एक प्रेम असेही.भाग -१

वाचा एक प्रेमकथा
एक प्रेम असेही.
भाग -१

“आदित्य अरे किती पसारा करून ठेवलाहेस? मी हा सगळा कचरा टाकून देणार आहे. यातलं काही ठेवायचं असेल तर आताच बघ.नतंर मला ओरडू नकोस.” अहिल्याताईंचा आवाज कानावर आला तसे लॅपटॉप हातात घेऊन आदित्य पळतच हॉलमधून त्याच्या खोलीत गेला.

“आई, अगं मी आवरतो ना. तू कशाला इथे आलीहेस?”

“नेहमी तेच ऐकवत असतोस. काय सोनं लपवून ठेवलंस या खोलीत तुलाच माहित.”

“हम्म. असू दे.” त्या एकेक वस्तू काढत होत्या आणि आदित्य पून्हा त्या वस्तू जगेवर ठेवत होता.

“अरे आदि, आता लग्न महिन्यावर आलंय. तुझ्या बायकोला का अशा पसाऱ्यात ठेवणार आहेस का? नव्या आयुष्याची सुरुवात नव्याने करावी. जुनं सगळं पुसून टाकावं हेही कळत नसेल तर इतक्या शिक्षणाचा काय उपयोग? हे सगळं रद्दीवाल्याला देवून टाकणारे मी.” काही जुनी पुस्तकं आणि वह्या जमा करत अहिल्याताई मोठयाने बोलत होत्या.

“आतापासून तुला माझ्यापेक्षा सूनेचा लळा लागलाय.” नाक मुरडत तो म्हणाला आणि तेवढ्यात त्याचे लक्ष आईच्या हातातील एका जुन्या डायरीवर पडले.

“आई, एक मिनिट..” त्याने ती डायरी जवळजवळ खेचून घेतली.

“काय रे तुझं? स्वतः पसारा करायचा नि मलाही कामं करू द्यायची नाही असं ठरवलं आहेस का?” त्यांचा चिडका स्वर.

“नाही गं. तू आवर. मी ऑफिसला निघतो.” लॅपटॉपच्या बॅगेत हातातील डायरी भरून तो बाहेर गेला आणि त्याचा वरमलेला आवाज ऐकून अहिल्याताई देखील क्षणभर काम करायच्या थांबल्या.

“आजकालच्या मुलांचं काहीच कळत नाही.” तो गेल्याच्या दिशेने बघत त्यांनी नकारार्थी मान डोलावली आणि स्वतःला पून्हा कामाला जुम्पून घेतले.
_________

‘कभी तो नजर मिलाओ
कभी तो करीब आओ..’

केबिनमध्ये बसलेल्या आदित्यने हातातील डायरीचे पान उलटले आणि समोर त्याच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या शब्दावरून अलगद हात फिरवला. त्या ओळी वाचून त्याच्या ओठावर एक फिकट हसू उमटले होते.

“हाय आदित्य!”

त्याने डोळे मिटून घेतले आणि हृदयाच्या आत कुठूनतरी एक साद ऐकू आली.

त्या आवाजासरशी त्याच्या ओठांची हलकी हालचाल झाली.

“सई..”

त्याने घेतलेले ते नाव आणि नावासोबतच मिटलेल्या पापण्यासमोर उभा ठाकलेला तो चेहरा..

नुकत्याच उमललेल्या गुलाबाच्या पाकळीसारखा तो तजेलदार चेहरा. बघताक्षणी कुणाचीही नजर क्षणभर ठहरेल असे ते सौंदर्य आणि.. आणि अविरत बडबड करणारे तिचे ते नाजूक ओठ!

कोण होती ही सुंदरा? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
___________

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →