Login

एक नाटक असेही ४

Sasu Sun
“आई, अगं आज पोळ्या कशा वातड बनवल्यात ग वहिनीने? चावून चावून जबडा दुखायला लागला..”राघव ऑफिस मधून आल्या आल्या वैतागत बोलत होता.

“ जबडा बरा नाही दुखत रे तुझा बोलून बोलून..” शशिकला बाई.

“बरी तिची साईड घेतेय, हा? हे बघ तुम्ही खात बसा तिच्या हातचे, पण मला जमणार नाही. ऑफिस मध्ये आज माझी किती नाचक्की झाली.. सगळे जण खूप हसत होते, एकजण माझा डब्बा खात नव्हते.. केवढी इन्सल्टिंग फील झाले. ते काही नाही, एकतर पोळी साठी मावशी लाव नाहीतर मी माझा ऑफिस मध्ये जेवणार..” राघवने आपली मर्जी सांगून दिली आणि पाणी पित सोफ्यावर बसला.

“ राघव, एवढ्या मेहनतीने आज तुमच्या आईने जेवण बनवले होते आणि तू नाव ठेवत आहेस? हे शोभते काय? ” श्यामराव तिथे येत म्हणाले.

“क…काय?” पाणी पित होताच की पाण्याचा फवारा उडाला.

शशिकला बाई त्याच्याकडे रागाने बघत होत्या.

“मिताला बरे नाही म्हणून आज तुझ्या आईने बनवले.. आणि अन्न हे अन्न असते.” श्यामराव.

“एवढ्या दिवसांनी बनवून सुद्धा भाजीची चव अगदी टाप होती हा ..” राघव.

“बस पुरे! अन् सगळी नाटकं आहेत तिची तब्येतीची.. काही काम करायला नको ” शशिकला बाई चिडत म्हणाल्या.

“तेच, ते म्हणायचे होते मला. आई मी काय म्हणतोय, आता ही तब्येतीची ट्रिक ती नेहमी वापरणार, आणि तिला वाटेल आपण तिच्यावर अवलंबून आहोत तर उगीच भाव खाणार आणि मग स्वयंपाकाचा सगळा भार तुझ्यावर पडणार. त्यापेक्षा आपण पोळी साठी मावशी लावून घेऊ बाकी भाजी, कुकर तर कोणीही येताजाता लावतो आणि सणावारचे नैवैद्यच्या दोन पोळ्या तर तूच करू शकते.” राघव.

“तुझं पण बोलणे ठीक वाटतेय. ठीक आहे, कल्याणीकडील मावशीला निरोप देते..” शशिकला बाई.

********

“ऐका ना… मला टू व्हीलर घेऊन द्या ना. रोज ऑफिसला बस, ऑटो, बाजार… खूप दगदग होते.” संध्याकाळी श्रवण ऑफिस मधून आल्यावर ती त्याच्या मागे लागली होती.

“हो पण… माझ्याकडे एवढे पैस नाहीत ?” श्रवण थोडा गोंधळून म्हणाला.

“माझ्याकडे आहेत साठवलेले..”

“अ, नको.. अडीअडचणीला हवेत. “

“काल डॉक्टरांकडे गेली होती. दगदग कमी होईल, त्याकडे लक्ष द्या म्हणाले. “ तिचे डोळे ओलावले होते.

“नोकरी सोडून दे, घरी आराम कर.”

“नाही, मला नोकरी नाही सोडायची. थोडुसा पगार का असेना, पण माझा स्वाभिमान आहे तो. आणि तुम्ही हे असे आईला घाबरून वागत असता, कधी त्या मला सोडून दे म्हणाल्या तर तुम्ही मागे पुढे नाही बघणार..”

“मिता…” श्रवणचा आवाज वाढला. आणखी परत विषय वाढायला नको म्हणून तो घराबाहेर निघून आला.

*****

मिता ऑफिसला जायला बाहेर आली आणि समोरील दृश्य बघून थक्कच झाली.

“अरे… ही गाडी कोणाची?” ती घरासमोरील स्कूटर बघून म्हणाली.

“तुझी.” राघव किल्ली हातात फिरवत म्हणाला.

“माझी??” मिता विश्वासच ठेवू शकत नव्हती.

“हो वहिनी, घे.. ट्राय करून बघ.”

मिताच्या डोळ्यांत आनंद चमकला.
तेवढ्यात शशिकला बाई बाहेर आल्या.
“ही गाडी कोणाची?”

“वहिनीची..” राघव.

“काय गरज होती? आणि घेण्या आधी मोठ्यांना विचारण्याची पद्धत असते की नाही?” त्या श्रवण आणि मिताकडे बघत म्हणाला.