Login

एक नाटक असेही १

Katha Ghartil... Gharatil Sadasyasarhi

“ नाही, मला लग्न करायचे नाही.”

“अरे वय वाढत चालले आहे, अठ्ठावीसचा घोडा झाला आहेस.. उशीर केला तर चांगल्या मुली भेटणार नाही.”

“ तेच म्हणतोय , चांगल्या मुली आता राहिल्याच कुठे? आता मिता वहिनीच बघ, काही एक धड काम येत नाही. कशी कुलटा, कुलक्षिणी, कंत्राटी अन् काय काय आहे. ती दुसरी पण तशीच निघाली तर? आधीच घराचं वांग झालं आहे, परत काही नको.” तो आपल्या मतावर ठाम होता.

“ अरे सगळ्या मुली काय अशाच नसतात, आता एक निघाली तशी, म्हणून सगळ्याच तश्या थोडी असतात?”

“असतील ही चांगल्या मुली पण सून झाल्या की अंगातच येतात बघ. नकोच ती सर्कस.”

“असे काही नाही, असतात रे चांगल्या सुना पण असतात.”

“आई, मला सांग तुझ्या कोणत्या मैत्रिणीची सून चांगली आहे? तुझ्या कुठल्या तरी मैत्रिणीच्या सुनेने घर फोडले म्हणे ना? तुम्ही सगळ्या किती दुःखी आहेत. सगळ्यांच्या याव ना ताव अशाच कहाण्या.. मला आपलं घर काही फोडायचं नाही.”

“आपण व्यवस्थित निरखून आणू.”

“ अगं वहिनीला सुद्धा बघायलाच गेलो होतो ना? किती बरं मंजुळ बोलली होती ती, तुझ्या सगळ्या प्रश्नांची किती व्यवस्थित उत्तरं दिलीत. तिने पोहे बनवले होते, तूच किती स्तुती केली होती. आता सांग बरं, एक साधा चहा चांगला करत नाही. मला तर वाटते तेव्हा पोहे सुद्धा कोणी दुसरीनेच बनवले असणार. बघण्याच्या कार्यक्रमाला गेलो की चांगल्याच वाटतात, पण खरे रंग लग्ना नंतरच दिसतात. नको बाबा, विषाची परीक्षा नको.”

“ हो रे, आपण चांगल्या नोकरीची शोधू, म्हणजे सगळ्या कामाला बाई लावून घेऊ, कामाचा प्रश्नच नाही.”

“अगं पण आपले सणवर, कुळाचार, नैवैद्य.. आपल्याला बाहेरच्या बाईच्या हातचे चालते कुठे? घरातीलच बाईच्या हातचा नैवैद्य लागतो. तुला कुठे जमते आता? तुझे किती सतत गुढघे आणि कंबर दुखत असते. तू आतापर्यंत सगळं कसं व्यवस्थित केले, या बाहेरच्या पोरी करतील का? आणि जास्त पगाराची तर आणखीच डोक्यावर बसते. सरळ घर वेगळं करायला सांगतात. तो दादा बघ, ती वहिनी तुला एवढी उलटून बोलते तरी एक शब्द बोलत नाही..मला नाही बनायचं ताटा खालचे रानडुक्कर..”

“अरे ते ताटा खालचे मांजर…”

“हो तेच ते, म्हणून म्हणतो हे लग्न बिग्न नको. चल निघतो मी ऑफिसला उशीर नको व्हायला.”

“भाऊजी, हा डब्बा..” मिता किचन मधून पळत येत, हातात डब्बा सांभाळत त्याला देत म्हणाली.

“ वहिनी, चल तुला तुझ्या ऑफिसला सोडतो.” तो डब्बा हातात घेत म्हणाला.

“ हो पण माझी अजून तयारी व्हायची आहे, तुम्ही जावा.” मिता स्मित करत म्हणाली.

“ तयारी करून अशी कोणती ऐश्वर्या दिसणार आहेस?” शशिकला बाईनी टोमणा मारलाच.

“ ऐश्वर्याला सुद्धा सासू बोलायची चुकली नाही, माझी मेली मग काय किंमत? ती एवढी कर्तबगार, जग सुंदरी, संस्कारी, पैसेवाली, तिच्या सुद्धा संसाराचं वाटोळंकरून ठेवले त्या बाईने..” मिताने नाक मुरडले.

“अमिताभची सून होणं म्हणजे काय लहान गोष्ट होती का? घरात तिने लक्ष घातले असते तर जया कशाला बोलली असती?” शशिकलाबाईंनी तोंड वाकडे केले.

“राघव भाऊजी, अगदी छान निर्णय, तुम्ही लग्न करूच नका.” मिता. “तरी बरं इकडे नणंद नाही.” हे मात्र ती स्वतःशीच पुटपुटली.

राघव दोघींचे बोलणे ऐकत, गालातच हसू दाबत होता.

“दहा मिनिटांनी तुम्हाला उशीर नसेल होत तर थांबा, आलेच मी..” म्हणत मिता तिच्या खोलीत तयार व्हायला गेली.

“हे असे वचकटून बोलण्याची तिला काही गरज होती? या चांडाळनीमुळे घराचं सगळं वाटोळं झालं आहे.”
” शशिकला बाई.

“म्हणूनच म्हणतो नको दुसरी पिचाशिनी घरात.” राघव.

“मी बोलत होते तर तुला उशीर होत होता ना? आता बरा थांबला?”

“अगं तिचं ऑफिस माझ्या रस्त्यातच आहे, अन् तेवढेच तिकिटीचे पैसे वाचतील वाटलं..”

“हो बरोबर, तसाही तिचा तो इनमिन पगार..” शशिकला बाई.

“चला राघव भाऊजी.” डब्बा, ऑफिस बॅग सगळं सांभाळत येत म्हणाली.

“आई, येतो..” म्हणत दोघेही घराबाहेर पडले.

“काय म्हणतात चिरंजीव?” श्यामराव सोफ्यावर बसत, हातात पेपर घेत म्हणाले.

“लग्न नकोच म्हणतोय.. कसं समजायचं या मुलाला आता?” शशिकलाबाई डोक्याला हात लावत बाजूला सोफ्यावर बसल्या.

“धास्तावला आहे ग तो. सगळीकडील, घरातील वातावरण बघून त्याला नको वाटत असेल. मीही लहान होतो तर लग्न करायचे नाहीच, असे ठरवले होते. करेल नंतर, जाऊ दे..”

0

🎭 Series Post

View all