Login

एक नाटक असेही २

Sasu Sun
“काय म्हणतात चिरंजीव?” श्यामराव सोफ्यावर बसत, हातात पेपर घेत म्हणाले.

“लग्न नकोच म्हणतोय.. कसं समजायचं या मुलाला आता?” शशिकलाबाई डोक्याला हात लावत बाजूला सोफ्यावर बसल्या.

“धास्तावला आहे ग तो. सगळीकडील, घरातील वातावरण बघून त्याला नको वाटत असेल. मीही लहान होतो तर लग्न करायचे नाहीच, असे ठरवले होते. करेल नंतर, जाऊ दे..”

“अहो जाऊ दे काय, लग्न वेळेत व्हायला नको का? मग मुलबाळ? तसेच तर श्रवणच्या लग्नाला चार वर्ष होऊन गेलीत, घरात अजून पाळणा हलला नाही.”

“होईल, व्हायचं तेव्हा होईल..”

“कुठल्या नक्षत्रावर हिला पसंत केली होती, काय ठाऊक? ते जाऊ द्या, पण या राघवाचे काय करायचे ते सांगा? समजावून थकले पण अगदी ऐकायला म्हणून तयार नाही.”

“घरातील वादविवाद टाळता येत असेल तर बघा..” ते आपले सहज बोलून गेले.

“घरात वादविवाद मी करते काय?” शशिकला बाईंचे डोळे मोठे झाले.

“अरे नाही नाही, माझं ते म्हणणं नाहीये. मला म्हणायचं की त्याला लग्न करावे वाटेल असे पोशक वातावरण पाहिजे घरात. म्हणजे तूच विचारले, म्हणून मी सांगितले.” ते खांदे उडवत म्हणाले.

“अहो पण कसे करणार? तिला कोण समजावणार?”

“दुसऱ्याला कसे समजावणार? आपण आपल्याकडूनच प्रयत्न करायचा, बाकी आपल्या हातात काय असते?”

“म्हणजे काय करायचे?”

“चांगली सासू बनण्याचे नाटक कर..”

“म्हणजे? तुम्हाला काय म्हणायचे मी वाईट सासू आहे?” त्यांचे दोन्ही हात कंबरेवर गेले.

“चुकलंच..” श्यामरावांनी जीभ चावली.

“तसे नाही म्हणायचे, तू चांगलीच सासू आहेस, पण मिताला तसे दिसत नाही, तर म्हणालो, थोडे नाटक कर.. म्हणजे तू चांगली सासू आहे असे तिला दिसले पाहिजे.”

“म्हणजे? अन् हे नाटक वाटक मला नाही जमायचं. मी जशी आहे खूप चांगली आहे. दुसऱ्या सासवा जाऊन बघा जरा?” त्या ठसक्यात म्हणाल्या.

“गाईच्या गळ्यात घंटा बांधणे, मोठ्ठं अवघड काम..” नकारार्थी मान हलवित स्वतःशीच म्हणाले.

“राघवाचे लग्न करायचे नाही काय?” श्यामराव परत आपल्या मुद्द्यावर आले.

“काय करायचं तुम्हीच सांगा.”

“घरातील कामं कर म्हणजे तिला काहीच काम करावे लागणार नाही. कधी कधी डब्बा भरून दे , तुझ्या मैत्रिणी येतात तेव्हा सगळ्यांसमोर तिचं कौतुक कर. ते सगळं बघून तिला वाटेल तिची सासू तिच्यावर फार प्रेम करते , माया लावते.”

“हे माझ्याने एवढे होत नाही, गुडघे आणि कंबरदुखी डोकं वर काढतात. दुसरे काही नाही का?”

“मग तिला छान छान गिफ्ट दे. आता पुढल्या महिन्यात तिचा वाढदिवस येत आहे. छान सोन्याचा एखादा दागिना देऊन दे..”

“क…काय..?” शशिकला बाई एकदम जागेवरूनच उठून उभ्या राहिल्या.