लघुकथा लेखन स्पर्धा- एप्रिल:-२०२६
विषय:- अज्ञानातील सुख
शीर्षक:- दुस्वास
"आई, अगं हळू बोल जरा. भिंतीलाही कान असतात." भावना काळजीने तिची आई शैलाला दटावत हळू आवाजात म्हणाली.
"असू दे. मला काही देणे-घेणे नाही. मी बोलणारच." शैलाताई संतापाने उसळल्या.
भावनाने बाहेर डोकावून पाहत कानोसा घेतला आणि हळूच दार बंद करून घेतले.
त्यांचा हात पकडत त्यांना बेडवर बसवत शांतपणे ती म्हणाली,"आई, जरा शांत हो. का उगाच बी पी वाढवून घेतेस?"
"तू नको समजावूस मला. खरं काय ते सांगून मोकळी हो. त्याचं शिक्षण पूर्ण झालंय आता. तर तो स्वतःच्या पायावर उभं राहायला सक्षम आहे. सांग त्याला कोणतीही मिळेल ती नोकरी कर आणि या घरातून निघून जा म्हणावं. अजून नाही सहन करू शकत मी त्याला." शैलाताई रागात फडफड बोलल्या.
"आई, तुझा नेमका प्राॅब्लेम काय आहे गं? का त्याच्याशी अशी वागतेस तू? नेहमीच तू त्याला घालून पाडून बोलतेस. तो बिचारा निमूटपणे सगळं तुझं ऐकून घेतो." भावनाच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. ती त्याची बाजू घेऊन बोलली. ते त्यांना आवडले नाही.
"तो आणि बिचारा!हं.." त्या उपहासाने हसत म्हणाल्या.
"आहे मला त्याचा प्राॅब्लेम! कोण, कुठला, तो? ना त्याची जात माहिती ना रक्त? माहिती नाही कोणतं घाणेरडं रक्त त्याच्या शरीरात वाहतंय?" शैलाताई नाक मुरडत फणकाऱ्याने म्हणाली.
"आई, बास कर. तुला जे माहिती नाही त्याबद्दल तुला बोलण्याचा अधिकार नाही. तो कोण आहे आणि त्याच्या शरीरात कोणाचे रक्त वाहतय हे जर तुला कळलं ना तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. तेव्हा अज्ञानातील सुख समजून गप्प बस." भावना संयम राखत पण पहिल्यांदाच धारदार आणि कडक शब्दांत म्हणाली.
"कसलं अज्ञानाचं सुख गं? ह्याला तू घरात आणलंस. तेव्हापासून माझ्या आयुष्यातील सुख निघून गेलं आणि अशी कोणती गोष्ट आहे यांच्यासंबंधीत की माझ्या पायाखालची जमीन सरकेल?" ओल्या डोळ्यांनी पाहत त्यांनी थरथरत्या आवाजाने विचारले.
"आई, खरं तुला सांगणार नव्हते; पण तू त्याच्याबद्दल जे बोललीस ते पाहून मला तोंड उघडायची वेळ आली आणि अजून एक. तू ज्या रक्ताला घाणेरडे बोलत आहेस तेच रक्त आज तुझ्या शरीरात वाहत आहे. त्यादिवशी त्याने त्याचे रक्त आणि एक किडनी दिली नसती तर आज तुला आम्ही गमावून बसलो असतो." भावना हळव्या स्वरात म्हणाली.
शैलाताई तीनताड उडाल्या आणि उठून उभ्या राहिल्या. हे सर्व त्यांच्यासाठी धक्कादायक होतं.
"म्हणजे, काय म्हणायचे आहे तुला?" शैलाताईंनी असमंजस सुरात तिला विचारले.
"त्या दिवशी तुला किडनी आणि रक्त कोणी दिलं होते माहिती आहे का?" भावनाने प्रश्न विचारला.
त्यांनी भरल्या डोळ्यांनी नकारार्थी मान डोलावली.
"शिवम." भावना एक दिर्घ सुस्कारा सोडत म्हणाली.
तो शब्द जणू विजेसारखा त्यांच्यावर कोसळला.
"काय! त्याने दिले; पण तू तर दुसरेच नाव सांगितलं होतंस. ते खोटं होतं." त्या मटकन खाली बसत अविश्वासाने म्हणाल्या.
"हो, शिवमने तसे सांगायला सांगितले होते. तू आधीच त्याचा राग करतेस. त्याने हे सर्व केले हे कळल्यावर तू कशी रियाक्ट झाली असतीस माहिती नाही. म्हणून तुला या अज्ञानात ठेवले." भावनाने स्पष्टीकरण दिले.
शैलाला आपल्या कृत्याचा आणि बोलण्याचा पश्चात्ताप होऊ लागला. त्यांच्या डोळ्यांतून झरझर अश्रू वाहू लागले.
"अजून एक गोष्ट आई, तो परका नाहीये. तोच याच घरचा मुलगा आहे. माझ्या मृत ताईचा मुलगा. जिने तुझ्या मर्जी विरूध्द आंतरजातीय विवाह केला होता." भावनाने इतक्या दिवसांचे मनात लपवून ठेवलेले रहस्य सांगून टाकले.
"क..काय ! तो माझ्या समिधाचा मुलगा आहे." विस्मयचकित होऊन शैलाताईंने विचारले.
"हो, आई.. ताई आणि जिजू यांचा ॲक्सिडेंट झाला होता. जिजूंचा जागीच मृत्यू झाला होता. ताई गंभीर जखमी होऊन मृत्यूशी झगडत होती. मला तिच्या मैत्रिणीने फोन केला होता. मी गेल्यावर सहा महिन्याच्या शिवमला माझ्या हवाली केले आणि ती या जगातून निघून गेली. मी आणि आनंदने याला आपलं मूल म्हणून वाढवलं. तुला वाटलं की मी याला अनाथ आश्रमातून आणलं. तुला कित्येकदा सांगण्याचा प्रयत्न केला ; पण तू कधी माझं ऐकूनच घेतलं नाही. " भावनाने दुसरा धक्का दिला.
क्षणभर शैला काहीच बोलल्या नाहीत.
"त्याला हे सगळं माहिती आहे का?" थोड्यावेळाने शैलाताईंनी शांतपणे विचारले.
"नाही माहिती. आम्हाला तो त्याचे खरे आईवडील मानतो. हे त्याचे अज्ञानाचे सुख खरे सांगून मी हिरावून नाही घेऊ शकत. तुझा त्याच्यासोबत वाढत असलेला दुस्वास नाही सहन झाले मला. म्हणून आज सगळे सांगून टाकले." भावना भावूक होत म्हणाली.
इतकं सगळं ऐकल्यावर शैलाच्या मनातील शिवमचा दुस्वास एका क्षणात कायमचा गळून पडला.
त्यांचे हात पाय थरथरत होते. त्या दार उघडून बाहेर आल्या. शिवम सोफ्यावर बसला होता. त्याच्याकडे नेहमी दुस्वासाने पाहणाऱ्या त्यांच्या नजरेत आता मात्र मायेचा ओलावा होता.
त्याच्या जवळ जात त्यांनी थरथरत्या हातांनी मायेने डोक्यावर हात ठेवला.
"आजी, काय झालं? काही त्रास होतोय का तुला?" शिवम त्यांच्या थरथरता हातात घेत त्यांना सोफ्यावर बसवत काळजीने विचारले.
"नाही, बाळा.. उलट आज खूप बरं वाटतंय मला." त्या त्याच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत म्हणाल्या.
त्याने एक नजर भावनाकडे पाहिले. तिने नजरेने सर्व काही ठीक आहे. म्हंटल्यावर त्याला बरे वाटले.
तो शैला ताईंच्या पायाशी बसला आणि "आजी" असे म्हणत त्याने त्यांच्या मांडीवर भरल्या डोळ्यांनी हळूवार डोकं टेकवले. त्याही मायेने त्याचे डोके कुरवाळू लागल्या.
समाप्त -
