Login

दुसरी संधी..

बायकोचे ऐकून मुलगा आईला वृद्धाश्रमात सोडतो.तिथे आईला एक मित्र भेटतो. त्यांची शुद्ध मैत्रीचे ते वेगळा अर्थ काढतात. जेव्हा तो जाब विचारायला जातो तेव्हा ती काय उत्तर देते जाणून घ्या या कथेत..

लघुकथा लेखन स्पर्धा- एप्रिल:-२०२६

विषय:- वृद्धाश्रमातील गोष्ट

शीर्षक:- दुसरी संधी

"तुमच्या आईने आपले नाक कापले, घराण्यांची अब्रू वेशीला टांगायला निघाल्यात. कसे काही वाटले नाही त्यांना असे वागायला?" अंजली जोरात प्रतिकवर खेकसली.

"काय बोलू मी आता? तिच्या वागण्याची मलाही लाज वाटू लागली आहे. आईने कोठे तोंड दाखवायच्या लायकीचे ठेवले नाही." प्रतिक डोक्याला हात लावत लाजीरवाणा चेहरा करत म्हणाला.

"नाही तर काय? म्हातारपणात काय चळ भरली तुमच्या आईला? याला कारणीभूत तुम्ही आहात!" अंजलीने सगळा आरोप त्याच्यावर लावला.

"माझ्यावर का आरोप लावत आहेस तू? तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी केले. तुलाच ती या घरात नको होती ना. म्हणून वृद्धाश्रमात तिला सोडून आलो." तो रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला.

"आ हा हा! जसं माझे सगळं ऐकता. तिथे सोडताना एकदा नीट चौकशी तरी करायची ; पण नाही! डोक्याचा वापर करायचा नसतो ना तुम्हाला?" ती पुन्हा फणकऱ्याने म्हणाली.

"तेवढं डोकं आहे मला, केली होती मी सगळी चौकशी. पण असं काही ती करेल असे स्वप्नातही वाटले नव्हते मला." तो तिच्यावर आवाज चढवून बोलला.

"आता काय मग, सामोरे जायचे लोकांच्या प्रश्नांना." ती काही बोलली नाही म्हणून तो पुढे म्हणाला.

"तुम्ही द्या त्यांच्या प्रश्नांची उत्तरे. माझा त्यांच्याशी काहीच संबंध नाही." ती तडतड बोलून रूममध्ये निघून गेली.

तो डोकं गच्च धरून बसला.

सहा महिन्यांपूर्वीचे त्याला आठवले.

अंजली आणि ललिता यांच्या रोज कशावरूनही कुरबुर चालू असायची. मुळात अंजलीला प्रतिकचे बाबा गेल्यानंतर ललिताला घरी आणलेले आवडले नव्हते. त्यांचा ग्रामीण लहेजा तिला आवडायचा नाही. त्या शिकलेल्या होत्या पण त्यांना साधं राहायला आणि ग्रामीण भाषा बोलायला आवडत होतं. गावाकडे मिळून मिसळून राहिलेल्या ललितांना इथे घरात कोंडल्यासारखे वाटायचे. म्हणून ते शेजारी पाजारी घरात जाऊन गप्पा मारायच्या. काही खायला केलं तर त्यांना देऊन यायच्या. लोकांना त्यांचा स्वभाव आवडायचा. त्यांच्याबद्दल चांगलं बोललेलं मात्र अंजलीला खुपायच. मुळात ती तुसड्या स्वभावाची होती. त्यामुळे तिला त्यांचे प्रस्थ वाढलेलं डोळ्यांत खुपत होतं. 

"आई, आता रोजची कटकट मला सहन होत नाहीये. तुझी व्यवस्था मी वृद्धाश्रमात केली आहे. तुला सोडून येतो तिकडे." तो तिचे कपडे एका पिशवीत भरत वैतागत म्हणाला.

याबद्दल त्याने त्यांना अजिबात कल्पना दिली नव्हती. त्यामुळे त्यांना धक्का बसला. त्यांच्या डोळ्यांत पाणी दाटून आले. त्यांच्या तोंडून शब्दच फुटेना. त्या चुपचाप त्याच्यासोबत आश्रमात आल्या.

त्यांना आश्रमात सोडून आल्यावर मात्र अंजलीला जग जिंकल्यासासखे वाटले.

आठ दिवस ललिता यांना त्या आश्रमात अजिबात करमत नव्हते. गावी काही नसल्याने त्यांना तिकडेही जायचा रस्ता नव्हता. म्हणून त्यांनी नाईलाजाने तिथेच पसंत केले. हळूहळू तिथे त्यांनी जुळवून घेतले. त्यांचा स्वभाव बोलका असल्याने लवकरच त्या सगळ्यांच्या आवडीच्या बनल्या. तेथे गोपाळराव नावाचे सद्गृहस्थ राहत होते. तेही काही दिवसांपूर्वी हे आश्रमात आले होते. त्यांची गावच्या मातीशी नाळ जोडलेली असल्याने त्यांना ग्रामीण भाषा बोलायला आवडयचे. त्यांचाही स्वभाव ललिता यांच्यासारखा होता. त्यामुळे त्या दोघांचे छान सूर जुळले. दोघांमध्ये छान मैत्री झाली.

ललिता यांच्या हाताला छान चव होती. त्यात त्या मसाले ही छान बनवत. त्यांच्या मसालाल्या चांगली मागणी होती. बघता बघता त्यांचा लघुउद्योग सुरू झाला. ज्यात त्यांना गोपाळरावांची छान साथ लाभली.

आश्रमात कोणताही कार्यक्रम असला की दोघे मिळून त्याचे नियोजन करत असत. आजारपणात एकमेकांची काळजी घेत. त्यांचा प्रत्येक ठिकाणी वावर पाहून लोकांनी त्यांच्या मैत्रीच्या नात्याला वेगळे नाव दिले.

हीच बातमी उडत उडत अंजली आणि प्रतिकच्या कानांवर गेली. अंजलीला मुद्दाच सापडला होता ललिता यांची नाचक्की करण्याची. तिचे ऐकून तोही कोणताही विचार आणि शहानिशा न करता आरोप लावून मोकळा झाला.

तो त्यांना जाब विचारायला गेल्यावर त्या शांतपणे म्हणाल्या,"गोपाळ आणि माझे नाते शुद्ध मैत्रीचे आहे. मला जगण्याची दुसरी संधी त्यांच्यामुळे मिळाली. ते माझ्यासाठी कृष्ण म्हणून आलेत. लोक आमच्याबद्दल काय बोलतात याच्याशी मला काही देणे घेणे नाही. राहिला तुला उत्तर देण्याचा तर तो हक्क तू तेव्हा गमवलास जेव्हा तू मला इथे सोडून निघून गेला होतास. तेव्हा आता तुझा माझा संबंध नाही. इथून पुढे इथे येऊ नकोस. म्हणजे तुझा अपमान होणार नाही. माझं बोलणं झालंय तू जाऊ शकतोस."

त्याच्या बोलण्याची वाट न पाहता त्या त्यांच्या कामासाठी निघून गेल्या.

त्यांचे स्वाभिमानाचे हे नवे रूप पाहून तो चाट पडला आणि गुपचूप मान खाली घालून निघून गेला.

समाप्त -

©️ जयश्री शिंदे


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →