Login

दुसरी बाजू भाग 1

About Second Opinion
जलद लेखन स्पर्धा फेब्रुवारी 26


"कशा आहात ताई? खूप दिवसांनी भेटत आहोत ना आपण?"

शीतलने आनंदाने सुरेखाताईंना विचारले.

"मी मजेत आहे. तू कशी आहे? आणि खरंच खूप दिवसांनी भेटत आहोत आपण!"

सुरेखाताई शीतलला उत्तर देत म्हणाल्या.

"ताई, प्राजक्ता नाही आली लग्नाला?"

शीतलने सुरेखाताईंना विचारले.

"नाही गं, ती माहेरी गेली आहे म्हणून नाही आली."

सुरेखाताईंनी शीतलला सांगितले आणि त्या दुसऱ्या कोणाशी बोलू लागल्या.

सुरेखाताई दुसऱ्याशी बोलत आहे, हे पाहून शीतलने सुरेखाताईंचा निरोप घेतला व ती पण दुसऱ्या कोणाशी बोलू लागली.

सुरेखाताई व शीतल या अगोदर एकाच बिल्डिंगमध्ये राहत होत्या. दोन वर्षांपूर्वी शीतल दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली होती. शीतल जरी दुसरीकडे राहायला गेली होती पण तिचे सुरेखाताई व बिल्डिंगमधील इतर मैत्रिणींशी चांगले नाते होते. या सर्वांकडे तिचे येणे जाणे सुरू असायचे. बिल्डिंगमध्ये कोणाकडे काही कार्यक्रम असला की, शीतलच्या फॅमिलीला आमंत्रण असायचे.

आज हीे बिल्डिंगमधील पाटीलताईंच्या मुलाचे लग्न होते आणि त्यासाठी शीतल व तिची फॅमिली लग्नाला आलेली होती.

एक वर्षापूर्वी सुरेखाताईंच्या मुलाचे लग्न झाले होते. शीतलची फॅमिली तेव्हाही लग्नाला आली होती व लग्नात त्यांनी खूप मजाही केली होती.
सुरेखाताईंची सून प्राजक्ता ही शीतलला खूप आवडली होती. जेव्हाही त्या दोघी भेटायच्या, तेव्हा त्या छान बोलायच्या.
आज प्राजक्ता कार्यक्रमाला आली नाही म्हणून शीतलने सुरेखाताईंना तिच्याबद्दल विचारले.
'ती माहेरी गेली आहे म्हणून आली नाही.' असे सुरेखाताईंनी सांगितल्यावर तिची व आपली भेट झाली नाही म्हणून शीतल थोडी नाराज झाली होती.

'तुझी साडी किती छान आहे गंं!'
'किती सुंदर दिसते आहेस गं तू ?' 'अगं, हे कानातले कुठून घेतले गं.'

मैत्रिणीच्या अशा छान गप्पा सुरू होत्या. त्यात शीतलही सामील झाली आणि लग्न समारंभाचा आनंद घेऊ लागली.

एकमेकांच्या साड्या, दाग दागिने व सुंदरता यावर छान छान कमेंट्स करत सर्वजणी गप्पाही मारत होत्या.
हॉलमध्ये वधू आणि वर यांची छान एन्ट्री झाली. दोघेही खूप छान दिसत होते. भटजींनी मंगलाष्टक म्हटले आणि वधू व वर यांनी एकमेकांना वरमाला घातल्या. त्यानंतर आलेल्या सर्व पाहुणेमंडळीची धावपळ सुरू झाली. कोणी जेवणासाठी तर कोणी फोटोसाठी तर कोणी एकमेकांना भेटण्यासाठी!

तेवढ्यात शीतलचे लक्ष गेले की, सुरेखाताई लग्न लागताच घाईघाईने निघून गेल्या.


क्रमश:
नलिनी बहाळकर
0

🎭 Series Post

View all