Login

एक अनोळखी भेट...

एका अनोळखी भेटीची कोमल गोष्ट...
एक अनोळखी भेट ....


निधी रोज प्रमाणे 7:30 वाजता बस स्टॉप वर उभी चेहऱ्यावर नेहमी सारखं निखळ हास्य , एका खांद्यावर अडकवलेली बॅग .. दुसऱ्या खांद्यावर वाऱ्यावर उडती ओढणी सावरत ..
नजर कधी रस्त्यावर तर कधी मनगटावरील घड्याळावर टिकत होती .


"कुठे राहिला हा मुलगा, येव्हाना यायला पाहिजे होता .." ती केस सावरत स्वतः शी पुटपुटली .


सकाळची वेळ शाळेत, ऑफिससाठी लांब प्रवास करणारे हळूहळू घराबाहेर पडू लागले होते . पेपरवाले, दूधवाले कामाला लागले होते ... वातावरण शांत आणि प्रसन्न झाले होते .


तोच बसचा हॉर्न जवळ वाजला तशी ती भानावर आली ,
7:45 ची गाडी आली होती , गर्दीतून वाट काढत एक एकजण बसमध्ये चढत होते , ती मात्र बघत थांबली ...
नजर अजूनही त्याच्या वाटेला लागून होती .



बस निघून गेली , ती उभा राहून थकली होती .
मागे वळून तिथल्या कट्ट्यावर बसून घेतले , फोनमध्ये नोटिफिकेशन बघू लागली .


तेवढ्यात एक ओळखीचा सुगंध आला , तसा तिचा चेहरा खुलला , तिने मान वर केली .. समोर तो धापा टाकत कंबरेवर हात ठेवून उभा होता.


छातीला लावलेली बॅग, काळा फॉर्मल शर्ट आणि पँट , त्याच्या शरीरावर उठून दिसत होते .
घामाने भिजलेला चेहरा चमकत होता , ती त्याला बघण्यात मग्न झाली .


"एक्सक्यूज मी, पावणे आठची बस गेली का?" त्याने तिला आवाज देत विचारले ,


तशी ती त्याच्या त्या आवाजात हरवून जात , नुसती होकारार्थी मान डोलावली..


तसा तो वैतागून तिच्या बाजूला काही अंतर ठेवून बसला .


दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली होती…
फक्त रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज आणि पक्ष्यांची चिवचिव ऐकू येत होती.


ती मात्र अजूनही चोरून चोरून त्याच्याकडे बघत होती…
तो केसांवरून हात फिरवत स्वतःला सावरत होता.


"आज पुन्हा लेट झालो…" तो स्वतःशीच हळूच पुटपुटला.


तिच्या ओठांवर नकळत हसू उमटलं.

"रोजच का?" ती अचानक बोलून गेली.


तो थोडा दचकला… तिच्याकडे वळून बघितलं.


"हो… बहुतेक सवयच झाली आहे उशिरा यायची," तो हलकंसं हसत म्हणाला.


"अच्छा , मग रोज बस मिस करता?" तिने खोडकरपणे विचारलं.


"बस नाही… काहीतरी तरी मिस होतंच," त्याने थोड्या वेगळ्या अंदाजात उत्तर दिलं.


क्षणभर त्यांच्या नजरा भिडल्या… आणि तिने नजर लगेच खाली वळली.


"तुमची पण बस मिस झाली का ?" त्याने विचारलं.


तिचं हृदय जरा जोरात धडधडलं…


"हं…म्हणजे हो थोडा लेट झाला," ती हलक्या हसत म्हणाली.


दोघेही नकळत हसू लागले…

"चला म्हणजे मी एकटाच लेट नाही झालो .." तो हसत म्हणाला .
ती ही हसली ,


दोघेही शांत झाले , हळूहळू स्टॉपवर गर्दी वाढू लागली .
पुढची बस येण्याची वेळ झाली ,तसे दोघेही उठून समोर आले .
पाच मिनिटांतच बस येताना दिसली ,


त्याने बॅग आपल्या छातीवर घट्ट गेली, तिने आपली ओढणी खाली बांधली, एका हाताने बॅग पकडली.


बस थांबली,तशी खालची गर्दी बसच्या दारावर धडकू लागली .
चढाओढ सुरू झाली , बड्या कष्टाने त्याने स्वतः ला बसच्या दुसऱ्या पायरीवर उभे केले .


मागे ती मात्र अजूनही आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होती, चेहऱ्यावर केस तिला त्रास देत होते,

त्या गर्दीत तिचा पुढे आलेला हात त्याला दिसला ,
तसे पटकन तिचा हात पकडून त्याने तिला पुढे सरकायला मदत करू लागला .


अचानक स्पर्श झाल्याने ती जरा दचकली ,पण समोर तो असल्याने ती परत त्याच्या त्या पाणीदार डोळ्यात हरवून गेली .


त्याने तिला हलळ्या हाताने ओढुन बसच्या पहिल्या पायरीवर उभे केले , मागच्या गर्दीचा तिला धक्का बसला तशी ती त्याच्या अंगावर झुकली गेली , दोघेही बेसावध पण त्याने शेजारच्या खांबाचा आधार घेत स्वतः ला आणि तिला सावरले ..


दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवले, कंडक्टरने बेल वाजली तशी
भानावर आले , पटकन हात सोडून वर चढले ..
बस गच्च भरलेली होती , दोघेही शेजारी उभे पण एक अवघडलेपण आले होते .


बसच्या धक्क्याने एकमेकांना स्पर्श होत होता…
दोघेही काही बोलत नव्हते, पण मन मात्र शांत बसायला तयार नव्हतं.


ती खिडकीबाहेर बघण्याचा प्रयत्न करत होती… पण प्रत्येक वेळी नजर नकळत त्याच्याकडेच वळत होती , त्याचा तो स्पर्श अजूनही ती अनुभव होती .


तोही कधी मोबाईलकडे बघायचा, तर कधी समोर… पण त्याचं लक्षही वारंवार तिच्याकडे जात होतं.


"तिकीट… तिकीट…" कंडक्टरचा आवाज आला.

दोघांनीही एकाच वेळी खिशात/पर्समध्ये पैसे शोधायला सुरुवात केली… आणि पुन्हा एकदा त्यांच्या हातांचा हलकासा स्पर्श झाला.


ती पटकन हात मागे घेत हसली… तोही हलकंसं हसला.


"तुमचं कुठपर्यंत?" त्याने विचारलं.


"सिटी हॉस्पिटल…" ती म्हणाली.


"ओह… माझं पण तिथेच आहे," तो म्हणाला.
क्षणभर दोघेही एकमेकांकडे बघत राहिले…त्यांनी बोलतच तिकिट काढले


"म्हणजे… रोज भेट होणार आता," तो थोड्या हसत म्हणाला.
तिच्या गालावर हलकीशी लाली आली…


"लेट आलात तर नाही…" ती खोडकरपणे म्हणाली.


"आता नाही येणार लेट," त्याने तिच्याकडे बघत ठामपणे सांगितलं.


बस हळूहळू पुढे सरकत होती… प्रत्येक स्टॉपवर गर्दी कमी होत होती. आता दोघांमध्ये थोडी मोकळी जागा झाली होती…
पण मनातली जवळीक मात्र वाढत चालली होती.


"तुमचं नाव…?" त्याने विचारायचा प्रयत्न केला, पण शब्द अर्धवटच राहिले.


ती त्याच्याकडे बघून हलकंसं हसली…


"निधी…" ती म्हणाली.


"सुंदर नाव आहे…" तो नकळत बोलून गेला.


"आणि तुमचं?" तिने विचारलं.

तो थोडा थांबला…


"ते… पुढच्या भेटीत सांगतो."हसत म्हणाला.

ती आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिली…


तोच बसचा ब्रेक लागला ,

"सिटी हॉस्पिटल!" कंडक्टरने आवाज दिला.


दोघेही खाली उतरले… रस्त्यावर उतरताना पुन्हा एकदा त्यांच्या नजरा भिडल्या…


तो हलकंसं हसला… आणि काही न बोलता पुढे चालत गेला.
ती तिथेच उभी राहून त्याला जाताना बघत राहिली…


मनात एकच विचार आला…

गेल्या दोन महिन्यांपासून चाललेला तिचा हा नजरेचा खेळ,
आज हसऱ्या शब्दांपर्यंत येऊन पोहोचला होता…

काळजीयुक्त तो स्पर्श…बसमध्ये काहीही न सांगता त्याने तिला सावरणं, हे सगळं तिच्या मनाला नकळत स्पर्शून गेलं होतं…


रोजी तिच बस… तेच ठिकाण… तोच प्रवास…
पण कधी संवाद साधला नव्हता…

बोलणं होईल असं कधी वाटलं नव्हतं, पण आज शब्दांनीही ओळख करून दिली होती…

या अनोळखी भेटीचं रूपांतर, तिने मनाच्या एका कोपऱ्यात अलगद जपून ठेवलं होतं…

माहित नाही पुढे काय होणार,
पण ही अनोळखी भेट मात्र…आयुष्यभर लक्षात राहणारी ठरणार होती…


समाप्त...

~Dhanashri"dhanuu"


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →