरची मुलगी करून आणली. त्यांना सवय असते रे, कष्ट करून कामं करायची! पण इथं सगळं निराळंच आहे. आई -वडील रिकामे तशीच मुलगीही रिकामीच आहे अगदी." आता त्यांचं हास्य रागात बदललं.
"तुमच्या लग्नाला दोन वर्ष झाली. पण अजून काही पाळणा हलला नाहीय. कधी मनावर घेणार? देव जाणे!"

अनिता मान खाली घालून बसली होती. "अहो, गुंतवण्यासाठी थोडे पैसे द्या. मी परत करेन ते."

"मला नकोत तुझे पैसे..अजूनही हट्ट आहेच का? पदवीपर्यंत शिक्षण झालं म्हणजे व्यवसाय करण्याची अक्कल येतेच असं नाही काही. हा एक रुपया घे आणि यात जेवढं येतं ते कर." मोहितने अनिताकडे एक रुपया जवळ जवळ फेकलाच.

"यात काय येणार?" अनिताचा चेहरा रडवेला झाला म्हणून ती आपल्या खोलीत निघून गेली.

"आई, हिला काय जमणार आहे? रडूबाई आहे नुसती. बरं, काय कमी आहे ग हिला? आपल्या घरची परिस्थिती उत्तम आहे. बाकी कसलाही त्रास नाही. घरात आपण तिघेच! कोण सारखं येतं -जातं? कामाचा व्याप तरी इतका आहेच कुठं? मी सांगतो, हे व्यवसायचं भूत दोन दिवसांत उतरेल. मग घरची कामं सोपी वाटायला लागतील." मोहित आरशात पाहून केस विंचरत ऑफिसला जायची तयारी करत होता. वीणा ताईंनी पुन्हा हसून त्याला प्रतिसाद दिला.

खोलीत आल्यावर अनिताने भरपूर रडून घेतलं. लग्न झाल्यानंतर आयुष्य सुखात जगता येईल ही तिची समजूत चुकीची ठरली होती. वीणा ताई सासू म्हणून या घरावर आपला अधिकार गाजवत होत्या अन् अनिताला सून म्हणून या घरात आणून माझी निवड कशी चुकली हे जगाला दाखवून, पटवून देत होत्या अन् तुला कशाला पैसे लागतात? म्हणून मोहित आपला पगार आईकडे द्यायचा.

अनिताचं माहेर परिस्थितीने गरीब होतं. तिथले संस्कार अंगवळणी पडल्याने तिला काटकसरीची लागलेली सवय लगेच सुटणारी नव्हती. शिवाय ती वीणा ताईंना घाबरून असायची त्यामुळे कामात चुका व्हायच्या. मग मोहित त्या चुका पकडून तिला हैराण करायचा. ताई त्या चुका अजून मोठ्या करायच्या.
आपल्या मुलीशी सुनेची तुलना करत नावं ठेवायच्या.
अनिताला वाटायचं, हे घर सोडून कुठेतरी दूर निघून जावं. पण आई -वडिलांची आठवण आली की तिच्या मनातले विचार पुन्हा ताजे व्हायचे. आपण काहीतरी करून दाखवण्याची, शिक्षणाचा उपयोग करून घेण्याची जिद्द अजूनच दृढ व्हायची.
वीणा ताई घरी नसल्या की मोहित बायकोशी छान वागायचा. तिला समजून घ्यायचा. पण आई समोर असली की त्याचं वागणं पार बदलून जायचं.

अनिताने डोळे पुसले. तिच्या मुठीत मगाचसा एक रुपया अजून तसाच होता. काही विचार करून तो तिने आपल्या पर्समध्ये ठेवला.

दुपारची जेवणं उरकली आणि वीणा ताई झोपायला आपल्या खोलीत गेल्या. तशी अनिता लैच लावून हळूच बाहेर पडली. मुख्य रस्त्याला लागून टेलरचं एक दुकान होतं. तिथं तिचे ड्रेस, वीणा ताईंचे कपडे शिवायला टाकायला एरवी तिच जायची.
काही क्षण त्या दुकानाबाहेर घुटमळत अनिता आत आली.

"आज काय काम काढलंत?" शिवण शिवणारे दादा हसून म्हणाले.

"मला शिवण शिकायचं आहे." अनिता हळू आवाजात बोलली.

"ताई, मी शिकवत नाही. कपडे शिवून देतो. विसरलात की काय? शिकायचं असेल तर शिवण क्लासला जावा की." हे ऐकून अनिता ओशाळली.

"मग हे असे कपडे शिवून द्याल?" तिने छोट्या बाळांची झबली, टोपडी, लांगोट्या, दुपट्यांची चित्रं असणारं एक मासिक आणलं होतं.
"हो. पण त्याचे पैसे नेहमीच्या दरापेक्षा वेगळे होतील." हे ऐकून अनिताचा चेहरा पडला.
"सध्या माझ्याकडे तुम्हाला द्यायला पुरेसे पैसे नाहीत. पण हा एक रुपया तात्पुरता ठेऊन घ्या आणि तुम्ही शिवून दिलेले कपडे विकले की तुमचे पैसे लग्गेच मी परत करेन."

"ताई, चेष्टा करता का माझी? या एका रुपयात काय येणार? तुमची कल्पना चांगली आहे, पण त्यासाठी पैका लागतो. जेव्हा पैसे जमतील तेव्हा या. मी शिवून देईन." टेलर दादा तिला हाताने जा अशी खूण करत म्हणाले.

"तुमचा माझ्यावर विश्वास नाहीय का?" नाराज झालेली अनिता आपल्या डोळ्यांतले अश्रू अडवत म्हणाली. "मला मशीन येत असतं तर मी स्वतः हे कपडे शिवले असते. दादा, निदान बघा तरी. लहान बाळांचे कपडे कित्ती गोड दिसतात ते! एकदा का हे विकले गेले की तुमचंही नाव होईल. गिऱ्हाईक वाढेल आणि तुम्हाला दोन मदतनीस ठेवावे लागतील. ही जागा सुद्धा कमी पडेल अन् मला माझ्या आवडीचं काहीतरी करून दाखवता येईल." अनिता एकदम बोलून गेली.

टेलर दादांनी बराच वेळ विचार केला. "तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे म्हणा. म्हणून माझी मदत हवीय. आणा बघू ते. मी म्हणाल तसे कपडे शिवून देतो. पण माझे पैसे बुडवायचे नाहीत हं. नाहीतर मी घरी येऊन पैसे वसूल करून जाईन."

"नको. विश्वास म्हणून हा एक रुपया ठेवून घ्या. मी पैसे जमले की स्वतः येऊन देईन आणि सध्या घरी काही सांगू नका. नाहीतर मला काही करता येणार नाही. कपडे कसे शिवून हवेत हे सांगून अनिता घरी आली तर वीणा ताई तिची वाट बघत बसल्या होत्या.
"कित्ती हाका मारल्या गं! कुठं गेली होतीस?

"आई, ते चहा पावडर संपली होती. तुम्हाला चार वाजता चहा लागतो ना, म्हणून न सांगताच पट्कन आणायला गेले."
टेलर दादा चार दिवसांनी कपडे शिवून देतो म्हणालेत खरे. पण त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे अनिताला कळत नव्हतं.

चार दिवसांनी ती सकाळी लवकर टेलर दादांकडे पोहोचली.
"दादा, कपडे?" उत्साहाने अनिता आत आली.

"शिवले नाहीत अजून. मला वाटलं चार दिवसांनी हे खूळ तुमच्या डोक्यातून निघून जाईल म्हणून मी म्हणालो होतो. " दादा खदाखदा हसत म्हणाले.


क्रमशः
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →